सांगलीच्या जतमधील अभियंता प्रकरणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर विरोध जयंत पाटील, असा संघर्ष निर्माण झाला आहे. गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या जहरी टीकेच्या निषेधार्थ जतमध्ये राष्ट्रवादी आणि जयंत पाटील समर्थकांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चासाठी जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते जतसाठी रवाना होत आहेत.
राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात मंत्री छगन भुजबळ सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी पक्षाला पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हल्ले होणार,मात्र घाबरून मागे हटता येणार नाही, असं सूचक विधान भुजबळांनी केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज अंबरनाथ, कल्याणमध्ये दौरा आहे. अंबरनाथ , उल्हासनगर, बदलापूर या नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीसाठी बैठक होत आहे. यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांचा हा पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्या दौरा आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नागपुरात राष्ट्रवादीचं आज चिंतन शिबिर सुरु झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणूक पार्श्वभूमीवर पक्षाचा विस्तार करण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळांसह सर्व नेते,पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा गृहमंत्री अमित शाह यांची मुंबईतील एटीएम मशिन आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्षेत्रीय स्तरावरील समितीने छाननी केल्यानंतरच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून बोगस दाखल्यांच्या आधारे कुणालाही प्रमाणपत्र न देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, तरीही बोगस दाखल्यांच्या आधारे प्रमाणपत्र दिल्याचं पडताळणी समितीच्या लक्षात आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडींची पाहणी करून सोमवारपर्यंत अहवाल द्या, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पथ विभागाला बैठकीत दिली आहेत. शहरातील 32 रस्ते आणि कोंडी होणाऱ्या 22 ठिकाणाची पाहणी करा, असं आयुक्तांनी सांगितलं आहे. पालिका आणि पोलिसांनी प्रयत्न करूनही वाहतूक कोंडी कमी होत नसल्याने आयुक्तांनी हे आदेश दिलेत तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय उपाययोजना करायची यावर निर्णय होणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी काँग्रेसने आंदोलन करण्यात आलं आहे. परीक्षा शुल्कवाढी परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त केला जाणार आहे. विद्यापीठाने परीक्षा शुल्कामध्ये 20 टक्के वाढ केल्याने विद्यार्थी काँग्रेसने त्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने वसमत तालुक्यातील भेंडेगाव या गावांमध्ये दोन गटांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यामुळे भेंडेगावात तणाव निर्माण झाला होता. याची घटनेची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळताच त्यांनी भेंडेगावात जात शांतता प्रस्थापित केली. त्यानंतर जरांगे यांचे समर्थक पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आणि त्यांनी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पुणे शहरातील स्वारगेट परिसरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. स्वारगेट (कै. केशवराव जेधे चौक) येथील भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम आज (ता.19) रात्री 11:00 ते 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत चालणार आहे. या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलीस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे शहर हिंमत जाधव यांनी दिली. तर वाहतुकीत बदल करत या दुरुस्ती कामाच्या काळात, स्वारगेट येथील भुयारी मार्गाने सारसबागकडे (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहनचालकांना भुयारी मार्ग सुरू होण्यापूर्वी डावीकडील रस्त्याने जेधे चौकाकडे जावे लागेल तेथून सारसबागकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना आता e-KYC करणं बंधनकारक करण्यात आल्याचं सांगितलं आहे. https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. शिवाय येत्या दोन महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोवरून आता शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला होता. यावरून ठाकरेंच्या सेनेने आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते, ते फक्त जिल्हाप्रमुख होते. त्यांचा फोटो तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबरीने का लावता? असा सवाल उपस्थित केला आहे. ठाकरेंचे खासदार संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी शिंदेंचा हा कट आहे. तर यावर दिघेसाहेब खोट्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.