नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अनुपस्थित होते. जयंत पाटील अनुपस्थित असल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या शिबिराला जयंत पाटील हे उशिराने दाखल झाले.
भारत–पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या निर्णयावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आक्रमक झाला आहे. महिला आघाडीतर्फे आज अमरावती इथं आंदोलन करण्यात आलं. ‘माझं कुंकू – माझा देश’ या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत ठाकरे सेना पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकार एकीकडे देशभक्तीचे गोडवे गातं आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत खेळ खेळतं, हे देशाच्या भावनांशी खेळ करणं आहे, असं कार्यकर्त्यांनी घणाघात केला.
राज्याच्या काही भागात पुढील तीन तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मुंबई, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, ठाणे या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेची होण्याची शक्यता आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध सुरू केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली जात आहे. 26 भारतीयांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तान स्थित दहशतवादाची आठवण करून दिली जात आहे. शिवसेना ठाकरे सेना पक्षाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा हातात सिंदूरच्या डब्या घेऊन निषेध केला आहे.
मावळात राजकीय भूकंप, राष्ट्रवादीचे शेकडो पदाधिकारी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रवादीचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी मनगटाचे घड्याळ सोडून घेणार उद्या कमळ हाती घेणार आहेत. उद्या अकरा वाजता मुंबई इथल्या भाजप कार्यालयात संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापू भेगडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाबुराव वायकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
विरार रेल्वेस्थानकातून दादरकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका माथेफिरू तरुणाने महिला डब्यातील प्रवाशांना अश्लील शिवीगाळ तसेच हावभाव करून धुडगूस घातला. यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते. या माथेफिरूने ट्रेनच्या मालवाहू डब्यातून महिला डब्याच्या खिडकीवर आणि पत्र्यावर लाथाबुक्क्या मारून अक्षरशः दहशत निर्माण केली होती. यावेळी मदतीसाठी महिला प्रवाशांनी रेल्वेच्या हेल्पलाइनवर फोन करूनही त्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात शुक्रवारी सुनावणी झाली. कोठडीतील मृत्यूप्रकरणी दिशादर्शक चौकट निश्चित करण्यासंदर्भात मुख्य सचिवांनी 3 ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट शपथपत्र दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती हितेन एस. वेनेगावकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रवेश शुल्क 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान भरता येणार आहे. 23 नोव्हेंबरला ही परीक्षा होईल.
पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 8 पट्टेरी वाघ आणण्यासाठी अखेर केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली. मंत्रालयातील उपसंचालक (वन्यजीव) डॉ. सुरभी राय यांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव यांना याबाबत पत्र पाठवले असून या पत्रात ताडोबा अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्पातून 3 नर आणि 5 मादी, असे ८ वाघ जेरबंद करण्याची परवानगी दिली आहे.
खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावं की न बघावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काहीना काही भूमिका घेण्याचं निमित्त विरोधक पाहात असतात. फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आवाहन आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर दिली आहे.
"माझी दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतोय पण हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी जीवन संपवतोय..."; अशी चिठ्ठी लिहित लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावातील शिवाजी वाल्मिक मेळ्ळे (32) नावाच्या व्यक्तीने जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शनिवारी (ता.13) संध्याकाळी विजेच्या प्रवाहाचा धक्का घेत जीवन संपवलं. मेळ्ळे यांनी वर्षभरापूर्वी त्यांच्या मुलांना महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांना ते प्रमाणपत्र मिळाले नाही. प्रमाणपत्र नसल्याने मुलांना शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. अशातच कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणावामुळे त्यांनी आपलं जीवन संपल्याचं सांगितलं जात आहे.
मराठा समाजानंतर बंजारा समाज रस्त्यावरती लढाई लढणार असल्याचं वंजारी समाजाचे नेते जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगितलं आहे. वंजारी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी बाळासाहेब सानप यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वंजारी समाज बांधव निवेदन देणार आहेत वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू आता माघार नाही, अशी देखील भूमिका सानप यांनी घेतली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा तीव्र विरोध काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी केला आहे. तसंच त्यांनी शहीदांच्या रक्ताची किंमत या सरकारला आहे की नाही? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. यशोमती ठाकुर म्हणाल्या की, ज्यांच्या हल्ल्यामुळे आपले जवान प्राण गमावतात, त्याच देशासोबत क्रिकेट खेळणे योग्य आहे का? शहीदांच्या रक्ताची किंमत या सरकारला आहे की नाही? असा सवाल करत. केंद्र सरकारने अशा सामन्यांना हिरवा कंदील देण्याऐवजी पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली.
भाजप नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यानी जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करु नका. कितीतरी लोक आपल्यावर टीका करणारे होते पण आज ते आपल्याकडे आले. जो या पक्षामध्ये काम करेल त्याला पक्षात किंमत आहे. फक्त फोटोबाजी करणाऱ्याला किंमत नाही. कार्यकर्ता छोटा जरी असला तरी त्याला पक्षात घ्या. त्याचे स्वागत करा, असं ते म्हणाले.
मूढंवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक त्या सर्व पर्याय विचारात घेऊन पुणे महानगर पालिका, पोलीस प्रशासन, पीएमपीएल, लोकप्रतिनिधींनी मिळून बैठक आयोजित करुन योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केली. त्यांनी आज सकाळी मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथे वाहतूक कोंडीची पाहणी केली.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ती सोडवा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पवार यांनी खराडी ते केशवनगर पुलाच्या कामांसह मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथे वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता स्थळ पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
बविआचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद खाटीक यांनी सातिवली, वालीव, कामण या भागातील त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह पालघर जिल्हा संपर्क मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख माजी मदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
शासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा अधिक बळकट करण्यासोबतच नागरिकांचे विविध प्रश्न, समस्या समजून त्या सोडवण्याकरिता नेताजी सुभाष मंगल कार्यालय, मांजरी रोड, हडपसर येथे आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, नागरिकांच्या समस्या थेट लोकप्रतिनिधीसमोर मांडण्याची संधी मिळल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याच्या कर्मचाऱ्यांनी आधीच केलेलं काम पुन्हा करत असल्याचं भासवून, थेट राज्याच्या तिजोरीतून तब्बल २२ कोटी रुपये उचलण्याचा प्रकार सामाजिक न्याय विभागात घडला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याचं काम शासन सेवकांनी आधीच पूर्ण केलं होतं. तेच काम पुन्हा दाखवून,तब्बल १७५ रुपये प्रति ओळखपत्र या दराने १२.५ लाख ऊसतोड कामगारांच्या नावाखाली तब्बल २२ कोटी रुपये काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. .हा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशावर उघड उघड डल्ला आहे. ज्यांनी सामाजिक न्याय द्यायचं काम करायचं, तेच आज अन्याय, फसवणूक आणि लूट करत बसले आहेत, असे कुंभार यांनी म्हटले आहे. या आरोपामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.