माजी गृहमंत्री अनिल देशमुक यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही सरकारने सूडभावनेतून केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केला. ते ठाकरे गटाचे खासदर संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी, सत्तेचा गैरवापर कसा होता? हे राऊत यांच्या पुस्तकातून समजतं. तसं लिखाण त्यांनी केलेलं आहे. ही यंत्रणा आहे, ती कशी वागते याचं उत्तम लिखाण या पुस्तकात आहे. अनिल देशमुखांवर देखील 100 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. पण ते आरोप कोर्टात टिकले नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
रिपल्बिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका करताना, जीभ घसरली. "आठवले हे काही आंबेडकर कुटुंबातील नाहीत. यामुळे त्यांच्याबरोबर एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. माझं असं म्हणणं आहे की, गोठ्यामध्ये गाई, म्हशी बांधल्या जातात *** नाही", अशी जहरी टीका त्यांनी केलीय. आनंदराज यांच्या या टीकेवर आठवले यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
एआयएमआयएम प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तावर सडकून टीका केली आहे. तसेच त्यांनी त्यांना ट्रोल करणाऱ्यांना देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी, पाकिस्तानबद्दल मी बोलत असल्याने त्यांच्या निशाण्यावर मीच आहे. पाकिस्तानवाल्यांना त्यांच्या इतका स्पष्टवक्ता आणि इतका हँडसम कोणी दिसतच नाहीये. पाहात राहा, तुमच्या डोक्यात जो भुसा भरलेला आहे, तो साफ होईल, तुमच्या ज्ञानात भार पडेल आणि अज्ञान कमी होईल, अशी टीका देखील ओवेसी यांनी पाकिस्तानवर केली आहे.
खासदर संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सरकारच्या तसेच यंत्रणेच्या कामावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला. फडणवीस यांनी मी बालसाहित्य वाचत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती. त्यावर पवार यांनी टीका करताना, मला आश्चर्य वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक न वाचता कसं समजलं? यावर प्रचंड टीका केली जातेय असेही त्यांनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यावरून आनंदराज आंबेडकर यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे अत्यंत दुर्देवी आहे. एससी, एसटीचे पैसे अशाप्रकारे वळते करत असतील, तर हा खरं म्हणजे ॲट्रॉसिटीचा गुन्हा होऊ शकतो. जवळपास साडेसात हजार कोटी वळवण्यात आले आहे, असेही आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये महिलांची छेड काढण्यात आली. दरम्यान संबंधित महिलांनी नातेवाईकांना फोनवर याची माहिती दिली. बीड शहरातील बार्शी नाका परिसरात ही बस दाखल होताच नातेवाईकांनी समोरील काचेवर दगड मारून काच फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी बीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नेते म्हणून खासदार संजय राऊत यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या समवेत आमदार अनिल परब, उपनेते सुहास सामंत, साजन पाचपुते यांच्यावर देखील जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती शहरप्रमुख किरण काळे यांनी दिली आहे.
चंद्रशेखर जयवंत मखरे (वय 38, रा.मखरेवाडी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) याला गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसासह स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
परळीतील शिवराज दिवटेला एका टोळक्याने डोंगराळ भागात लाकडाने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. सध्या त्याच्यावर अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज रुग्णालयात जात धनंजय देशमुख यांनी शिवराज दिवटे यांची भेट घेतली. धनंजय देशमुख यांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात मकोकानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी केली. दरम्यान, लोखंडी रॉड आणि कत्नीने मारहाण झाल्याचे शिवराज दिवटे याने सांगितले. टोळक्यातील काहीजण, 'याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा ', असे म्हणत होते, असा शिवराजने आरोप केला आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान इथं मद्यपान करत गोंधळ घालून तोडफोड करणारा पुजारी अनुप कदम याच्यावर मंदिर संस्थानने कडक कारवाई केली. अनुप कदम याच्यावर तीन वर्षांची मंदिर प्रवेशबंदी घातली आहे. मंदिर संस्थानने गैरवर्तनामुळे नोटीस दिल्याचा राग मनात धरून अनुप कदम याने मद्यपान करून मंदिर संस्थान कार्यालायमध्ये तोडफोड केली होती. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे.
महिला व बाल हक्क आयोगाच्या माजी अध्यक्षा वकील मीनाक्षी जयस्वाल यांची त्यांच्या विश्वासू चालकाने साथीदाराच्या मदतीने 18 डिसेंबर 2014 हत्या केली होती. दरोड्याच्या उद्देशाने घरात घुसून तेरावेळा चाकूने वार करत त्यांची हत्या करून दागिने चोरले होते. परिस्थितीजन्य पुरावे आणि 20 साक्षीदारांच्या साक्षींवरून पनवेल न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे. तिला पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाक सरकारकडून आमंत्रण देण्यात आले होते. तिला 28 मार्च 2004 रोजी पाकिस्तानी दूतावासाकडून रिसेप्शन आणि इफ्तार पार्टीचे निमंत्रण देण्यात आलं होतं. पाकिस्तानच्या दानिश नावाच्या उच्चायुक्त अधिकाऱ्याने तिला विजा दिल्याची माहिती आहे.
दिल्ली महापालिकेतील आम आदमी पक्षाच्या 13 नगरसेवकांनी पक्षाला रामराम केला आहे. या तेरा नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे, त्यामुळे दिल्लीत आपचे संयोजक अरविंद केजरील यांना जोरदार धक्का बसला आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढणार असून अमरावतीत भाजपचाच महापौर होणार, असा दावा माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. भाजपचे अमरावती शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी पदग्रहण केले आहे. त्या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले आहे.
काश्मीर हे आपलं आहे. काश्मीर कालही आपलं होतं, आजही आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील. एकवेळ देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलंच राहील, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. आमचं जहाज बुडणार नाही, भाजप ओव्हरलोड झालाय, बुडण्याची भीती त्यांनाच असल्याचे ठाकरे म्हणाले. ते शनिवारी शिवसेना भवनात आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीदरम्यान हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना अचानक भोवळ आली आहे. तिरंगा रॅली सुरू असताना तानाजी मुटकुळे जमिनीवर कोसळले. या घटनेने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी आमदार मुटकुळे यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे. सध्या आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबविले आहे. त्यानंतर आता भारताची बाजू मांडण्यासाठी भारतातील खासदारांचं शिष्टमंडळ जगाच्या दौऱ्यावर जाणार आहे. खासदारांचे आठ गट तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक गट जगातील महत्त्वाच्या देशात जाऊन आपली बाजू मांडणार आहे. याचदरम्यान मोदी सरकारने काँग्रेस नेते शशी थरूर तसेच राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ते दोघेही शिष्टमंडळात असणार आहेत.विशेष म्हणजे, मोदी सरकारने या खास मोहिमेच्या नेतृत्वाची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडे दिली आहे.
भारताने ज्या प्रकारे पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते. तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केले पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. बीडचा परळी म्हणजे आता दहशतीचा अड्डा झालेला आहे. त्याला गांभीर्याने घ्यायला हवं असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
देशातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात एका नव्या संयुक्त आयुक्त पदाची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे शहरातील सहावे संयुक्त आयुक्त पद ठरणार आहे.
शुक्रवारी हैदराबाद येथील हज हाऊसमध्ये एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी संवाद साधला. आपला शेजारी सुधारणारा नाही, प्रार्थना करा, अल्लाहने त्याची शेपटी सरळ करावी, नाहीतर वेळ येईल तेव्हा त्यांची ही शेपटी सरळ करावी लागेल, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. ही यात्रा धैर्य, कृतज्ञता आणि विनम्रतेने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
केंद्र सरकार सर्व पक्षांच्या खासदारांच्या सात शिष्टमंडळांना परदेश दौऱ्यावर पाठवणार आहे. प्रत्येक टीममध्ये 5 खासदार असतील. यातील एका खासदाराकडे त्या ग्रुपचं नेतृत्व सोपवण्यात येणार आहे. संसदीय कार्य मंत्रालयाने शनिवारी या टीम लीडर्सची नावे जाहीर केली. या यादीत भाजपचे दोन, काँग्रेस, डीएमके, जेडीयू, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे प्रत्येकी एक खासदार आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरविषयी हे खासदार दहशतवादाबाबत भारताचा संदेश जगभर देतील. या मोहिमेचे नेतृत्व खासदार शशी थरूर करणार आहेत.
पहेलगाम मध्ये अतिरेक्यांनी अनेकांना मारलं पण याचा बदला घेतला पाहिजे आणि मास्टरमाईंड शोधून त्यांना संपवलं पाहिजे अशी भावना आपली होती. त्यावेळी भारत पाकिस्तान मध्ये युद्ध झालं आपण सगळेजण देशाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत होतो .त्याही वेळी भारतीय लष्करातील दोन महिलांनी मीडिया समोर येऊन माहिती दिली.काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली, हे चुकीच आहे. आम्हाला याचं वाईट वाटत आहे.
भाजपचे पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला बहुतांश शहर पदाधिकाऱ्यांंनी आणि नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.
पाकिस्तानच्या संसदेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कबूल दिली की भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता. शरीफ यांनी सांगितले की १० मे रोजी पहाटे २:३० वाजता जनरल असीम मुनीर यांनी त्यांना फोन करून भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर काही भागात हल्ला केल्याची माहिती मला दिली.
पुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी त्यांच्यासह अनिल कोंढरे, गणेश मोहिते, सिद्धार्थ वंशी, तानाजी दांगट, निलेश धनावडे, नितीन कोमन, गणपततात्या गुजर, भालचंद्र पवार आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी संग्राम बाबर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
गजा मारणेसह त्याच्या टोळीतील अनेक सदस्यांच्या गाड्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 10 ते 15 गाड्या जप्त केल्या आहेत. त्यामुळे मारणे टोळीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा दणका दिल्याचं पाहायला मिळत आहे.
पुण्यात कोयता गँगने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील अप्पर इंदिरानगरमध्ये भर वस्तीतील गाड्या फोडत मोठमोठ्याने शिवीगाळ या गँगने केल्याचं समोर आलं आहे. परिसरात दहशत पसरवण्यासाठी टोळक्याने हा धुडगूस घातला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या अशा टोळक्यांना पोलिसांचा कसलाही धाक उरला नसल्याचं या घटनांमधून स्पष्ट होत आहे.
रामराजे नाईक-निंबाळकरांनी आयुष्यभर अनेक राजकीय नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा दुसऱ्याला संपविण्यासाठी आपण खड्डा खोदतो, तेव्हा आपोआप तोच खड्डा आपल्यासाठीही तयार होतो. हीच परिस्थिती निंबाळकर यांच्याबाबत निर्माण झाल्याचं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे.
भारत सरकार ऑपरेशन सिंदूरचं सत्य जगाला सांगणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत भारतीय लष्कराने केलेली कामगिरी जगापर्यंत पोहोचणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.