Maharashtra Live Updates sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Updates : तारापूर औद्योगिक वसाहतीत मोठी दुर्घटना, गॅस गळतीने 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्युरो

Municipal Elections : महापालिका निवडणूका 'या' महिन्यात होणार?

राज्यातील महापालिका निवडणुकांची प्रक्रिया ही आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रचनाही लवकरच अंतिम होईल. तशी ती राज्य सरकार राज्य निवडणूक आयोगाकडे राज्य निवडणूक सादर केली आहे. यामुळे महापालिका निवडणुकीचा लवकरच पडघम वाजण्याची शक्यता असून डिसेंबर किंवा जानेवारीत (2026) मतदान होऊ शकतं असा आता अंदाज वर्तवला जात आहे.

Omraje nimbalkar News : तुळजापुरातील 6000 बोगस मतदारांबाबत ओमराजे आक्रमक, थेट निवडणूक आयुक्तांनाच सवाल

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या वोट चोरीवरून निवडणूक आयोगावर तुटून पडले आहेत. त्यांनी पुरावे देत यावरून रान उठवले आहे. यामुळे आयोगाला पत्रकार परिषद घ्यावी लागली. यानंतर आता तुळजापूर येथील बोगस मतदार नोंदणी प्रकरणावरून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट निवडणूक आयुक्तांनाच यावरून सवाल केला आहे. ओमराजे यांनी, ळजापुरात विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑनलाइन पद्धतीने 6 हजार बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न झाला होता. त्याची वेळेत तक्रार करुनही कारवाई का केली नाही, असा सवाल केला आहे.

Nitesh Rane News : मटका अड्ड्यावर मंत्री नितेश राणेंची धाड, सापडले लाखोंचे घबाड

कणकवली बाजारपेठेत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या कारवाईत 3 लाखांपेक्षा जास्त रुपये जप्त करण्यात आले आहेत. नेमकं काय घडलं पाहा...

Gas leak in Tarapur industry News : तारापूर औद्योगिक वसाहतीत मोठी दुर्घटना, गॅस गळतीने 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू

पालघरमधून मोठी बातमी समोर येत असून तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका कंपनीत गॅस गळती झाल्यानं चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर दोन जण बेशुद्ध झाले आहेत. यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे.

Congress : मतदार यादीतील घोळाचा आरोप आता महसूल मंत्र्यांच्या मुलावर; काँग्रेस नेत्याचा पुरावे असल्याचा दावा

मतदार यादीतील घोळावरून काँग्रेसने आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केले आहे. मंत्री बावनकुळेंंचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघातील हजारो नावं भरून ती डिलिट करायला लावली. संकेत बावनकुळे यांनी किती नावं भरून डिलिट केली, हे जाहीर करावे; अन्यथा आम्ही पुराव्यासहित जाहीर करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी दिला आहे. एकाच व्यक्तीच्या नावाने संकेत बावनकुळे यांनी हजारो फार्म भरलेले आहेत, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असेही बैस यांनी नमूद केले आहे.

Aaditya Thackeray : ‘बेस्ट पतपेढी समितीची निवडणूक हा ट्रायल बॉल होता; खरी ओव्हर सुरू होईल तेव्हा ताकद दिसेल’

बेस्ट कर्मचारी पतपेढी समितीची निवडणूक हा ट्रायल बॉल होता. तो तसा खेळण्यात आला. नियोजन पुढे-मागे झाले असेल. त्या ठिकाणी अंतर्गत काही फेरबदल होतील, ते पुढे होतीलच. पण, बेस्ट समितीची निवडणूक ही एका युनियनपुरती होती. जो जनतेचा, महाराष्ट्राचा आणि मुंबईचा कल आहे, तो आपल्याला लवकरच दिसेल. दोन पक्ष, दोन भाऊ एकत्र येण्याच्या ताकदीचा धसका ज्यांनी घ्यायचा आहे, त्यांनी घेतला आहे. पण बेस्टची निवडणूक हा ट्रायल बॉल होता, जेव्हा खरी ओव्हर सुरू होईल, तेव्हा ती ताकद तुम्ही बघाल, असे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

VJNT Committee : आम्ही त्या आश्रम शाळांच्या चालकांना धडा शिकवणार : व्हीजेएनटी समिती

सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळांची विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने (व्हीजेएनटी) पाहणी केली आहे. समितीला बहुतांश शाळांत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. संस्थाचालक हे विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा देत नाहीत, त्यामुळे आम्ही तीन महिन्यांची मुदत दिलीय. आम्ही पुन्हा एकदा दौरा करणार आहोत. हे सुधारले नाहीत, तर आम्ही या संस्थाचालकांना धडा शिकवणार आहोत. या सर्व आश्रम शाळांवर प्रशासक नेमण्याची शिफारस करणार आहोत, असे समितीचे प्रमुख आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.

Dhananjay Munde : कृषी विभागातील टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची सचिवांची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली : अंजली दमानिया

कृषी विभागातील गैरव्यवहारप्रकरणी लोकायुक्तांपुढे आज सुनावणी झाली. त्या कृषी विभागाच्या तत्कालीन सचिव व्ही. राधा यांचा एक महत्वपूर्ण अहवाल कृषिमंत्रालयातून गायब झाला आहे, अशी माहिती देण्यात आली. कृषि विभागातील टेंडर प्रक्रियेत झालेला अमाप भ्रष्टाचार, त्यावर व्ही राधा यांनी एक अहवाल बनविला होता, तो अहवाल त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठविला होता. पण मुंडेंनी तत्काळ व्ही. राधा यांचीच बदली करून टाकली. तो अहवाल सध्या गायब आहे, अशी माहिती उपसचिवांनी लोकायुक्तांना दिली आहे.

हा अहवाल मंत्र्यांकडे गेला, त्याचा जावक नंबर आहे, पण मंत्र्यांकडून परत आल्याची नोंद नाही, असे सांगितले आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी मला याबाबत माहिती नाही, मी त्याबाबत माझ्या अशिलाकडून माहिती घेईन, असे लोकायुक्तांना सांगितले. त्यावर दोन आठवड्यात लेखी देण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत, असे सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले.

Bombay High Court : संपूर्ण 10 दिवस कत्तलखाने बंद करण्याची मागणी कोणत्या कायद्यात ?

सध्या श्रावण महिना सुरू असून अर्ध्याहून अधिक मांसाहार करणारे मुंबईकर श्रावणमासानिमित्ताने मांसाहार करत नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तर, संपूर्ण पर्यूषण पर्व काळात कत्तलखाने बंद करण्याचा समाजाला वैधानिक अधिकार आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला आहे. संपूर्ण 10 दिवस कत्तलखाने बंद करण्याची मागणी कोणत्या अधिकारात अथवा कायद्यात बसते, असेही उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलास विचारले. तर, पुढील दोन आठवड्यात पालिकेला आपल म्हणणं मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Sunetra Pawar : मी फक्त दोन शब्दात भूमिका मांडली, माझ्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नका..

‘एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील.’ असं सुनेत्रा पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Chandrashekhar Bawankule : राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले यात राजकीय काही वाटत नाही..

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवरून संजय राऊत यांनी राज ठाकरे गणपतीचे आमंत्रण देण्यासाठी फडणवीसांना भेटले असतील, असा टोला लगावला होता. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले तर त्यात काही गैर नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. "मला याच्यामध्ये राजकीय गंध येत नाही. राजकीय काही वाटत नाही," असे बावनकुळे म्हणाले.

Anjali Damania : ती फाईल धनंजय मुंडे यांना दिल्याची नोंद जावक रजिस्टरमध्ये.. पण नंतर ती परत आलीच नाही..

व्ही. राधा या कृषी सचिव असतांना, कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौडबंगालाच्या रिपोर्टची फाइल त्यांनी मंत्र्यांना पाठवली. मात्र, ही फाइल धनंजय मुंडेंनी गायब केली. लोकायुक्तांच्या सुनावणी दरम्यान, आज मी हे लोकायुक्तांपुढे मांडल्यानंतर, प्रतिभा पाटील नावाच्या उप सचिवांनी लोकायुक्तांना कन्फर्म केले, की ही फाइल मंत्र्यांना दिल्याचा जावक क्रमांक आहे. पण, ही फाईल त्यांच्याकडून राजीनाम्यानंतर परत आली नाही, अशी माहिती अंजली दमानिया यांनी ट्विट करुन दिली आहे.  

Satyajeet Tambe : हा मोर्चा काँग्रेसचा नसून बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा..

बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांचे भाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे मोर्चात सहभागी झाले होते. तांबे पिता पुत्रांवर पक्षाने कारवाई करत निलंबित केले असतानाही सत्यजित तांबे व सुधीर तांबे थोरात यांचे नातेवाईक असल्याने मोर्चात उपस्थित होते. यावेळी सत्यजित तांबे यांनी हा मोर्चा काँग्रेसचा नसून बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा देखील असल्याचे भाषणातून स्पष्ट केले. स्थानिक विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्यावर टीका करताना मी देखील विरोधी आमदार नाही असे सत्यजित तांबे म्हणाले. 

Jalna : अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात दोन तहसीलदारांवर कारवाईचा प्रस्ताव..

जालना जिल्ह्यात 2022 ते 2024 दरम्यान अतिवृष्टीमुळे पीकांचे नुकसान झालेल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचे समोर आले. या प्रकरणात तलाठी, व इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून काही जणांना निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणात दोन तहसीलदारांच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रस्तव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला आहे.

Loksabha Session : लोकसभेच्या अधिवेशनात फक्त 37 तास कामकाज, संतप्त अपक्ष खासदार म्हणतो, वेतनातून खर्च वसूल करा..

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरले. मतचोरी, अमेरिकेने लादलेले टेरिफ, सिंदूर आॅपरेशन दरम्यान अचानक केलेला युद्धविराम अशा विषयांवर लोकसभेत कमालीचा गोंधळ झाला. त्यामुळे नियोजित 120 पैकी केवळ 37 तासच सभागृहाचे कामकाज चालले. यावर नाराज झालेले अपक्ष खासदार उमेश पटेल यांनी वाया गेलेल्या खर्चाची वसुली खासदारांच्या वेतनातून करा, अशी मागणी केली आहे.

मला वाटतं की अजित पवार सत्तेत गेले आहेत. त्याची कारणं वेगळी आहेत. पण तिथं गेल्यानंतर अजितदादांनी संघाचे विचार स्वीकारले नसतील. मात्र त्यांच्यावर कदाचित दबाव असावा. एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, असा दबाव त्यांच्यावर टाकला जात असावा. असा फोटो बाहेर आला की हेसुद्धा आरएसएसचा विचार स्वीकारायला लागले आहेत, असा संदेश बाहेर जातो, असा हेतू असावा,” अशा शब्दात आमदार रोहित रोहित पवार यांनी खासदारा सुनेत्रा पवार यांच्या आरएसएसच्या बैठकीतील फोटोवर भाष्य केले.

Chandrapur : काँग्रेस खासदाराच्या दीराचा भाजपामध्ये प्रवेश..

चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे मोठे बंधू अनिल धानोरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अनिल धानोरकर यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 10 नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला. मुंबईतील भाजपच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. 

Ladki Bahin : जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनीही घेतला 'लाडकी बहीण'चा लाभ!  कारवाईचे पत्र आले..

लाडकी बहीण योजनेवरून राज्यभरात गदारोळ पाहायला मिळत असताना आता राज्यभरात 1183 जिल्हा परिषद  (ZP)कर्मचारी असलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे . बुलढाण्यात ही संख्या सर्वाधिक असून सोलापूर धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यांमध्येही  महिला कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे .

GST Updates :केंद्र सरकारने जीएसटीचे दोन स्लॅब घटवले..

केंद्र सरकारनं जीएसटीचे स्लॅब घटवून दोन केले आहेत. आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के जीएसटी असेल. तर, 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे बंद केला जाईल. 21 ऑगस्ट 2025 ला झालेल्या बैठकीत मंत्रिगटानं केंद्र सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे. 

Anjali Damania : राज ठाकरे एक दिवस उद्धव ठाकरेंना तोंडघशी पाडतील..

बेस्ट निवडणुकीचे निकाल लागले त्यात ठाकरे बंधूंना शुन्य जागा मिळाल्या, त्यामुळे ते मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी गेले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्य दिसत नसल्यानं राज ठाकरे हे भाजपसोबत जाण्याचा विचार करत असावेत, स्वत:चा भाव भाजपसोबत वाढवण्यासाठी त्यांनी काही विधाने केली, पण त्यांना उद्धव  ठाकरेंसोबत जाण्याची कोणतीच इच्छा नसावी, ते एक दिवस उद्धव ठाकरे यांना तोंडघशी पाडतील असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis News : शरद पवार, उद्धव ठाकरेंना फोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याचे वृत्त आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती फडणवीसांनी केल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

Jaykumar Gore News : पंतप्रधान मोदींची घेतली भेट

राज्याचे ग्रामविकास मत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये विविध विकास कामांसाठी मंजुरी व निधी उपलब्ध व्हावा, यासाठी निवेदन सादर केल्याची माहिती गोरेंनी दिली. पंतप्रधान मोदीनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित विकासकामांना तातडीने गती देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती गोरेंनी दिली.

Dheeraj Deshmukh News : वारकरी संप्रदायाला न शोभणारे कृत्य

महाराष्ट्रातील गौरवशाली वारकरी संप्रदायाला न शोभणारे कृत्य काही मंडळी करू पाहत आहेत, अशी टीका काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे. या मंडळींचा उद्देश कदापी सफल होवू दिला जाणार नाही. शांततेच्या मार्गाने जात असताना सत्य जनतेपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे, असे देशमुख म्हणाले आहेत.

Dhananjay Munde :  धनंजय मुंडेंनी तत्कालीन कृषी सचिव व्ही. राधा यांची फाइल गायब केली!

धनंजय मुंडेंनी कृषी सचिव व्ही. राधा यांची फाइल गायब केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे. व्ही. राधा या कृषी सचिव असताना कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौडबंगालाच्या रिपोर्टची फाइल मंत्र्यांना पाठवली. ही फाइल धनंजय मुंडे यांनी गायब केली, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

Raigad live: रायगड येथील समुद्रात बोट बुडाली

रायगड येथील समुद्रात बोट बुडालीची घटना समोर आली आहे. यात किती जण बुडाले, कशामुळे हा अपघात झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक कोळी समाजातील नागरिकांनी बचाव कार्य सुरु केले आहे.

Nashik : गोवर्धन ग्रामपंचायत बैठकीत राडा

नाशिक जिल्ह्यातील गोवर्धन ग्रामपंचायतीच्या बैठकीत राडा झाला आहे. ग्रामसभा सुरू असताना हा राडा झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती आहे. विषय मंजुरी वरून राडा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Nashik : बिलं थकली, नाशिकमध्ये कंत्राटदार आक्रमक 

प्रलंबित बिले निघत नसल्याने नाशिकमध्ये शासकीय कंत्राटदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शासकीय कंत्राटदारांनी शासनाने आमची फसवणूक केल्याचा आरोप करत सार्वजनिक कार्यालयाबाहेर कंत्राटदारांनी आंदोलन केलं. सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली. वारंवार पाठपुरावा करून देखिल पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार संघटना आक्रमक झाल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर निषेध नोंदवला.

Sangamner News : संगमनेरमध्ये किर्तनकार भंडारेंविरोधात थोरात समर्थकांचा मोर्चा 

संगमनेर मध्ये किर्तनकार बापू भंडारे यांच्याविरोधात थोरात समर्थक आक्रमक झाले आहेत. थोरात समर्थकांनी मोर्चा काढला आहे. त्यात कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे काही नेते सहभागी झाले आहेत. गृह खात्याचा अशा प्रवृत्तीला पाठिंबा असल्याचा आरोप थोरात यांनी केला.

Raj Thackeray : असे कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात 

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कबुतराच्या मुद्यावरुन जैन समाजाला कानपिचक्या दिल्या आहेत. माणसं मेलेली चालतात, कबुतरं मेली नाही पाहिजेत. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तुमच्या घरात चार उंदीर झाले तर आपण काय करतो, नाय नाय, गणपतीचं वाहन आहे म्हणून आपण घरात उंदीर ठेवतो का? मग असे कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

B Sudarshan Reddy Nomination: 80 खासदारांच्या सह्या

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांनी आज अर्ज दाखल केला. राज्यसभेचे महासचिव प्रमोद चंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, सपाचे राज्यसभा खासदार रामगोपाल यादव उपस्थित होते. बी सुदर्शन रेड्डी यांच्या अर्जावर विरोधी पक्षाकडील 80 खासदारांच्या सह्या आहेत. सोनिया गांधी यांचीही अर्जावर सही आहे.

Raj Thackeray live: वाहतूक कोंडींची समस्या वाढली...

मुंबईतील पार्किंगबाबत आराखडा दिला, असल्याचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले, वाहतूक कोंडींची समस्या वाढली आहे, ही कोंडी हाताबाहेर गेली तरी कोणी काही लक्ष देत नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. कबुत्तर, हत्तीच्या प्रकरणात आपण अडकलो आहोत, कायद्याला न जुमानण्याचे प्रकार वाढले आहे, वाहतूक कोंडींचे प्रश्न वाढले आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

Maharashtra Politics:फडणवीसांवर मोठी जबाबदारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपराष्ट्रपती निवडणुकीची मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी फडणवीस साधणार संवाद असल्याची माहिती आहे.

Raj Thackeray live: मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय चर्चा झाली, राज ठाकरे सांगणार ..

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. वर्षा या बंगल्यावर ते गेले होते त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीत नेमकं काय झाले याबाबत राज ठाकरे स्पष्टीकरण देणार आहे. लवकरच ते माध्यमांशी संवाद साधणार आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे CM फडणवीसांच्या भेटीला

काल बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल जाहीर झाली आहे. अशातच आज मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा या बंगल्यावर गेले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Rajgad : वेल्हे तालुक्याचे नाव बदलले आता नवे नाव राजगड

वेल्हे तालुक्याचे नाव आता बदलण्यात आले आहे. केंद्र सरकारने राजगड या नावाला मान्यता दिल्यानंतर या गावाचे नाव आता राजगड करण्यात आले आहे.राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावाचे नाव बदललून आता राजगड असं करण्यात आलं आहे.

Kolhapur Rain : कोल्हापूर, रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

कोल्हापूर शहरहासह जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी मागील चार दिवसांपासून झालेल्या पावसाने पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. तसंच जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

Mumbai high court : पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली

जैन समुदायाच्या पर्युषण पर्वाच्या काळात कत्तलखाने 9 दिवस बंद ठेवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तर मुंबई महानगरपालिकेला असा आदेश देण्याचा अधिकार कुठल्या कायद्याअंतर्गत आहे? आणि याचिकाकर्त्यांनाही हा आग्रह धरण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. शिवाय 9 दिवसांची बंदी लागू करण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत, असं सांगत न्यायलयाने जैन समाजाची मागणी फेटाळून लावली आहे.

Rahul Gandhi : जुने उपराष्ट्रपती कुठे गेले? राहुल गांधींचा सवाल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची तरतूद असलेल्या विधेयकावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्या सत्कार समारंभात बोलताना ते म्हणाले, जुने उपराष्ट्रपती कुठे गेले? ते का लपून बसले आहेत? त्यांच्या राजीनाम्यामागे एक मोठी गोष्ट आहे. तुमच्यापैकी काहींना ती माहित असेल, काहींना कदाचित माहित नसेल. पण त्यामागे एक गोष्ट आहे. भारताचे माजी उपराष्ट्रपती अशा परिस्थितीत का आहेत, जिथे ते एक शब्दही बोलू शकत नाहीत आणि त्यांना लपून बसावे लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT