Maharashtra Voter List Updated Sarkarnama
महाराष्ट्र

Local Body Elections : महापालिका निवडणुकीच्याआधीच 14 लाख मतदार वाढले; 'स्थानिक'साठी निवडणूक आयोग सज्ज!

Maharashtra Voter List Updated : विधासभेत वाढलेल्या मतदारांमुळे काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने मतदारयादी अद्ययावत केली असून त्यामध्ये तब्बल 14 लाख मतदार वाढले आहेत.

दीपा कदम

Voter List News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदारयादी वापरण्यास मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. मागील दहा महिन्यांत, म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर नवीन मतदारयादीमध्ये साधारण 14 लाखांपर्यंत नवीन मतदारांची भर पडली आहे. त्याचवरोबर विधानसभा मतदारसंघातील यादीतील नावांवर ज्या मतदारसंघामध्ये आक्षेप घेण्यात आले, त्यातील सत्यता पडताळून काही मतदारसंघांतील मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

नवीन मतदारयादीमध्ये शहरी भागातील मतदार वाढले असल्याचे निरीक्षण उच्चपदस्थ सूत्रांनी नोंदविले. ही यादी मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होती, मात्र त्यावर कोणाच्या हरकती अद्याप आल्या नसल्याचेही समजते. नवीन मतदारयादी केंद्रीय निवडणूक कार्यालयाने आयोगाला मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत 'डिजिटल' स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. ही माहिती अपलोड होण्याची प्रक्रिया किमान 20 ते 25 तासांची आहे. त्यानंतर एकूण यादीतील मतदारांची संख्या जाहीर केली जाणार असल्याचे समजते. मात्र साधारण १४ लाखांच्या आसपास नवीन मतदार या यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

निवडणूक आयोगाकडून मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभागानुसार मतदारयादी निश्चित करता यावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले होते. त्यामध्ये एक जुलैपर्यंतची राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला एक जुलै 2025 पर्यंतची मतदारयादी प्राप्त झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेनुसार मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरू केले जाईल. राज्य निवडणूक आयुक्त अद्ययावत मतदारयादी दिली जावी, अशी विनंती केली होती. त्यानंतरच नियमित मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घ्यावा असेही त्यांनी म्हटले होते.

नियम असतानाही...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ताज्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदारयादी वापरण्याचा नियम आहे. मात्र त्याऐवजी एक जुलैपर्यंतची मतदारयादी अद्ययावत करून वापरली जाणार आहे. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, १९४९, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारयादी वापरावी असा नियम आहे. याविषयी निवडणूक आयुक्त वाघमारे यांना विचारले असता, 'कोणती मतदारयादी वापरावी हा निवडणूक आयुक्ताचा अधिकार आहे', असे त्यांनी सांगितले. मागील दहा महिन्यांमध्ये ज्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे त्यांनाही संधी मिळावी, यासाठी एक जुलै ही तारीख निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.

एकुण किती मतदार इतक्यात सांगता येणार नाही...

राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला एक जुलै 2025 पर्यंतची मतदारयादी प्राप्त झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभार रचनेनुसार मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरु केले जाईल. प्रभागरचनेनुसार तयार झालेल्या याद्या सल्ला आणि सूचनेसाठी प्रसिद्ध केल्या जातील. मतदारयादीचा डेटा ट्रान्सफर होणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या किती, हे इतक्यात सांगता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT