सुरज चव्हाण आमच्या पक्षाचा जुना आणि ज्येष्ठ सहकारी असल्यानचं फेरनियुक्ती केल्याचं प्रफुल पटेलांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे युवकचे माजी अध्यक्ष सुरज चव्हाण त्यांना आम्ही पक्षाच्या राज्य पातळीची जबाबदारी दिली आहे. हा निर्णय सुनील तटकरे आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांनी बसून घेतलेला आहे. शेवटी एक काम करणारा माणूस त्यांच्या हातून जर काही चूक झाली असेल तर त्यांना आम्ही त्या पदावरून हटवलं. शेवटी तो आमच्या पक्षाचा जुना आणि ज्येष्ठ सहकारी आहे. त्यामुळे त्याला काहीतरी जबाबदारी दिली पाहिजे म्हणून त्याची आम्ही नियुक्ती केली आहे.
कोणाच्या वक्तव्यावर मला उत्तर द्यायला लावता. मला छोटं करू नका, असं वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आमदार रोहित पवार यांना टोला लगावला. 40-40 वर्ष ज्या लोकांनी राजकारणात घालवले. त्यांना या नवीन लोकांच्या काही टोमण्यांचे उत्तर द्यायला लावता, आमचे पण काही स्टॅंडर्ड आहे, असा चिमटाही पटेल यांनी रोहित पवारांना काढला. जर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपची साथ सोडली आणि ते पुरोगामी विचार स्वीकारून शरद पवारांच्या नेतृत्वात यायला तयार असतील, तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केले होते.
2047 मध्ये भारताला जगाची गरज पडणार नाही तर जगाला भारताची गरज पडणार असल्याचं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. कंसरुपी मायावी कॉंग्रेस पार्टीला वरुड मोर्शीत भुईसपाट करायचं असल्याचे बावनकुळे म्हणाले. आजचा पक्ष प्रवेश अमरावती जिल्ह्यातील काँगेसला धक्का देणारा आहे. उत्तर, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक नेत्यांनी काँगेस सोडल्याचे बावनकुळे म्हणाले. काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपात प्रवेश केला.
लातूर-धाराशिव आणि बीड जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असलेल्या मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे हे मुख्य धरण 90% पेक्षा अधिक भरल्यामुळे प्रशासनाने दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मांजरा धरणातील 4 वक्रद्वारे प्रत्येकी 0.25 मीटर उंचीने उघडून 3494.28 क्यूसेक्स (98.96 क्यूमेक्स) इतका विसर्ग मांजरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील लोअर दुधना प्रकल्पाचा मुख्य कालवा पावसाच्या पाण्याने भरला आणि ओव्हर फ्लो होवून 4 ठिकाणी फुटल्याची घटना घडली आहे. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. डिग्रस गोकुळवाडी, मांडवा, नंदापूर या गावच्या शिवारात हा प्रकार घडला आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झालं आहे.
राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच आता महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे दही हंडीची रस्सी बांधताना खाली पडून एकाचा मृत्यू झाला आहे. दही हंडीची रस्सी बांधताना बाल गोविंदा पथकचा एक सदस्य खाली पडला होता, लगेज त्याला गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र भर्ती करण्याच्या पूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जगमोहन शिवकिरन चौधरी (32) असं या गोविंदाच नाव आहे.
नाशिक पंचवटी परिसरातील एका इमारतीत परप्रांतीय व्यक्तीकडून स्थानिक रहिवाशांवर दादागिरी, असभ्य वर्तन आणि त्रास दिल्याचा प्रकार समोर आला होता. महिलेसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अंतर्वस्त्रे बाहेर वाळत घालणे यांसारखे आक्षेपार्ह प्रकार या व्यक्तीकडून सुरू होते. या विरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या अंगावरही तो धावून घेला होता. स्थानिक नागरिकांनी मनसेकडे धाव घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी त्रिपाठी नावाच्या या परप्रांतीयाला चांगलाच चोप दिला आहे.
गोकुळाष्टमी आणि दहीहंडी आपला पारंपारीक सण आहे. थरावर थर लावून दहीहंडी फोडली जाते. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अंगाने सर्वांना एकत्र आणण्याचं ते व्यासपिठ आहे. दहीहंडीची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. त्याच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रात विकासाचे थर लावतोय. लोकाभिमुख सरकार देण्याचा आमचा संकल्प आहे असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
नंदूरबार जिल्हात भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपाचे माजी नेते आणि मंत्र्याने काँग्रेसचा ‘हात’ धरला आहे. हा नेता दुसरा तिसरा कोणी नव्हे तर नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी हे आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन वळवी यांनी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला मात्र खिंडार पडण्यास सुरूवात झाल्याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पद्माकर वळवी यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
मघा काहींनी (रोहित पवार यांना नाव न घेता उद्देशून) सांगितलं की, दादाचं गावकीकडं लक्ष आहे, जरा भावकीकडंही लक्ष द्या. अरं भावकीकडं लक्ष दिलं; म्हणूनच तू आमदार झालास. जयंतराव त्याला विचारा, किती मतं पडली आहेत, पोस्टल बॅलेटवर आला आहात आपण, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला.
वाळवा तालुक्यातील एखादा विद्यार्थी खंडपीठाच्या न्यायाधीशपदी बसेल, असं आपलं स्वप्न आहे. वाळवा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. या तालुक्याला स्वातंत्र्यसैनिकांची फार मोठी परंपरा आहे. या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटीशांशी लढताना कधी माघार घेतली नाही. लढाई करायची तर शेवटपर्यंत निकाराने करायची, हा या तालुक्याचा आदर्श आहे. आमच्या तालुक्याचा हा प्राब्लेमही आहे. सहजासहजी हा तालुका वाकत नाही, शरण जात नाही. लढाई करायची असेल तर कितीही फंदफितूरी झाली तरी सोबत असणाऱ्यांना घेऊन लढायचं, हे एनडी पाटील यांच्यापासून सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी आम्हाला शिकवले आहे, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
आमचा अजित वरून नारळासारखा कठोर वाटतो. पण फार प्रेमळ आहे. नारळाचं पाणी जसं आतून गोड असतं. तसा तो आहे. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. पण आज जरा घाई करू नका बाबा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांच्या आत्या सरोज पाटील यांनी जाहीररित्या कौतुक केले.
नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी माजी मंत्री आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री प्रा. वसंत पुरके उपस्थित होते. वळवी यांचे मी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. लवकरच नंदूरबार येथे मोठा कार्यक्रम करून त्यांच्या सहकाऱ्यांनाही काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश देण्यात येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
पुणे-नाशिक महामार्ग, चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर तसेच चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. या मार्गांवरील वाहतूक कोंडी सुटावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच या मार्गाची पाहणी केली. या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन मार्ग होणे अपेक्षित आहे. त्यासाठी या मार्गालगतची अतिक्रमणे पीएमआरडीए, चाकण नगरपरिषद आणि संबंधित विभाग संयुक्त कारवाई करून काढून टाकणार आहे. ही कारवाई साधारणपणे १ सप्टेंबरपासून सुरू होईल, असे ‘पीएमआरडीए’ चे आयुक्त योगेश म्हसे यांनी सांगितले.
आज देशभरात दहीहंडी जल्लोषात साजरी केली जात आहे. अनेक राजकारण्यांनी देखील दहीहंडीचं आयोजन केलं आहे. अशातच आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लावला आहे. दहीहंडीचा उत्सव साजरा करूया, पण फक्त हंडीतील लोण्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना आता घरी पाठवूया, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. गोपाळ काल्याच्या शुभेच्छा देताना त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं की, दहीहंडी जल्लोषात साजरी करूया पण फक्त हंडीतील लोण्यावरच लक्ष ठेवणाऱ्याना आता घरी पाठवूया मुंबई महापालिकेची हंडी वर्षानुवर्षे उबाठावाले फोडत आले. खालच्या थराला सामान्य मुंबईकर पिचत होता. मुंबईकर कर भरत हंडी भरायचा.
त्यांच्या अंगाखांद्यावर चढलेला कृष्णाचं सोंग घेतलेला पेंद्या मात्र महापालिकेच्या हंडीतील रस्ते, नालेसफाई, पाणी आणि खड्ड्यांच्या कंत्राटातूनही अलगद लोण्याचा मलिदा काढून ओरपायचा आणि मुंबईकरांच्या माथ्यावर हंडीची खापरं फोडायचा… ही फुटकी खापरं घरात ठेवून वर्षानुवर्षे मुंबईकराने समृद्धीची स्वप्ने पाहिली, पण या समृद्धीने कधी कलानगराचा उंबरठा ओलांडलाच नाही. आता नव्या हंडीला यांची सलामी पण नकोशी झाली आहे. अटलसेतू, कोस्टल रोड, मेट्रो, बीडीडी वासीयांना नवी घरे व सुरक्षेच्या हमीसोबत विकासाची हंडी फोडून समाधानाचे लोणी थेट जनतेला वाटणारे देणारे नेतृत्व राज्यात देवेंद्रजीच्या रूपाने आहे. कृष्णाचं सोंग घेऊन कंसाच काम करणाऱ्यांना आता कायमचं घरी बसवूया, सकाळी भोंग्याची बांग देणाऱ्या पुतना मावशीला तिची जागा दाखवूया, आणि संकटात गोवर्धन धरणाऱ्या कृष्णाप्रमाणेच मुंबईकरांची काळजी घेणाऱ्या देवेंद्रजीना साथ देऊया… गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा फक्त हंडीतील लोण्यावरच लक्ष ठेवणाऱ्याना आता घरी पाठवूया, भाजपने ठाकरेंना डिवचलं
मुंबईच्या समुद्धीने कलानगरचा रस्ता कधी ओलांडलाच नाही. केवळ हंडीतील लोण्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना घरी पाठवूया भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ठाकरेंना टोला.
मुंबईतील गोरेगाव परिसरात एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीने इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्य केली आहे. 14 ऑगस्टला दुपारी आई-वडील घराबाहेर गेले असताना तिने हे टोकाचं पाऊल उचललं. गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या ओबेरॉय स्क्वायर या इमारतीमध्ये ती राहत होती.
पुण्यातील मद्यधुंद कार चालकाने डिसीपीच्या गाडीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशवनगर भागात रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली. वाहतूक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला धडक दिल्या प्रकरणी दोन आरोपींना मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेष्ठ नेते शरद पवार पुण्यात असून त्यांनी सकाळपासून भेटीगाठी सुरू केल्या आहेत. साखर संकुलातील भेटीनंतर ते दुपारी 3 वाजता किशोर पवार यांच्या स्मृतीदीन कार्यक्रमासाठी एस एम जोशी सभागृहात उपस्थितीत राहणार आहेत. तर तर सायंकाळी 5 वाजता काँग्रेस नेते उल्हासदादा पवार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमसाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे उपस्थितीत राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महायुतीतले सर्वच आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असू त्यामध्ये काहीही गैर नाही असं म्हटलं आहे. शिवाय विरोधक देखील आपापल्या परीने पक्ष वाढवतात. त्यामुळेच मी आज सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तर 25 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यातील देखील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुंबईसह रायगडमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे आज सकाळपासून मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सरासरी अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी रुळावर साचल्याने प्रवाशांना स्थानकांवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवाय शहरातील रस्त्यांनाही नद्यांचे स्वरूप आल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
मुंबईसह रायगडमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज शनिवारी (ता.16) मुंबई, ठाणे, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या कोकण किनारपट्टीच्या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईत आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असून रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पूर्व उपनगरातील विक्रोळी परिसरात आज पहाटे दरड कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
खराडी पार्टी प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने 2022 ते जून 2025 या काळात खेवलकरने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून त्यांचे निर्वस्त्र फोटो संमती नसताना काढल्याचा आणि या फोटोंचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे, अशी फिर्याद महिलेने सायबर पोलिसांत दिली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.