भाजपने आज राज्यभरातील शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्ष जाहीर केले. मात्र मंत्री अतुल सावे यांनी भाजप शहराध्यक्ष निवडीचा प्रश्न प्रतिष्ठेचा केल्याने ही नियुक्ती होऊ शकलेली नाही. यामुळे आता भाजपमध्ये वाद वाढला असून हे प्रकरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे. तर फडणवीस कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरबाबत गौप्यस्फोट बीड पोलीस दलातून निलंबित अधिकारी रणजीत कासलेने केला होता. तसेच हे आरोप करताना त्याने अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे याचे नाव घेतले होते. तर त्यांनीच ती ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा केला होता. यानंतर कासले याला निलंबित करण्यात आले होते. तसेच त्याला अटक देखील करण्यात आले होते. दरम्यान आता त्याला जामीन मंजूर झाला आहे.
अमरावतीचे सुपूत्र भूषण गवई उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. पण याआधी त्यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी एक मागणी केली आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भूषण गवई यांच्या आईने येत्या काळात निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भूषण गवई बॅलेट पेपर संदर्भात प्रलंबित निकालावर कोणता निर्णय घेतात? याकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अद्याप निवळलेला नाही. अशातच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार निशाना साधत टीका केली आहे. ओवैसी यांनी पाकिस्तानाला डिवचताना खोचक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी, चीनचाही उल्लेख करताना पाक लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना एक सवाल केला आहे. शाहबाज सरीफ आणि असीम मुनीर चीनकडून भाड्याने घेतलेले लढाऊ विमान रहीम यार खान हवाई तळावर उतरवू शकतात का? असा सवाल त्यांनी केला आहे.
राज्यातील एकूण आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. तर शारदा निकम यांनी बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्याही बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा लग्नाच्या एकदिवस आधी बेपत्ता झालाय. वैभव मोहोड (वय 30) असं बेपत्ता झालेल्या तरुणाच नाव आहे. याप्रकरणी वैभव मोहोड याचे वडील हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. वैभव हा काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा आहे. वैभव शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होता. आज सकाळी सामान आणायला बाहेर जातो, असं सांगून गेलेला वैभव घरी परत आलाच नाही.
एक चांगली भावना तसेच मैत्रिपूर्ण संबंधाला समोर ठेवून सिंधू जलवाटप करार करण्यात आला होता. गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालून पाकिस्तानने मात्र या धोरणाला हरताळ फासला आहे. त्यामुळे सीसीएसच्या निर्णयानुसार सीमेपलिकडच्या दहशतवादाला पाकिस्तान जोपर्यंत संपवत नाही, तोपर्यंत सिंधू जलवाटप करार स्थगितच राहील, असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे.
पीओकेवर भारताची भूमिका स्पष्ट आहे, पाकिस्तानला पीओके खाली करावचं लागेल. तर, जम्मू काश्मीर हा फक्त भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्रांचा प्रश्न आहे, असे परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे. केले. काश्मीरच्या मुद्द्यावर आम्हाला कोणाचीही मध्यस्थी चालणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेनं स्वीकारला आहे. त्यामुळे, टीआरएफ संघटनेला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकावे, अशी मागणीने भारताने केली.
देश पातळीवर जमिनी शेतकऱ्यांकडून काढून घेण्यासाठी सरकारच्या वतीने सुरू असलेल्या कारस्थानाचा डॉ. अशोक ढवळे यांनी तीव्र निषेध केला. राज्य सरकारने शेती शेतकऱ्यांकडून काढून घेण्यासाठी सुरू केलेल्या कारस्थानाचा निषेध करण्यासाठी 1 जून रोजी राज्यात तीव्र आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. जमिनीशी संबंधित प्रत्येक प्रश्नावर राज्य, जिल्हा, तालुका व स्थानिक पातळीवर आरपार लढा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई हे उद्या (ता. 14 मे) शपथ घेणार आहेत. गवई हे महाराष्ट्रातील अमरावतीचे आहेत. भूषण गवई हे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार आहेत. यापूर्वी के. जी. बालकृष्णन यांनी पहिले दलित सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.
भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर पराराष्ट्र मंत्रालयाची आज सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सेंदूर’ केवळ स्थगित केल्याचे म्हटले हेाते, त्यामुळे या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सेंदूर बाबत काय माहिती दिली जाते, याबाबत उत्सुकता आहे.
शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन तुम्हाला पेलत नव्हतं तर तुम्ही ते का दिलं. महायुतीचे मंत्री ग्रामीण भागात फिरतील, तेव्हा त्यांच्या सभेत घुसून आम्ही शेतकरी कर्जमाफीबाबत जाब विचारणार आहोत. आम्ही अनेक मंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सभेत घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापुढेही करणार आहोत. पोलिस आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. मात्र आम्ही आता गप्प बसणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्ह्यातील अकोल्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अकोल्यावरून राजूरला जात असताना कोल्हार घोटी रस्त्याववर विटे घाटात हा अपघात झाला आहे. अपघातात आमदार डॉ. किरण लहामटे वाचले आहे. आमदार लहामटे यांची फॉर्च्युनर गाडी आणि ट्रकचा अपघात झाला आहे. गाडीत आमदार किरण लहामटे यांच्याबरोबर त्यांचे स्वीय सहाय्यक आणि कार्यकर्ते होते.
सैन्याने देशाच्या स्वाभिमानाला नवी उंची मिळवून दिली. भारताकडे डोळे वटारून पाहिलं तर खात्मा होईल, हे दाखवून दिले. अण्वस्त्रांच्या धमकीची भारताने हवा काढली. सेनेच्या आक्रमकतामुळे त्यांची दाणादाण उडाली. पाकमधील दहशतवादी आता सुरक्षित नाही. आता घरात घुसून मारले जाईल. आता पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत प्रत्युत्तर देणार, असेही मोदींनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील एअरबेसवर जवानांशी संवाद साधला. ऑपरेशन सिंदूरमध्ये बहिणींचे कुंकू पुसणाऱ्यांना घरात घुसून मारले. तुमचा कोट्यवधी भारतीयांना अभिमान वाटत आहे. तुम्ही भारताच्या सीमेचे रक्षण केले. तुम्ही केलेली कामगिरी अभूतपूर्व, अतुलनीय आहे. पाकिस्तानात बसूनही दहशतवादी एक श्वासही घेऊ शकणार नाहीत, असे मोदी म्हणाले.
भाजपकडून आज राज्यातील ५८ जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अद्यापही २० नियुक्त्यांवर वाद असल्याने त्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. पुण्यामध्ये धीरज घाटे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून आज सांयकाळी साडे पाच वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये काल शस्त्रसंधीबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत नेमकी कोणती माहिती दिली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील शोपिया भागात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत शाहीद कुट्टे, अदनाम शफी दार या दोघांसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पहिल्यांदाच ही नावे समोर आली आहेत. मात्र, या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्यासी काही संबंध होता का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
25 मे रोजी दिल्लीत NDA च्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीला एनडीएच्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होतील. सुशासन आणि विकसित भारताच्या अजेंड्यावर चर्चा होईल. एनडीएच्या अजेंडा आणि केंद्र सरकारच्या योजनांशी संबंधित इतर विषयांवर सादरीकरण केले जाईल.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला सुरक्षा यंत्रणांनी बक्षीस जाहीर केले आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी यंत्रणांनी मोहीम तीव्र केली आहे.
आयुष्यभर गोरगरिबांची-दीनदुबळ्यांची सेवा करणाऱ्या शिर्डीतील साई बाबांच्या चरणी पाचशे किलोंच्यावर सोने अर्पण झाल्याचे समोर आलं आहे. साई संस्थानकडील या सोन्यामध्ये सर्वाधिक दागिने असून, आजरोजी त्याची किंमत तब्बल अडीचशे कोटी रुपयांवर पोचली आहे. आता संस्थानकडे देणगी स्वरुपात येणारे दागिने साठवायला जागा कमी पडत आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुखांची महत्वाची बैठक बोलावली आहे. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
पहलगाम हल्ल्यातील तीन संशयीत दहशतवाद्यांची छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. जम्मू -काश्मीर परिसरात अनेक ठिकाणी ही छायाचित्र लावण्यात आली आहेत. त्यांचा पत्ता देणाऱ्या व्यक्तीला 20 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. हावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
जम्मू-कश्मीरमधीस शोपियान मध्ये आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये गोळीबार झाला. सुरक्षा बलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं आहे. येथे मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. चार दहशतवाद्यांना घेरले आहे, एका दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दहशतवादाविरोधात भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरल्यानंतर या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपकडून आज देशभर तिरंगा यात्रा काढली जाणार आहे. आजपासून 23 मेपर्यंत भाजपचीही तिरंगा यात्रा आहे.
ठाकरे कुटुंबाच्या निकटवर्तीय असलेल्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिक्षण क्षेत्रात ज्याप्रमाणे चांगल्या सक्षम शिक्षण संस्थांना सरकारने स्वायत्तता दिलेली आहे, त्याचप्रमाणए सहकारातही चांगल्या सक्षम संस्थांना स्वायत्तता द्यावी. फक्त चांगला कारभार नसलेल्या संस्थांवरच राज्य सकराने नियंत्रण ठेवावे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली.
आपण दिलेले वचन पूर्ण करणार, असे म्हणत, शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत आपण वचनबद्ध असल्याचे म्हटलं. महायुती सरकारमध्ये शेतकरी कर्जमाफीवरून विरोधास असणारी विधानं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी आता तरी शक्य नसल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी कर्जमाफीवर बोलायला तयार नाहीत.
मुंबई विद्यापीठाच्या नावाने युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव 14 मे पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असे नमूद करून परिपत्रक समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. मात्र, परीक्षेसंदर्भातील हे परिपत्रक बनावट असल्याचे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीचा फटका मराठवाड्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना बसला आहे. मराठवाड्यात वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 14 जनावरे देखील दगावली आहेत. मे महिन्यांत 7 दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली.
वित्तीय संस्था, कृषी प्रक्रिया संस्था अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडित सहकारी संस्थांसाठी त्यांच्या निकडीवर कायद्यात नवीन प्रकरणे तयार करणे आणि कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी समिती तयार करून कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील, अशी घोषणा महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आणखी एका टोळीविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई केली. परळीतील फड गँगविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसातील परळीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना पोलिस अधीक्षकांनी कायद्याच्या मार्गानं दणका देत आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या सीए परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता या परीक्षा 16 ते 24 मेदरम्यान घेतल्या जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाल्याने सीए फायनल आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आता सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
सीमेपलीकडून होणारे सायबर हल्ले 'ऑपरेशन सिंदूर' नंतर अधिक तीव्र झाले आहेत. या कालावधीत एकूण 15 लाख सायबर हल्ल्याचे प्रयत्न पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियातील हॅकर टोळ्यांनी केले असून, त्यातील फक्त 150 हल्ले यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. या कटाच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.