बीडच्या टोकवाडी येथे आत्माराम भांगे यांनी ओबीसी आरक्षण संपल्याच्या विवंचनेतून गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. भांगे हे ऑटोचालक असून त्यांची दोन मुलं पोलीस भरतीची तयारी करत होते. अशातच ओबीसी आरक्षण संपल्याच्या धक्क्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती भांगे कुटुंबियांनी परळी ग्रामीण पोलिसाना दिली आहे. त्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महिला व बालविकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2 हजार रूपये देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी दिली आहे. यासाठी शासनाने 40.61 कोटींचा निधी उपलब्ध करत त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधकांसह शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी सुरू आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंजाब सरकार शेतकऱ्यांना जास्तीची मदतं देऊ शकतं तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने आणि जगण्यासाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. आज पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला 50 हजार रुपये आर्थिक मदत करत असेल एका हेक्टरला, तर मग महाराष्ट्रानं साडेआठ हजार रुपये का करावे?'
पुणे शहरातील ट्रॅफिकपासून सुटका व्हावी यासाठी आता पुणे पोलिसांकडून शहरातील सुमारे 500 सिग्नल जंक्शनवर AI तंत्रज्ञानावर आधारित 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (ITMS) उभारण्यात येणार असून या नव्या सिस्टीमसाठी तब्बल 1100 कोटींचा खर्च होणार आहे. ही नवी सिस्टीमचं काम येत्या 3 महिन्यांत सुरू होणार असल्याची पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' ही सिग्नल यंत्रणा गाड्यांचा वेग, त्यांची संख्या तसंच प्रवासाचा वेळ आणि पीक अवर मधील ट्रॅफिकचा अभ्यास करून ऑटोमॅटीक सिग्नल सेट करते. 'एआय'च्या साहाय्याने सिग्नल सिंक्रोनायझेशन साधले जाते. त्यामुळे अनावश्यक वाहनांची गर्दी होत नाही आणि वाहतूक सुरळीतपणे सूरू राहते. या सिस्टीममुळे शहरात नेत्यांचे दौरे असतात त्यावेळी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय टाळली जाईल आणि रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे काम या तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
हुथी बंडखोरांनी इस्त्रायलच्या तेल अवीव शहरावर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर इस्त्रायलने आक्रमक भूमिका घेत येमेनची राजधानी असलेल्या सना शहरावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 9 पेक्षा अधिक लोक मारले गेल्याची माहिती आहे. येमनेचे लष्करी ठिकाणांना सुद्धा इस्त्रायलने टार्गेट केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मोबाईल ॲपला प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून सध्या या ॲप चे सुमारे १० लाख वापरकर्ते आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, एस.टी. महामंडळाने मोबाईल ॲप काही महिन्यांपूर्वी सुधारणा करुन नवीन आवृत्ती (व्हर्जन) मध्ये सुरू केले आहे .त्याचा मुख्य हेतू प्रवाशांना बसची आरक्षण सेवा अधिक सुलभ पद्धतीने उपलब्ध करणे असा आहे. पारंपरिक तिकीट खरेदी व थेट बस स्थानकावर अवलंबून राहण्याऐवजी प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करू शकतात, प्रवासाची माहिती तपासू शकतात.
मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना लष्कराने बढती दिली आहे. सेवाज्येष्ठनेतनुसार ही बढती मिळाल्याचे देखील लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने प्रधानमंत्री आदर्श ग्रामयोजना, जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व निराकरण, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती आणि शिष्यवृती संदर्भात महाविद्यालयाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधाळकर, यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, समिती सदस्य, साखर कारखान्याचे अधिकारी , स्थानिक पदाधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानाची माहिती ते पंतप्रधानांना देण्याची शक्यता आहे.
पदवीधर व शिक्षक मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून सन २०२० मध्ये नाव नोंदणी असलेल्या पदवीधर व शिक्षकांना पुन्हा नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे यादृष्टीने राजकीय पक्षांनी व शिक्षण संस्थांनी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.