Yogesh Kadam Sarkarnama
कोकण

Crime News : गृह राज्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून वृद्धाची फसवणूक; गुन्हा दाखल, पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू

Yogesh Kadam Fake PA Fraud Case : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे एका वृद्धाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

Ratnagiri Crime News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे गृहराज्यमंत्री (शहरे) तथा महसूल व ग्रामविकास मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून, त्यांची भेट घडवून आणण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने वृद्धाकडून ५ हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी खेड येथे घडला. याप्रकरणी खेड पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंत्री योगेश कदम यांच्या नावाचा वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रविराज चिखले (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात विद्याधर दत्ताराम साळुंखे (वय ५६, मूळ रा. बोरगाव-साळुंखेवाडी, चिपळूण; सध्या रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील संशयित रविराज चिखले याचा शोध खेड पोलिसांकडून सुरू आहे.

फिर्यादीनुसार, विद्याधर साळुंखे हे तालुका व ग्रामपातळीवर सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतात. चिपळूण तालुक्यात अनधिकृत चिरा दगडांच्या खाणी सुरू असून, या व्यवसायातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत नसल्याने शासनाची फसवणूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. ही बाब त्यांना महसूल व ग्रामविकास मंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून द्यायची होती. त्यासाठी त्यांना मंत्री कदम यांची भेट घ्यायची होती.

ही बाब रविराज चिखले याच्या लक्षात आली. त्याने मंत्री कदम यांचा पीए नसतानाही आपण त्यांचा पीए असल्याचे भासवले. तसेच, मंत्री कदम यांची भेट घडवून आणण्याचे आणि काम करून देण्याचे आश्वासन त्याने विद्याधर साळुंखे यांना दिले. त्यानुसार, शनिवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या दरम्यान त्याने साळुंखे यांच्याकडून ५ हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर मंत्री कदम यांची भेट घडवून आणली नाही किंवा सांगितलेले कामही केले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे साळुंखे यांच्या लक्षात आले.

५ हजारांची आगाऊ मदत

दरम्यान, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी राज्य सरकारकडून ५ हजार रुपयांची ‘आगाऊ मदत’ दिली जाणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. तसेच, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करण्याऐवजी विरोधक या संवेदनशील मुद्द्यावर केवळ राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक आधार देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. सध्या आपत्तीग्रस्त भागांत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून, ते पूर्ण होताच नियमानुसार मुख्य नुकसानभरपाई दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, “पाच हजार रुपयांची रक्कम ही केवळ तात्पुरती ‘आगाऊ मदत’ आहे. ती अंतिम नुकसानभरपाई नाही. दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात रक्कम उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या तातडीच्या गरजा भागाव्यात, यासाठी सरकारने ही व्यवस्था केली आहे. पंचनाम्यांचा अंतिम अहवाल आल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार भरीव मदत दिली जाईल.”

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी दुष्काळ व आपत्तीग्रस्त तालुक्यांच्या यादीत नव्याने ४० तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. राज्य सरकारच्या निधीसोबतच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या संभाव्य मदतीचाही या प्रक्रियेत विचार केला जाणार आहे. गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

“सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर राजकारण न करता सकारात्मक भूमिका घ्यावी. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती मदत वेळेत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे योगेश कदम यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT