Shashikant Shinde  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Updates : सरकारमधील सर्वच यंत्रणा आपल्याच बापाची, त्यातूनच पडळकरांची जीभ घसरतेय; शशिकांत शिंदे यांचा घणाघात

Sarkarnama Headlines Updates : 01 ऑक्टोबर 2025 रोजीच्या राज्यसह देशातील दिवसभरातील विविध महत्त्वाच्या घडामोडी. रात्री उशिरा कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. तर गोपीचंद पडळकरांनी पुन्ह एकदा जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका केली आहे. अनिल देशमुखांवर झालेला हल्ला खोटा, पोलिसांचा खळबळजनक दावा.

सरकारनामा ब्युरो

Shashikant Shinde : सरकारमधील सर्वच यंत्रणा आपल्याच बापाची, त्यातूनच पडळकरांची जीभ घसरतेय; शशिकांत शिंदे यांचा घणाघात

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर पुन्हा टिका केली. मुख्यमंत्र्यांनी समज देऊन देखील जाणीवपूर्वक होत आहे. विधिमंडळात झालेल्या मारहाणीचे समर्थन कोण करत असले, तर कायदा, सुव्यवस्था, न्याय मागण्याची खंत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. भाजपने सुसंस्कृतपणा असल्याचे दाखवू नये, सरकारमधील सर्व यंत्रणा आपल्याच बापाच्या असल्याचे समजून अशा प्रकारच्या टिका होत असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.

Yashomati Thakur : शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा, यशोमती ठाकुर यांनी चालवला ट्रॅक्टर

Yashomati Thakur 1

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसील कार्यालयावर शेतकरी व काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा काढला. माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी मोर्चात स्वतः ट्रॅक्टर चालवला. यावेळी त्यांनी भाजप महायुती सरकारवर जोरदार टिका केली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी व शेतकऱ्यांना सातबारा कोरा व्हावा, अशी प्रमुख मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.

Naresh Mhaske On Sanjay Raut : संजय राऊत यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व बाजूल ठेवलं; खासदार नरेश म्हस्के यांची जोरदार टिका

'संजय राऊत आणि शिवसेना पक्ष यांचा संबंध आला का? जेव्हा 'सामना'चा पगार चालू झाला नव्हता, तेव्हा पाकिट घेऊन लिखाण करणारा हा व्यक्ती आहे. हा बिळात लपणारा उंदिर आहे. कायम दलाली करणारा माणूस आहे, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवणारा माणूस आहे,' असा घणाघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केला.

Rohit Pawar And Gopichan Padalkar : आमदार रोहित पाटील यांची गोपीचंद पडळकर यांच्यावर घणाघात

"वारंवार सारखं कुणाला तर खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं आणि सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या. पण सभा संपली की माणसं विसरून जातात. त्यातून लोकांचा पोट भरत नाही. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचा काम त्यांच्याकडून होत असेल, ज्येष्ठांचा सन्मान राखला जात नसेल, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर द्यावे लागेल," असा टोला आमदार रोहित पाटील यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा खालच्या भाषेत टिका केली आहे.

Vaibhav Naik : अभियंत्याला मारहाणप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा

Vaibhav Naik

गोवा महामार्गावर झाराप तिठा इथं मंगळवारी झालेल्या दुचाकी आणि कार अपघातानंतर नागरिकांनी महामार्ग रोखून धरला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी येत महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंखे यांना धक्काबुक्की व मारहाण केली. तसंच ठार मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारची तक्रार कुडाळ पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. ही तक्रार कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंखे यांनी पोलिसांत दिली आहे.

Prakash Ambedkar And Rahul Gandhi : मोंदीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र येऊ शकतो; प्रकाश आंबेडकराचं सूचक विधान

Prakash Ambedkar

मत चोरीच्याच नव्हे, तर सर्वच मुद्द्यावर राहुल गांधींसोबत एकत्र यायला हरकत नाही. मतचोरीच नव्हे तर मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी एकत्र येण्यात काहीच अडचण नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

Prakash Ambedkar And Anandraj Ambedkar : आंबेडकर बंधू एकत्र येण्यास काहीच हरकत नाही; प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

ठाकरे बंधू एकत्र आले तसेच आंबेडकर बंधू एकत्र येण्याच्या आनंद आंबेडकरांच्या वक्तव्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. आंबेडकर बंधू एकत्र येण्यास कोणतीही अडचण नाही. या प्रक्रियेतील काही गोष्टी कौटुंबिक पातळीवर झालेल्या चर्चेतील असल्यामुळे त्या सांगता येणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

Prakash Ambedkar : भाजपसोडून युतीसाठी स्थानिक नेतृत्वाला मुभा; प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर कोणाचीही स्थानिक पातळीवर एकत्र येण्यासाठी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला मुभा दिल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत युती करण्यातही आपली कोणतीही हरकत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Dharashiv Farmer : अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं नुकसान झाल्याने धाराशिवमधील शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचं नुकसानीने धाराशिवमधील शेतकऱ्याने आत्महत्या केली. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर इथल्या शेतकऱ्यांने गळफास घेतला. उमेश सूर्यकांत ढेपे (वय 45) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. अणदूर इथल्या आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.

Pimpri Chinchwad Police : वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेलं 23 कोटी 31 लाख रुपयांचं अंमली पदार्थ पोलिसांकडून नष्ट

Pimpri Chinchwad Police

पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी आयुक्तालय हद्दीत केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेला जवळपास 23 कोटी 30 लाख 92 हजार 750 रुपये किमतीचा अंमली पदार्थ पोलिसांनी भट्टीत जाळून नष्ट केलं आहे. यात जवळपास 662 किलो 455 ग्रॅम गांजा आणि 19 किलो 997 ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्स या अंमली पदार्थांचा समावेश आहे.

Ravi Rana Vs Bachchu Kadu : आमदार रवी राणा यांचा नाव न घेता बच्चू कडू यांच्यावर घणाघात...

Ravi Rana Vs Bachchu Kadu

"आपल्या जिल्ह्यात टपोरी लोक आहेत. त्यांच्या संपत्तीची पूर्ण यादी आमच्याजवळ आहे. जे स्वतःला शेतकरी नेते म्हणतात, महाराष्ट्रमध्ये फिरत आहे, आमच्या जिल्ह्यातला माजी आमदार आहे. आपल्या संपत्तीमधील दहा टक्के जरी शेतकऱ्यांसाठी वाटप केली, तर थोडी माणुसकी शेतकऱ्यासाठी राहील. राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची हे त्यांचं काम आहे," असा घणाघात माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर आमदार रवी राणा यांनी केला.

फेकायचं म्हणजे किती ? अंधारेंचा शेलारांना टोला

फेकायचं म्हणजे किती ? त्याला काही मर्यादा आहेत की नाही? भाजप आणि या तीनचाकी रिक्षा सरकारचं असं झालंय की चाराण्याची मदत आणि बाराण्याची जाहिरात... धडधडीत चेक अकरा लाखाचा दिसतोय आणि आशिष शेलार ट्विटमध्ये 55 लाख रुपये सांगतात.. काय शेलार ठाकरेंवर दिवस रात्र टीका करून करून मेंदू झिजला की काय? तुमच्या या असल्या वाढीव गुणामुळेच फडणवीसांनी तुम्हाला बाजूला ठेवून कंबोजला जवळ केलाय बहुतेक. ? सुधरा जरा...!, असे ट्विट करत सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली.

शक्तिपीठचे 20 हजार कोटी नुकसानग्रस्तांना द्या

१५ रूपये प्रतिटन ऊस उत्पादक शेतक-यांचे कपात करून १८० कोटी रूपयाची मदत गोळा करण्यापेक्षा शक्तीपीठ महामार्गाचे २० हजार कोटी पुरग्रस्तांना द्या, अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

सरकारने शेतकऱ्यांचा खिसा कापला - रोहित पवार

पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० रुपये असा टनामागे १५ रु. कपात करण्याचा निर्णय घेऊन या सरकारने शेतकऱ्याचाच खिसा कापला. ही एकप्रकारे आधुनिक टोलवसुलीच आहे. देवाचंच घेऊन देवाला लावणाऱ्या या सरकारमध्ये पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणण्याची हिंमत नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तसेच अजूनही काही भागात पूरस्थिती आहे. त्यामुळे सन २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन ५ रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Amit Shah : सहकार मंत्री अमित शहा 5 ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर दौऱ्यावर

प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे शहा यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे. यासह शहांच्या हस्ते लोणी येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावर केलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पर्यावरण तथा पशुसंवर्धन विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे इतर लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित राहणार आहेत.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींमुळे 361 आमदारांचा निधी रखडला

लाडकी बहिण आणि इतर काही लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा आणि विधान परिषेदेच्या 361 आमदारांचा निधी गेल्या 6 महिन्यांपासून रखडला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. स्थानिकच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तरी निधी मिळावा, अशी मागणी या आमदारांकडून केली जात आहे. तर लाडकी बहीण योजनेमुळे हा निधी थांबवल्याची तक्रार आमदार करत आहेत.

Chennai : चेन्नईत थर्मल पॉवर प्लांटचं छत कोसळून 9 जणांचा मृत्यू

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधील एन्नोर थर्मल पॉवर स्टेशनच्या बांधकामाच्या ठिकाणी छत कोसळून भीषण दुर्घटना घडली आणि या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण गंभीर जखमी झालेत.

Kolhapur Accident : कोल्हापुरातील इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेच्या अग्निशामन विभागाच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली आहे. इमारतीच्या स्लॅबखाली अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, या दुर्घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

Kolhapur : कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला

महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू असताना साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. स्लॅबखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. तर घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार, माजी आमदार ऋतुराज पाटील दाखल झाले आहेत.

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील 'तो' हल्ला खोटा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाच नव्हता असा अहवाल नागपूर ग्रामीण पोलिसांनी कोर्टात सादर केला आहे. 18 नोव्हेंबर 2024 रोजी अनिल देशमुख यांच्या कारवर प्रचारा दरम्यान दगडफेक करुन हल्ला करण्यात आला होता. याबाबतची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती. या हल्ल्यामध्ये देशमुखांच्या डोक्याला मार लागला होता. या हल्ल्याची फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासणी केल्यानंतर तयार झालेला बी फायनल रिपोर्ट पोलिसांनी आज कोर्टात सादर केला. पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये FIRमध्ये दिलेला घटनाक्रम झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT