rain .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : हवामान विभागाचा अलर्ट; पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Roshan More

हवामान विभागाचा अलर्ट; पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

हवामान विभागानं राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्यानं महाराष्ट्रात 28 सप्टेंबरपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे.त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार असून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डॉन अरूण गवळीची मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा

अरूण गवळी यांचा अखिल भारतीय सेना हा पक्ष आहे. जामिनावर बाहेर आलेल्या गवळीनं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. आता मला लिडर शिप करण्याची इच्छा नाही. मला राजकारणात कोणताही इंटरेस्ट नाही. त्यामुळे मी आणि माझा पक्षा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार नाही, असं गवळी यांनी स्पष्ट केलं आहे. 

मंत्री पंकजा मुंडे यांचं वाढत्या ओबीसी-मराठा संघर्षावर सूचक विधान

मंत्री पंकजा मुंडे यांनी वाढत्या ओबीसी-मराठा संघर्ष प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ज्या पद्धतीनंओबीसी-मराठा संघर्ष मांडला जात आहे, त्या पद्धतीनं तो मला पाहायला मिळत नाही. पण आत्ताच्या राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे. सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना कुठेही धक्का न लागता निर्णय घेतला पाहिजे, असे मुंडेंनी म्हटले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी शासनाकडं पाठपुरावा करणार - अब्दुल सत्तार

सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातील बनोटी, आमठाणा व इतर मंडळात पुन्हा झालेल्या अतिवृष्टी व सातत्याच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार आज सिल्लोड - सोयगाव दौऱ्यावर होते. आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड - सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची तसेच उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला.

पोलिसांना एकदा आम्हालाही सूट द्यावी, जशास तसे उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत - शशिकांत शिंदे

यापूर्वी प्रत्येक ठिकाणी माध्यमांचे कॅमेरे असायचे. पोलिसांनीही कॅमेरा लावले. आम्ही काय बोलतोय याच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवलं. एकदा पोलिसांना आम्हाला देखील सूट द्यायला सांगा, मग बघा जशास तसे उत्तर द्यायला तयार आहोत. महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती यांनी बिघडवली आहे. अनेक नेते फोडले गेले पण एक मात्र नेता फुटला नाही शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहिला तो म्हणजे जयंत पाटील. यापुढे कोणत्याही नेत्यावर टीका होत असेल तर त्याच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र आहे, हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. देवाभाऊ तुमच्या या एका नेत्यामुळे तुमची राज्यात नाचक्की झाली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावरची छी थू करतोय, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर टीका केली.

जत आणि मार्कडवाडीची निवडणूक पुन्हा एकदा बॅलेटवर घ्या - आमदार जानकर

जतच्या मोर्चात बोलताना आमदार उत्तमराव जानकर म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांना मानणाऱ्या लोकांनी वाचाळ नेत्यांच्या परिस्थितीचा जरा विचार करावा. हे सगळं संपूर्ण महाराष्ट्रात जाणीवपूर्वक घडवलं जात आहे. जत आणि मार्कडवाडीची पुन्हा एकदा घ्या आणि बॅलेटवर घ्या. सत्ताधारी लोकांनी कामावर बोलले पाहिजे. आज लोक प्रचंड अस्वस्थ आहेत, त्यांच्या मनात राग आहे, ही परिस्थिती नेपाळ सारखी होईल वेळीस सर्व थांबवले पाहिजे, असंही यावेळी ते म्हणाले.

Nilesh Lanke : दम असेल तर पोलीस बाजूला ठेवून मैदानात या, निलेश लंकेंचे पडळकरांना आव्हान

याचा आका एसीत बसतो, आकालाच धडा शिकवायला हवा. एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम आहे तर एकदा रणांगणात या. सरकारमधील लोकांकडे विकासाचा अजेंडा नाही म्हणून असल्या गोष्टी पुढे केल्या जातात. वाचाळवीर आधी दोन पोलीस घेऊन फिरत होते, आता चार पोलीस घेऊन फिरत आहेत. दम असेल तर पोलीस बाजूला ठेवून मैदानात या. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या, असे आव्हान खासदार निलेश लंके यांनी गोपीचंद पडळकर यांना दिले.

Anjali Damania : धनंजय मुंडे यांना पक्षात अनेक कामे, त्यांनी ती करावीत..

धनंजय मुंडे यांना जनतेच्या कामापासून दूर ठेवावे असं माझं स्पष्ट मत आहे, त्यांचा आता वेळ जात नाही आहे, मला काहीतरी काम द्या, असं साकडं त्यांनी तटकरेंपुढे घातलं. आता स्थनिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. पक्षबांधणी आहे, अशी असंख्य कामे आहेत, अशी पक्षाची कामे त्यांनी करावीत. पण, जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे, अशी प्रतिक्रिया समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे.

Manoj Jarange Patil : रोजगार हमीच्या कामावर जा, बराशी खंदा ! जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडेंना टोला

आता रिकामं ठेवू नका...काहीतरी जबाबदारी द्या, असे धनंजय मुंडेंनी म्हटले होते. त्यामुळे, धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा मंत्रि‍पदासाठी लॉबिंग सुरू केल्याचा चर्चा सुरू आहेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी टोला लगावला आहे. रोजगार हमीच्या कामावर जा म्हणावं, बाराशी खांदायला, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडें यांना टोला लगावला.

Varsha Gaikwad: देवाभाऊंनी त्यांचे मित्र मोहित कंबोज यांच्या कंपनीला रातोरात मालामाल केले

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतींसाठीची आरक्षित असलेला भूखंड आपल्या मित्राच्या घशात घालण्यासाठी नियम वाकवण्यात आले, देवाभाऊंनी त्यांचे मित्र मोहित कंबोज यांच्या कंपनीला रातोरात मालामाल केल्याचा आरोप मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. महापालिकेचा जुहूतील अंदाजे 800 कोटींचा भूखंड देवाभाऊंनी मोहित कंबोज यांच्या बांधकाम कंपनीला दिल्याचा आरोप वर्षा गायकवाडांनी केला.

धनंजय मुंडे यांच्या विनंतीचा विचार केला जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या मंत्रीमंडळातील वापसीचे संकेत दिले. कर्जत येथील सत्कार सोहळ्यात धनंजय मुंडे यांनी चुकले असेल तर कान धरा, पण आता जबाबदारी द्या, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना घातले होते. यावर अजित पवार यांनी भाष्य केले.

Eknath Shinde : जनतेचे प्रश्न सोडवा, अन्यथा विचार करावा लागेल, एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना इशारा

काही दिवसांपूर्वी शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची कॅबिनेट नंतर निर्मल भवनला एक गुप्त बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्र्यांच्या कामांवर नाराजी व्यक्त करण्यात आली. मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारे दुर्लक्ष यावरून शिंदेंनी संताप व्यक्त केला. जनता दरबार घेण्याच्या सूचना देऊनही वारंवार त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. पक्षवाढीबाबत अनेक मंत्री कार्यरत नसल्याची तक्रार आहे. सोमवार ते बुधवार कॅबिनेट आणि नंतर मतदारसंघ अशा मंत्र्यांवर नाराजी व्यक्त झाली. जनतेचे प्रश्न सोडवा, अन्यथा विचार करावा लागेल असा गर्भित इशारा या मंत्र्यांना शिंदेंकडून देण्यात आला.

Navnath Waghmare : मनोज जरांगे समर्थकांनीच माझी गाडी जाळली..

नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ कार काल एका अज्ञात व्यक्तीने जाळली. जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मनोज जरांगे पाटील यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनीच गाडी जाळली असा दावा नवनाथ वाघमारे यांनी केलाय. मनोज जरांगेची अवकात असेल तर त्याने स्वतः रस्त्यावर यावं असं नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज दिलं आहे. दुसऱ्याला समोर करून हे कृत्य करणं चुकीचं आहे. 

Jitendra Awhad : जयंत पाटील गप्प बसले, मी बसणार नाही! जितेंद्र आव्हाड यांचा पडळकरांना इशारा

मी विधीमंडळात आल्यानंतर पडळकर यांनी, हा बघा आला लांड्याचा, असा शब्द उच्चार माझ्याबाबत केला. म्हणून मी त्या दिवशी जे बोलायचं ते बोललो आणि त्यानंतर त्यांनी माझ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला ती गाडी लागली, असा किस्सा जितेंद्र आव्हाड यांनी सांगितला. तसेच, जयंत पाटील गप्प बसले असतील पण मी गप्प बसणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला.

अहमदाबाद विमान अपघाताबद्दल धक्कादायक खुलासा, पायलटची चूक?

गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून टेकऑफ केलेले एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ज्यात तब्बल 270 लोकांचा जीव गेला. या विमानातील फक्त एकच प्रवासी वाचला. या अपघातानंतर देशभरात भीतीचे वातावरण पसरले होते. यादरम्यान अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली असून सुनावणी सुरू आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला थेट नोटीस बजावली असून न्यायालयाने एएआयबीच्या प्राथमिक तपासाला थेट बेजबाबदार म्हटले आहे. त्यांनी अहवालात थेट विमान अपघाताचे काही स्पष्ट कारण दिले नसून पायलटची चूक असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

नेत्यांच्या मागे मागे फिराल तर...चंद्रपूरच्या भाजप कार्यकर्त्यांना बावनकुळे यांनी दिला इशारा

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या घमासान सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यात विस्तवही जात नाही. त्यामुळे महापालिकेचे तिकीट कोणाकडे मागायचे असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. मात्र चंद्रपूरमध्ये जाऊन भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट सांगून टाकले. नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट दिले जाणार नाही असा इशाराच त्यांनी दिला. नेत्यांची जवळीक आणि मागे मागे फिरलो म्हणून कोणी आपले तिकीट पक्के असे समजू नका असेही त्यांनी बजावले.

'राज साहेब आम्हाला बडतर्फ करतील, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं' : बडतर्फ मनसे नेत्याने व्यक्त केली खंत

मनसे प्रमुख राज साहेब यांनी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह तिघांवर बडतर्फिची कारवाई केली होती. यानंतर वैभव खेडेकर आणि इतरांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता मनसेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी सोशल मीडियाद्वारे आपली व्यथा भाजपा पक्षप्रवेशाच्या आधी मांडली आहे. त्यांनी, राज साहेब आम्हाला बडतर्फ करतील, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळाली असती, तर दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ आली नसती, असे म्हटलं आहे.

बेताल वक्तव्य करणाऱ्या आ. पडळकरांचा राजीनामा घ्यावा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त विधान करून राज्यभर संतापाचा उद्रेक निर्माण केला आहे. त्यावरून अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला आहे. यादरम्यान सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यावतीने पडळकरांच्या विधानाचा निषेध करताना तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. ज्यातून महाराष्ट्र राज्याची संस्कृती पायदळी तुडवणाऱ्या पडळकरांच्या आमदारकीचा राजिनामा तात्काळ घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

Chhagan Bhujbal :  धनंजय मुंडेंना छगन भुजबळांचा सल्ला; म्हणाले, 'तोपर्यंत हे काम करा'

धनंजय मुंडे यांनी आम्हाला रिकामं ठेवू नका, असं म्हटलं असेल तर पक्ष काय आहे ते बघेल. एक काम आपल्याकडे आहे. बाकीचं उपमुख्यमंत्री अजित पवार बघतील. पण गोपीनाथ मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम दिलेले आहे, ओबीसी आरक्षणाच्या हक्काचे जतन करणं, हे काम त्यांनी करावं, असा सल्ला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे.

Dhananjay Munde : चुकलो तर कान धरा; पण आता रिकामं ठेवू नका : धनंजय मुंडे

चुकलो तर कान धरावा; नाही चुकलो तर चाललंच आहे. पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. जबाबदाऱ्या कसं....हीच विनंती करतो, असे विधान माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापुढे केले आहे.

Latur News : लातूरमध्ये कृषि अधिकाऱ्याच्या दालनात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अतिवृष्टीमुळे पिचलेला शेतकरी आता टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कृषि अधिकाऱ्यांच्या दालनातील पंख्याला टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थितांनी तो गळफास सोडविला, त्यामुळे मोठा दुर्घटना टळली आहे.

Gulabrao Patil : मीही म्हणेन बच्चू कडूंच्या घरावर मोर्चा काढेन, तर ते गप्प बसतील का? : गुलाबराव पाटील

मी आणि बच्चू कडू संघर्षातून पुढे आलेलो आहोत. मी शेतकऱ्यांचा विषय सोडला, असं जर बच्चू कडू म्हणत असतील तर तो त्यांचा गैरसमज आहे. पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढा, असे ते म्हणाले होते. त्यावर मी त्यांना माझ्या गावात या, असं म्हटलं. बच्चू कडू शेतकरी आहेत, तर आम्हीही शेतकरी आहेात. ते कापूसवाले, तर आम्ही कापूसवाले आहोत. गुलाबराव पाटील यांना कमळांचं काय, तर तुम्हीही कमळ, पंजा, सर्वांसोबत राहिलेले आहात. त्यामुळे यावर त्यांनी किती बोलावं आणि मी किती बोलावं यापेक्षा मी कोणावरही टीका करत नाही. माझी तशी मानसिकताही नाही. आम्हीही उद्या म्हणेन की बच्चू कडू यांच्या घरावर मोर्चा काढेन, तर ते गप्प बसतील का, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी केला.

Ashish shelar-Raj Thackeray : आशिष शेलार यांनी राज ठाकरेंसोबत एकत्र येणे टाळले

शिवाजी पार्कवरील जीमखान्याच्या नवीन वास्तूंचे लोकार्पण भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे मंत्री आशिष शेलार यांना निमंत्रण होते. मात्र, शेलार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यासोबतची आपली वैयक्तीक मैत्री तुटली असे विधान केले होते. त्यामुळे राज ठाकरेंसोबत एकत्र येणे शेलार यांनी टाळले का, अशी चर्चा रंगली आहे.

Chhagan Bhujbal : बीएसटीसह राज्यातील ४३ टक्के महामंडळं तोट्यात : छगन भुजबळ

राज्यातील ११० पैकी ४३ टक्के महामंडळं ही तोट्यात आहेत. जी महामंडळे तोट्यात आहेत, त्यांना पन्नास हजार कोटींहून अधिक रकमेचा तोटा आहे. नऊ टक्के महामंडळं ही ना नफा ना तोटा अशा स्थितीत आहेत. राज्यातील ११० पैकी ९१ महामंडळे कार्यान्वित आहेत. १९ महामंडळं बंद पडली आहेत. एक महामंडळाच्या ४३ टक्के महामंडळं ही तोट्यात असून ४१ टक्के महामंडळं फायद्यात आहेत. एसटी ही तोट्यात आहे आणि दोन प्रवासी अथवा विद्यार्थी असले तरी एसटीला जावं लागतं. कारण ती सेवा आहे. कदाचित बीएसटीसुद्धा तोट्यात आहे. बीएसटीबरोबर इलेक्ट्रीक कंपनीसुद्धा होती, त्यामुळे तेथील फायदा बीएसटीला दिला जायचा. पण या दोन्ही कंपन्या वेगळ्या केल्यामुळे बीएसटीसुद्धा तोट्यात आहे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Nana Patole : महामंडळं केवळ नावालाच; त्याला निधी किती दिला जातो : नाना पटोले

राज्यातील केवळ महामंडळांचं नाही तर सरकारही तोट्यात आले. विविध जातींसाठी अनेक महामंडळं उघडण्यात आली आहेत. मात्र, त्या महामंडळाला निधी किती दिला जातो. महामंडळांना निधीच दिला जात नाही. सरकार ओबीसी-मराठा वाद निर्माण केला जात आहे. महामंडळ केवळ नावालाच उघडून ठेवण्यात आली आहेत, असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.

Thane Metro : ठाण्यात मेट्रोची ट्रायल रन; फडणवीस, शिंदे उपस्थित

ठाण्यात लवकरच मेट्रो धावणार आहे. मेट्रोची ट्रायल रन आजपासून सुरु होणार आहे. या ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. घोडबंदर मार्गावरील गायमुख ते विजयनगर असा साडेतीन किमीपर्यंत मेट्रोचं पहिलं ट्रायल रन असेल. डिसेंबरपर्यंत ठाणे शहरातील मेट्रोचा पहिला टप्पा सुरु होणार आहे.

BJP LIVE: रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार

मनसे नेते वैभव खेडेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उद्या मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. दुपारी तीन वाजता नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. नितेश राणे आणि नारायण राणे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Ambadas Danve live: अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची अंबादास दानवे यांनी केली पाहणी

माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शहाजतपूर व जळगाव येथे भर पावसात अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे परिसरातील टोमॅटो, मका, कपाशी, तूर व अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामा करण्याचे आदेश देऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

Navnath Waghmare : नवनाथ वाघमारेंची गाडी जाळली

Jalna: जालना शहरातील निलमनगर भागात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला, यात गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जरांगे समर्थकांचा हा कट असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला.

GST 2.0 : आजपासून दूध-पनीर,टीव्ही-एसी स्वस्त होणार

भारतात आजपासून नवीन जीएसटी 2.0 लागू झाले आहेत. सरकारने करप्रणाली सोपी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या बदलाचा परिणम बाजारावर दिसून येणार आहे. जपासून अनेक गोष्टींच्या किमती कमी होणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गुणरत्न सदावर्तेंना शांत राहण्याचा आईचा सल्ला

गुणरत्न सदावर्तेंना आता त्यांच्या आईने शांत राहण्याचा सल्ला दिला आहे, सध्या गुणरत्न सदावर्ते हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेनंतर त्यांच्या आईने आपला मुलगा कायद्याने बोलतो तो वकील आहे, असे सांगितले.

ठाकरे हा ब्रँड नाही विचार आहे - संदीप देशपांडे

ठाकरे ब्रँड नाही बँड आहे, अशी टीका भाजपने केली होती. त्याला उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हमाले, ठाकरे हा ब्रँड नाही विचार आहे. ब्रँड हा बेपारी लोक उभा करतात तर विचार हा संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो.पैसे ओतून ब्रँड तयार करता येतो पण चळवळ नाही.पैसे संपले की ब्रँड संपतो पण विचार नाही.तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही.

मोठा धमका होणार, आठवडाभर थांबा - अंजली दमानिया

अंजली दमानिया यांच्याकडून विरोधी पक्षांना टार्गेट केले जाते. मात्र, भाजपच्या बाबत त्या काही बोलत नाही, असा आरोप रोहित पवार, सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावर सध्या मी एका खूप मोठ्या विषयावर काम करत आहे. त्यामुळे मी विनंती करते की एक आठवडा थांबा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन. पण सध्या माझ्याकडे वेळ खरच खूप कमी आहे.

पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासाच पुर्नविचार करावा - रोहित पवार

हलगाममध्ये २७ निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या पाकसोबत क्रिकेट खेळण्यास भारतातील बहुतेक क्रिकेट प्रेमींचा विरोध असतानाही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय #BCCI ने घेतला, पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच हेच पाकने आज दाखवून दिलं. त्यांचा मस्तवाल खेळाडू साहिबजादा फरहान याने एके-४७ प्रमाणे बॅट दाखवत ज्या खेळातून परस्परांप्रती विश्वासाची भावना निर्माण व्हावी त्याच खेळातून द्वेष आणि शत्रूत्त्वाची पेरणी केली. ही अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह बाब आहे. असं असेल तर आतातरी या वाकड्या शेपटाच्या देशासोबत खेळण्याबाबत बीसीसीआय ने पुनर्विचार करावा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

बीसीसीआय, मोदींचा पाकिस्तानकडून फलंदाजाकडून अपमान - संजय राऊत

भारत पाकिस्तान मॅचमध्ये साहिबजादा फरहानने मैदानावर अर्धशतकानंतर बॅटीने गोळ्या चालवण्याची अॅक्शन करत आनंद व्यक्त केला. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत त्यांनी
त्याने अर्धशतक गाठले आणि बॅटला जणू एके-४७ प्रमाणे पकडून चौकार-षटकारांची सरबत्ती केली! ही अॅक्शन करत बीसीसीआय आणि मोदी सरकारच्या चेहऱ्यावर थुंकले आहेत.

ओबीसींच्या संघर्षात सोबत असेल तो आपला - विजय वडेट्टीवार

सत्तेतला असो की विरोधातला –ॉ जो आजच्या संघर्षात सोबत असेल तोच आपला, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.गोंदिया येथे झालेल्या भव्य ओबीसी मेळाव्यात २ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द झालाच पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. माझा संघर्ष हा नेता होण्यासाठी नाही. मी लढतोय ते माझ्या ओबीसी समाजाच्या हक्क आणि अधिकारांच्या रक्षणासाठी. ही ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे, जी निकराने लढली पाहिजे, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT