काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपानंतर आज (ता.17) निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. तसेच राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोडून काढत, आमच्यासाठी सर्व पक्ष सारखेच असून आम्ही कोणताही भेदभाव करत नाहीत. त्यामुळे लोकांची दिशाभूल करून संविधानाचा अपमान करू नका. आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणे बंद करा, असे खडेबोलही सुनावले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सपकाळ यांनी, आयोगानं इज्जतीची लक्तरं टांगली असून पत्रकार परिषद हा केविलवाणा प्रयत्न आहे. आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये आकडेवारीवर बोलायला पाहिजे असेही सपकाळ यांनी म्हटलं आहे.
शनिवार (ता. 16) राज्यभर दहीहंडी साजरी करण्यात आली. भाजपसह, मनसे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देखील दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी, आज काही लोक शिवसेनेपेक्षा मोठी दहीहंडी साजरी करत असतील, गणपती उत्सव साजरा करत असतील पण खऱ्या अर्थाने ही परंपरा सुरु करण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून झाले आहे. तुमच्या मागे खोक्यातले पैसे असले तरी आमच्या मागे लोकांचा आशीर्वाद आहे, असेही जाधव यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे ब्रँड संपुष्टात आणण्याचा दावा करत टोला लगावला. मात्र, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पलटवार करत, भाजप ठाकरे ब्रँड मान्य करत असल्याचं सांगितलं. या वादामुळे आगामी निवडणुकांचे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे.
भाजपासोबत येण्याची खूप आधीपासून आमची आणि मोठ्या साहेबांची (शरद पवार) देखील इच्छा होती. मात्र, गाडी स्लीप होऊन जात होती असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं. 2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचा आणि भाजपवाल्यांनी शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरलं होतं असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. ते गोंदियात महायुतीच्या वतीने आयोजित सत्कार समारोप कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
नाशिकचा पालकमंत्री कोणाला करायचं हा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. ते योग्यवेळी निर्णय घेतील, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर अधिक बोलण्याचे टाळले. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा गेल्या कित्येक महिन्यापासून सुटलेला नाही. गिरीश महाजन, दादा भुसे, छगन भुजबळ या तिघांनाही पालकमंत्री व्हायचे आहे. अजित पवारांनी मात्र यावर थेट भाष्य करत तो अधिकार देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचे सांगत भुजबळांनाही टोला लगावला.
भाजपाच्या सोशल मीडिया विभागाने लिहून दिलेली स्क्रिप्ट निवडणूक आयोगाने खाली मान घालून वाचली आहे. त्यामुळे कोणाच्या तरी इशाऱ्यावरुन निवडणूक आयोगाने आजचं मुहूर्त काढलेलं आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाने अत्यंत जबाबदारीने, वस्तुनिष्ठ स्वरुपात चौकशीच्या अनुषंगानं, जबाबदारीनं तथ्य सत्य समोर मांडत असताना उत्तर देणं आवश्यक होतं, असेही काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.
जर युवकांचे भलं करायचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इ डब्ल्यू एस मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं ते आरक्षण त्यांनी घ्यायला पाहिजे. जेणेकरून मराठी युवकांचा विकास होईल. आता तरी जरांगे पाटील यांनी हट्टीपना सोडून द्यावा असे वक्तव्य परिणय फुके यांनी गोंदियात केले.
बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वी त्यांना 10 हजार मतदारांची यादी मागितली गेली होती, आणि जे मतदार त्यांना मत देणार नाहीत, त्यांना यादीतून वगळून त्याऐवजी दुसरे 10 हजार मतदार समाविष्ट करण्याची ऑफर देण्यात आली होती. “माझ्याकडे याबाबत पुरावे आहेत, आणि योग्य वेळी मी त्या संभाषणाची रेकॉर्डिंग, दिलेली नावे आणि सर्व माहिती प्रसारमाध्यमांसमोर आणणार आहे, असे कडू यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.
आता पाकिस्तानचे फक्त पाणी बंद केले आहे, अन्नधान्य पण बंद करु शकतो नंतर भारताच्या समोर कटोरे घेऊन भीक मागण्यासाठी असा हल्लाबोलही नवनीत राणा यांनी केला. बाप तो बाप रहेगा, हिंदुस्तान बाप रहेगा असे त्या म्हणाल्या. पाकिस्तान मुर्दाबाद.. पाकिस्तान सैनिक मुर्दाबाद, असेही नवनीत राणा म्हणाल्या. नवनीत राणा एकाच माणसासमोर झुकते ते फक्त रवी राणा असंही त्या म्हणाल्या.
तुळजाभवानी मंदिराचे शिखर उतरवण्याबाबतचा राणाजगजीतसिंह पाटील यांचा जुना व्हिडिओ दाखवत. तुम्हीच शिखर उतरवण्याबाबत वक्तव्य केलं मग हे षडयंत्र कोणाच? असा सवाल ओमराजे यांनी उपस्थित केला आहे. मंदिरविकास आराखड्याच्या वादात आता खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील असा सामना पाहायला मिळतोय. जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनानंतर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आशिष शेलारांकडे पत्र लिहून तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर पाडण्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत. हे एक षडयंत्र असून याबाबत बैठक घेऊन अफवा पसरवणाऱ्यांना चाप लावावा अशी मागणी केली, पाटील यांनी केली होती.
एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, याचा आनंद आहेच. पण कमावलेले टिकवता आलं पाहिजे, असे विधान भाजप नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघरमध्ये केले होते. त्याला शिवसेनेचे नेते विजय चौघुले यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर गणेश नाईक यांचीच लॉटरी लागली नसती, असा टोला चौघुले यांनी लगावला.
मुख्यमंत्री महोदय, काही लोक सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात कुरघोड्या करत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा शहर उत्तर आहे. आजपर्यंत तुम्ही जे जे आदेश दिले आहेत, ते आम्ही मानत आलो आहेत. पण, शहर उत्तर मतदारसंघातील माझ्या भाजप कार्यकर्त्यांना त्रास दिला, तर ते योग्य उत्तर देतील, असं मी तुम्हाला सांगतो, ही मनातील खदखद सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच बोलून दाखवली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे सर्वोच्च न्यायालयालचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री प्रकाश आबीटकर व मोठ्या संख्येने विधीज्ञ उपस्थित होते.
मी काल मराठवाड्यात होतो. क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्याचं बरं होतं. लय त्रास नव्हता. आता कृषिखात्यात त्रास घ्यावाच लागेल, असे विधान राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापुरातील एका कार्यक्रमात बोलताना केला.
शिवसेनेचे माजी सोलापूर संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली आहे. सावंत यांनी बंद दाराआड पालकमंत्री गोरे यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा केली, त्यातून सावंतांच्या भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. माढा तालुक्यातील विकासकामांच्या निधी मागणीच्या निमित्ताने गोरे यांची भेट घेतली, या वेळी विविध विषयांवर चर्चा झाल्याचे शिवाजी सावंत यांनी सांगितले.
आमच्यासाठी कोणी सत्ताधारी आहे, ना कुणी विरोधी पक्ष नाही. निवडणूक आयोग राजकीय पक्षामध्ये भेदभाव करीत नाही, असे मत निवडणूक आयोगाने रविवारी दुपारी पत्रकार परिषदेवेळी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले. त्यासोबतच येत्या काळात नागरिकांनी मतदानाचा अधिकार वापरण्याचे आवाहन केले. त्यासोबतच येत्या १५ दिवसात यंत्रणेतील त्रुटी सांगा, असे आवाहन राजकीय पक्षांना केले आहे.
अजमेर येथील किशनगढमध्ये पोलिसांनी भाजप नेते रोहित सैनीला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. प्रेयसी रितू सैनीच्या सांगण्यावरून पत्नी संजूची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पती रोहित आणि प्रेयसी रितू दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रकरणाला दरोडा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु पोलिसांनी याप्रकरणाचे गूढ उकलले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. जगदीप धनखड यांच्या प्रमाणे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार देखील बेपत्ता असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे...'राजीव कुमारांना लोकांपासून दूर ठेवलंय' असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी निलेश वाघमारे यांच्या घरी छापा टाकला. या छाप्यात दोन मोबाईल व एक लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी तब्बल तीन तास वाघमारे यांच्या घराची झाडाझडती केली. वाघमारे सध्या तुरुंगात आहेत.
लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्याचे तहसीलदार प्रशांत थोरात यांना सरकारी सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. पूर्वी नांदेडच्या उमरी इथं तहसीलदार पदावर असताना बदली निरोप समारंभाच्या वेळी पदावर बसून गाणे गायले होते. याची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आदेश काढत प्रशांत थोरात यांचे निलंबन केलं आहे .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 घरकुलांचे वितरण होणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित राहणार आहेत. दहिटणे इथल्या 1128 तर शेळगीमधील 220 घरकुलांचे वितरण होणार आहे.
सांगलीच्या इस्लामपूरमध्ये वनश्री युथ फाऊंडेशनकडून महाडिक युवाशक्ती दहीहंडीचे भव्य आयोजन केले होते. ही दहीहंडी तासगाव मधील शिवनेरी मंडळाने फोडली. यावेळी मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. ते म्हणाले, "इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं आहे. तर पुढची दहीहंडी ही ईश्वरपूर नावाने होईल. तसेच मुघलांच्या इतिहासाच्या खुणा पुसण्याचा काम सातत्याने सुरू आहे."
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीला पराभूत झालेल्या उमेदवारांना बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. शरद पवार यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार आदी बैठकीला उपस्थित राहतील. राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठी क्रांती ठोक मोर्चा मैदानात उतरला असून, अहिल्यानगर इथं कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चाने आरक्षणासाठी दिल्ली इथं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा राज्याचा नसून केंद्र सरकारकडे येतो. त्यामुळे राज्यात आरक्षणासाठी आंदोलन उपयोगाचे नसून दिल्ली इथं आंदोलनाचं हत्यार उपसावं लागणार आहे, असं बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली.
'माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत', असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी मत चोरीच्या मुद्यावरून त्यांनी समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे. तसेच याच राजीवकुमार यांनी गद्दारांना चिन्हं दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
''रात गयी बात गई, पुढची इनिंग जोरदार असेल', असे वक्तव्य मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. मागील काळात मंत्री कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्याबाबत बोलताना त्यांनी, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबाबत आता बोलून अर्थ नाही,' मंत्री कोकाटे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या "मत चोरी" च्या आरोपांवरून देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. याच सर्व आरोपांना निवडणूक आयोग उत्तर देण्याची शक्यता आहे. कारण नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये दुपारी 3 वाजता आयोगाकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या आरोपांना आयोग नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आजपासून सासराम येथून 'व्होट अधिकार यात्रा' सुरू केली आहे. मतचोरीच्या प्रकारांविरोधात जनता जागी झाली आहे, असे वक्तव्य केलेला नवा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्याची जाहीर कबुली दिली आहे. शरद पवार म्हणाले, वसंतदादा पाटील हे आमचे नेते होते. मात्र वसंतदादा पाटील हे इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आमचा इंदिरा काँग्रेसला विरोध होता. मला आठवतंय आम्ही काँग्रेसमध्ये होतो. त्यानंतर काँग्रेस दुभंगली. इंदिरा आणि स्वर्णसिंग काँग्रेस वेगवेगळ्या झाल्या. इंदिरा काँग्रेस आणि आम्हाला काही जागा मिळाल्या. यामुळे आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री केले. मात्र, आमचा तरुणांचा इंदिरा काँग्रेसवर राग होता. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचे त्यामुळे आमच्यात एक अंतर होते. वसंतदादांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू केला. याला आमचा विरोध होता. परिणाम असा झाला की, आम्ही ठरवले वसंतदादांचे सरकार घालावयाचे. वसंतदादांचे सरकार आम्ही घालवले आणि मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो मी माझ्या हातात राज्याची सत्ता आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
राज्यभरात काल उत्साही वातावरणात दहीहंडीचा उत्सव पार पडला. मुंबई आणि ठाण्यात तर गोविंदांनी 10 थरांचा विश्वविक्रम रचला. मात्र, दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. या उत्सवात दोन गोविंदाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मानखुर्दमध्ये दहीहंडीचा दोर बांधताना तोल गेल्याने 32 वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर गावदेवी गोविंदा पथकातील रोहन वाळवी नावाच्या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.