Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार, म्हणाले, '..तर फाशी द्या'

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

Rupali Chakankar News : रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार, म्हणाले, '..तर फाशी द्या'

पुण्यातील रेव्ह पार्टीवरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पुण्यातील रेव्ह पार्टी हे मोठं मानवी तस्करीचं रॅकेट असल्याचं सांगत गंभीर आरोपही त्यांनी केले आहेत. त्यावर, आता आमदार एकनाथ खडसेंनी पलटवार केला आहे. त्यांनी, 'तो दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना', असेही म्हटले आहे.

Mumbai Crime News : आयटी प्रोफेशनलला खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवून मागितली 1 कोटींची खंडणी, बँक महिला कर्मचाऱ्याला अटक

आयटी प्रोफेशनलला खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवून 1 कोटींची खंडणी मागितल्याची घटना मुंबईतील चारकोपमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खंडणी मागणाऱ्या RBL बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे. याप्रकरणी सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या महिला कर्मचाऱ्याचे नाव डॉली कोटक असे आहे.

पाथर्डी तालुक्यातील संतापजनक घटना; तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडूनच लैंगिक अत्याचार

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील इथं तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे.  

'टॅरिफ बॉम्ब'नंतर मोठी घडामोड; रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारताचा दौरा करणार 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावत मोठा दणका दिला आहे. या टॅरिफ बॉम्बनंतर रशियाशी चर्चा करण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल मॉस्कोत पोहोचले आहेत. या घडामोडीनंतर रशियामधील इंटरफॅक्स न्यूज एजन्सीसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या संदर्भानं राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन या वर्षाअखेरीस भारताचा दौरा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'राहुल गांधी यांची हार्ड डिस्क करप्ट...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

राहुल गांधी यांच्या निवडणुकीतील मतचोरीच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, खरं सांगायचं तर मतांची चोरी ही महाराष्ट्रात तसेच भारतात कुठेही झालेली नाही. राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे. म्हणून ते त्याच-त्याच गोष्टी रोज बोलत आहेत. ते खोटं बोलून पळून जात आहेत, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील यांनी दिली नांदणी जैन मठाला भेट

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नांदणी येथे असलेल्या जैन मठाला भेट दिली. त्यांनी तेथील प्रमुख स्वस्तिश्री जिनसेन पट्टारक भट्टारक महास्वामी यांच्याशी भेट घेतली. या भेटीत महादेवी हत्तींनी सुरू असलेल्या आंदोलनावर आणि मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. या भेटीमुळे समाजात एकतेचा संदेश गेला आहे. धार्मिक ठिकाणी जाऊन पाठिंबा घेण्याचा त्यांचा प्रयत्न महत्त्वाचा मानला जातो.

Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोशल मीडियावर एक व्यक्तीने रिल्स बनवून त्यामध्ये नवनीत राणा यांना गळा कापण्याची आणि मारण्याची धमकी दिली आहे. याआधीही त्यांना अशा प्रकारच्या धमक्या वेळोवेळी मिळाल्या आहेत. सध्या त्यांच्या स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

पाच ज्योतिर्लिंग देवस्थानांचा विकास करण्याची जबाबदारी पाच IAS अधिकाऱ्यांकडे : फडणवीस यांचा निर्णय 

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग देवस्थानांचा विकास करण्याची जबाबदारी 5 IAS अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबताचा निर्णय घेतला आहे. श्री क्षेत्र भीमाशंक, त्र्यंबकेश्वर, घृश्नेश्वर, परळी वैद्यनाथ आणि औंढा नागनाथ या पाचही ज्योतिर्लिंग विकास आराखड्याची अंमलबजावणी या पाच अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे.

शायना एनसी शिवसेनेच्या नव्या राष्ट्रीय प्रवक्त्या

भाजपमधून शिवसेनेत आलेल्या शायना एनसी यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गतवर्षी त्यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.

पंतप्रधान मोदी ठरवतील त्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल - एकनाथ शिंदे

आम्ही एनडीए आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपतीपदासाठी जो उमेदवार ठरवतील त्याला बिनशर्त पाठिंबा देऊ, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Devendra Fadnavis : राहुल गांधी रोज खोट बोलतात, अपयश झाकण्याचा प्रयत्न - फडणवीसांचे प्रत्युत्तर

कुठेही मतचोरी झालेली नाही. मला वाटतं राहुल गांधी यांच्या डोक्याची चीप चोरी झाली आहे. त्यांची हार्डड्राईव्ह करप्ट झाली आहे. ते रोज खोट बोलतात, रोज त्यांचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले.

ककबुतरांना खाद्य देण्याची बंदी कायम - हायकोर्ट

कोर्टाने कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम ठेवली आहे. पक्षाच्या विष्टेमुळे मानवी आरोग्याला धोका संभवतो. कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. कोर्टाच्या निर्णयाने आंदोलकांना मोठा झटका बसला आहे. नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं त्यामुळे आदेशाचं कोणीही अवमान करू नये असंही कोर्टाने म्हटलं आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी 13 ऑगस्टला होणार आहे.

धुळ्यात कारखान्याला भीषण आग

धुळ्यात कारखान्याला भीषण आग अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटींच्या मानहानीची नोटीस

सनातन संस्थेला दहशतवादी म्हटल्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटींच्या मानहानीची नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटिशीद्वारे चव्हाण यांना बिनशर्तपणे माफी मागण्यात यावी;अन्यथा कायदेशीर कारवाईला समोरे जावे, असा इशारा देण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भगवा दहशतवाद, नव्हे तर हिंदुत्ववादी किंवा सनातन दहशतवाद असं म्हणावं, असं म्हटलं होतं.

Prakash Ambedkar : शरद पवार हे भाजपचे हस्तक : प्रकाश आंबेडकरांचा आरोप

ज्येष्ठ नेते शरद पवार हे भारतीय जनता पक्षाचे हस्तक आहेत. त्यातून ते कधीही बाहेर पडू शकत नाहीत. देशपातळीवर खेळणारी माणसं वेगळी आहेत आणि तुमच्यासमोर खेळणारी माणसं वेगळी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी लढण्याची ताकद आज कुणामध्ये आहे. पण येत्या पंधरा दिवसांत देशाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे, असे भाकित वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले आहे.

Supriya Sule  : खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीचे तपशील मिळू शकलेले नाहीत. मात्र, या भेटीची चर्चा रंगली आहे. सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

Rahul Gandhi : एकाच व्यक्तीचे चार राज्यात मतदान : राहुल गांधी

महाराष्ट्रात लोकसंख्यपेक्षा जास्त मतदार आढळून आलेले आहेत. एकाच व्यक्तीने चार राज्यात मतदान केले आहे, एकाच व्यक्ती महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतदार आहे. एकाच व्यक्तीचे फोटो चार बूथवर आढळून आले आहेत. एकाच घरात ८० मतदारांची नोंद आढळली असून अशी एका मतदारसंघात हजारपेक्षा जास्त उदाहरणे आहेत. एकाच पत्त्यावर १० हजार ४२५ मतदार दिसून आलेले आहेत. महाराष्ट्रात अवघ्या पाच महिन्यांत इतके मतदार कसे वाढले. महाराष्ट्रात ४० लाख संशयास्पद मतदार आहेत, पण मतदारयाद्या दाखविण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

Ajit Pawar : मधल्या काळात बीडची बदनामी झालीय, त्यातून आपल्याला सावरावं लागेल : अजित पवार

मधल्या काळात आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी झाली, त्यातून आपल्याला सावरावे लागेल. चुका सुधाराव्या लागतील. जे चुकत असतील, त्यांना शासन (कारवाई) करावं लागेल. जाती पातीचा, नात्या गोत्याचा विचार करू नका, असे आम्ही पोलिसांना सांगितले आहे. जे चुकेल, मग तो कोणीही असू द्या. कुठल्याही पक्षाचा असू द्या. सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्षाचा असूद्या. त्यांना कायद्यानुसार शासन झालं पाहिजे, कायदा सर्वांना सारखा आहे, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये दिला.

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात अवघ्या पाच महिन्यांत वाढले पाच वर्षांत वाढतात तेवढे मतदार : राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने मोठे यश मिळविले होते. पण अवघ्या काही महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. अवघ्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात पाच वर्षे वाढतात, तेवढे मतदार वाढले होते. सत्ताविरोधी मतदानाचा सर्वांनाच फरक पडतो, मग भाजपलाच कसा फरक पडत नाही, असा सवालही राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

Rahul Gandhi Live : महाराष्ट्रातील निवडणुकीवर प्रश्न उपस्थित

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत प्रश्न उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होतो, पण विधानसभेत पराभव कसा झाला, याबाबत त्यांनी पुन्हा संशय व्यक्त केला. नव्याने वाढलेले मतदान, संध्याकाळनंतर झालेले मतदान आदी मुद्द्यांवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

Ajit Pawar News : बीड लवकरच विकसित शहर!

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. या वाटचालीत बीडकरही खंबीरपणे आमच्यासोबत सहभागी आहेत. त्यामुळं प्रत्येक वळणावर त्यांचं सहकार्य आमच्यासोबत असेल आणि बीड लवकरच विकसित शहर म्हणून ओळखलं जाईल, असा मला विश्वास उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.

Shiv Sena News : स्मार्ट सिटीचा विस्तार होणार का?

स्मार्ट सिटी मिशनचा विस्तार नवीन शहरांसाठी करणे सरकारच्या विचाराधीन आहे का? तसेच जी शहरे एससीएम अंतर्गत तयार करण्यात आली आहेत अशा शहरांच्या दिर्घकालीन आरक्षण आणि देखभालीसाठी आर्थिक मॉडेल तयार करण्यात आले आहे का? असे प्रश्न शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत उपस्थित केले.

Congress News : बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शदचंद्र पवार पक्षाला गुरूवारी धक्का बसला आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुर्राणी यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी दुर्राणी यांच्या अनेक समर्थकांनीही काँग्रेसचा हात हातात घेतला.

Rahul Gandhi update : राहुल गांधींची पत्रकार परिषद

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारतीय निवडणूक आयोगावर मतांची चोरी होत असल्याचा सातत्याने आरोप करत आहे. याबाबत आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले होते. लवकरच याचा खुलासा करणार असल्याचेही ते म्हणाले होते. यापार्श्वभूमीवर आज दुपारी दीड वाजता दिल्लीत त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे यावेळी ते निवडणुकांबाबत काही गौप्यस्फोट करणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Amol Kolhe News : हे खरंच गरजेचं आहे का?

खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आई तुळजाभवानी म्हणजे सबंध महाराष्ट्राची कुलस्वामिनी. आजपर्यंत महाराष्ट्रातील असंख्य पिढ्या श्रीक्षेत्र तुळजापूर येथे आईच्या चरणी नतमस्तक झाल्या, त्या पवित्र गाभाऱ्यात खुद्द स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कुलदेवीला वंदन केले, त्याच कळसाला नमस्कार करून असंख्य भाविक धन्य झाले. आता "विकास" या गोंडस नावाखाली मंदिराचा मुख्य गाभारा, मुख्य कळस पाडण्याचे सरकारने ठरवले आहे. माझी महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे. सर्व भाविकांच्या भावना लक्षात घेता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारावा... हे सगळं खरंच गरजेचं आहे का?, असा सवाल कोल्हेंनी केला आहे.

चौकशीसाठी हजर रहा..किशोर शिंदे यांच्यासह मनसैनिकांना नोटिसा 

शिवाजीनगर पोलिसांकडून किशोर शिंदे यांच्यासह मनसैनिकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्या प्रकरणी किशोर शिंदे आणि मनसे निकाने विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी या सर्वांना हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

Jalgaon News : जळगाव बाजार समितीच्या सभापती विरोधात अविश्वास 

जळगाव बाजार समितीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सभापती शामकांत सोनवणे यांच्या विरुद्ध 13 संचालकांनी अविश्वास ठराव आणला आहे. हे सर्व 13 संचालक सहलीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. या संचालकांमध्ये ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या संचालकांचा देखील समावेश आहे.

Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात मोठा घोटाळा

कोरोना काळात नाशिक जिल्हा रुग्णालय आणि आणि मालेगाव सामान्य रुग्णालयातील मॉड्युलर आयसीयू उभारणीचे काम एका बनावट परवानाधारक कंपनीकडे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.

Rohit Pawar : परिवहन मंत्र्यांनी मांडवली करत स्पॉन्सरशीप मिळाली - रोहित पवार

रॅपिडो बाईक आली.. त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली... बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली... मंत्र्यांनी ’रॅपिड’ भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशीप मिळाली... यावरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतंय, हे स्पष्ट होतं! पण मला सरकारला विचारायचंय की हा मंत्रीपदाचा गैरवापर तर नाही ना?

काम केलं नाही तर मंत्री  बदलणार - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सक्त ताकीद दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांपूर्वी वादग्रस्त वक्तव्ये टाळा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. जरी स्थानिकमध्ये यश मिळाले नाही तर मंत्र्यांचे खाते काढण्याचा इशारा देखील शिंदेंनी दिल्याची चर्चा आहे.

15 ऑगस्टला चिकन, मटन शाॅप बंद

कल्याण-डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटण शाॅप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून छोट्या आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Eknath Shinde : महायुतीलवादावर शिंदेंची शहांकडे तक्रार

महायुतीमधील अंतर्गत वादाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार केल्याची चर्चा आहे. पालकमंत्रिपदाबाबतदेखील शहांनी मध्यस्थी करण्याची विनंती शिंदेनी केल्याचे बोलले जात आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला

लातुरात 66 हजार 379 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला, 24 हजार लाभार्थिनी अपात्र असल्याचे समोर आले आहे. एकाच घरात दोन महिला लाभ घेत आहेत का, सरकारली नोकरी असूनही देखील लाभ घेतला जात असल्याबाबत पडताळणी करण्यासाठी लाडक्या बहिणींचा लाभ थांबण्यात आल्याची माहिती आहे.  

पुणे विभागात ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः पुणे विभागात मागील सात महिन्यामध्ये रूग्णांना तब्बल ५४ कोटी ९१ लाख ३७ हजार रूपयांची मदत दिली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई,१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथक १ व ३ च्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत १९ लाख ७१ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आला आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ व ३ चे निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार मंगळवारी (५ ऑगस्ट) मार्केट यार्ड पुणे तसेच शेलपिंपळगाव ता. खेड व आंबी ता. मावळ या तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून ५ वाहनांसह ३ हजार २२० लिटर गावठी हातभट्टी दारु असा एकूण १९ लाख ७१ हजार २०० रुपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

MPSC Exam : गट क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मुख्य परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांची बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT