Mumbai News : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राज्यातील वातावरण चांगलेच तापले असतानाच अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील ११ जागांसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असतानाच जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. अद्याप 12 लोकसभा मतदारसंघातील चित्र अद्याप अस्पष्टच असताना तिसऱ्या टप्प्यातील महायुतीच्या 2 जागांवरील तर महाविकास आघाडीच्या 1 जागांवरील उमेदवारांची घोषणा अजून बाकी आहे.
लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 12 ते 19 एप्रिल या आठ दिवसांच्या कालावधीत उमेदवार दाखल करता येणार आहे. सुट्ट्या वगळता पाच दिवसांचा कालावधी मिळणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
उमेदवारी अर्जांची छाननी 20 एप्रिलला करण्यात येणार आहे, तर उमेदवारी अर्ज 22 एप्रिलपर्यंत मागे घेता येणार आहेत. तर या ठिकाणी मतदान 7 मे ला होणार आहे. (Lok Sabha Election 2024 News)
तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत राज्यातील धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती या लोकसभेच्या ११ मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघातील निवडणुका लक्षवेधी ठरणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
त्यामुळे येत्या आठ दिवसांत महाविकास आघाडीला (MVA) माढा येथील तर महायुतीला (Mahayuti) सातारा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील उमेदवारांची घोषणा करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचे जागावाटप गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने जवळपास राज्यातील 48 पैकी 12 लोकसभा मतदारसंघांतील चित्र अद्याप अस्पष्टच आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीकडून सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, ठाणे, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मध्य मुंबई, दक्षिण मुंबई येथील उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. या जागांवरून महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात काही जागांवरून वाद असल्याने उमेदवार ठरले नसल्याचे समजते.
R