Maharashtra Live Updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Updates : राहुल गांधींच्या सभेत मोदींबद्दल अपशब्द; भाजपची तिखट प्रतिक्रिया

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्युरो

Arun Gavali : अरुण गवळी 18 वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येणार

कुख्यात डॉन अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळं 18 वर्षांनंतर गवळी आता तुरुंगातून बाहेर येणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात कोर्टानं गवळीला हा दिलासा दिला आहे. या प्रकरणात आपल्याला जामीन मिळावा यासाठी गवळीनं कोर्टाकडं अर्ज केला होता.

Congress Vs BJP : राहुल गांधींच्या सभेत मोदींबद्दल अपशब्द; भाजपची तिखट प्रतिक्रिया

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची यात्रा बिहारमधील दरभंगा येथे पोचल्यानंतर झालेल्या सभास्थळी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले गेले. त्या वेळी इंडिया आघाडीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यावर भाजपकडून तिखट प्रतिक्रिया आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचं डोकं चोरीला गेलं आहे, त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे सांगितले. ‘जसे संस्कार तसे उच्चार, तुम्ही कार्यकर्त्यांना देशहित शिकविण्याऐवजी ते तिरस्काराचे, खोटेपणाचे दुकान घेऊन फिरत आहेत, त्यामुळे कार्यकर्तेसुद्धा शिव्या देणे, विखारी शब्दांचा उपयोग करतात. त्यातून तो पक्ष संपण्याकडे जातो, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Harshvardhan Sapkal : सत्तेत येताच आरक्षण देतो, म्हणणाऱ्या फडणवीसांनी शब्द पाळावा..

सत्तेत येताच मराठा समाजाला आरक्षण देतो, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. आता त्यांनी तो पाळावा, केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हटवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सरकारने ठरवले तर पाच मिनिटात आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असा दावाही त्यांनी केला.

Ramdas Athwale : मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण ओबीसीतून शक्य नाही!

आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली. मराठा आरक्षणाबाबत आणि मनोज जरागेंच्या आंदोलनाबाबत या विचारमंथन शिबिरात ठराव मंजूर झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मात्र, सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, अशी आमची भूमिका आहे. मनोज जरांगे यांनी एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत घ्यावी, आणि टीका टाळावी, असा सल्लाही आठवलेंकडून देण्यात आला. 

Shakti pith News : शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळले..

कोल्हापूरच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळण्यात आलं आहे. तसा आदेश राज्य सरकारने पारित केला आहे. शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील एकूण 12 जिल्ह्यातील 29 तालुके आणि 370 गावांतून जाणार आहे. हा प्रकल्प हाती घेण्यास, आखणीस आणि भूसंपादनासाठी शासनाने मान्यता दिली आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन संपादनासाठी अधिग्रहणासाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापुरातील गावं वगळण्यात आली आहेत.

Sanjay Raut : संजय राऊत यांनी घेतले मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन..

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे सचिव संदीप देशपांडे यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही भेट केवळ गणपती दर्शनापुरती मर्यादित होती की यामागे काही राजकीय हेतू होता, यावर आता चर्चा सुरू आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सध्या राज्यातील बड्या नेत्यांची रेचलेचल सुरू आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर काही वेळातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवतीर्थावर हजेरी लावली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत.

Laxman Hake : मराठा तेवढा मेळवावा, ओबीसी मुळासकट संपवावा, असाच जरागेंच्या मागणीचा अर्थ..

मनोज जरांगे पाटलांची मागणी बेकायदा आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. शासनाने त्यांना फॅक्ट समजून सांगितलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात अराजक निर्माण होऊ शकते. मराठा तेवढा मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा, असाच जरागेंच्या मागणीचा अर्थ होतो. ओबीसी जरांगेंच्या आंदोलनाल प्रति आंदोलन पुकारतील त्यांची संख्या जेवढी आहे त्याच्या दहापट संख्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेली दिसेल, अशी घोषणाही यावेळी हाके यांनी केली आहे.

Rane-Samant : रत्नागिरीत उदय सांमत- नितेश राणे यांच्यात बॅनर वाॅर..

कोकणातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील सलग पाच वेळा आमदार राहिलेले आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात नितेश राणेंचे एक बॅनर लागले आहे. महायुतीत एकत्र असलेले हे दोन्ही मित्र आता मात्र एकमेकांच्या विरोधात उघडपणे टीका टिपणी करतात. त्यामागे मुद्दा आहे तो हिंदुत्वाचा. याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेले विधान नितेश राणे यांना उद्देशून असल्याची चर्चा रंगली आणि त्यानंतर ऐन गौरी गणपतीच्या काळात रत्नागिरीमध्ये बॅनर लागले.

NCP (SP) News : फडणवीसांकडे गृहखातं, त्यांनी शोधून काढावे आंदोलन कोण चालवतं?

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन जनता चालवत आहे, याला पक्षीय राजकारण देऊ नका,  सर्वपक्षीय लोक आहेत. आम्ही फक्त अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही ओबीसींना कुठं दुखावलं, ओबीसी राजकारण कोणी केले? कोणी नेते उभे केले? काल परवाचे लोक अचानक मोठे होतात,  देवेंद्र यांच्याकडे गृहखातं असून त्यांनी वापर करावा आणि शोधून काढावे की हे आंदोलन कोण चालवत आहे, असा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे.

OBC News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये! ओबीसी नेत्यांची मागणी..

शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे. तसेच, पुढील काळात गरज पडल्यास मुंबईकडे कूच करण्याची भूमिकाही तायवाडे यांनी स्पष्ट केली आहे. तर, प्रत्येक जिल्हात जनजागृती करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवू नये ही आमची सरकारकडे मागणी आहे.

Devendra Fadnavis:  नियमानुसार हे आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही!

आंदोलनासाठी जे नियम निकष केले आहेत, त्या नियमानुसार हे आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाहीये, आज आपल्याला माहिती आहे की, जवळपास साडेतीनशे जाती या ओबीसीमध्ये आहेत. आणि समजा आता आपण मेडिकलच्या प्रवेशाबाबत बघितलं तर ओबीसीचा कटऑफ हा एसीबीसीच्यावर आहे. एसीईबीसीचा कट ऑफ हा इडब्ल्यूएसच्यावर आहे, त्यामुळे या मागणीमुळे नेमकं किती भलं होणार आहे, याची मला कल्पना नाही. आपण जर आकडेवारी नीट बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे, हे आपल्या लक्षात येईल असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेना नगरसेवक नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कमलाकर जामसंडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १८ वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Nashik News : जवानांचे प्रात्याक्षिक सुरु असताना पॅराशूट घरावर कोसळलं, नाशिकमधील घटना

नाशिकच्या देवळाली कॅम्पमधील शिंगवे बहुला येथील लष्करी हद्दीत लष्करी जवानांचे प्रात्यक्षिक सुरू असताना पॅराशूट कोसळल्याची घटना घडली आहे. आज सकाळी १० वाजता ही घटना घडली. यात एक जवान जखमी झाला आहे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Nashik : नाशिकमधून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना

मुंबईतील मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकमधूनही मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचरणी चलो मुंबई आंदोलनाचे स्टिकर ठेवून आंदोलक रवाना झालेत. काही जण उद्या सकाळीही रवाना होतील. दरम्यान आंदोकांसाठी अन्न, धान्य आणि आर्थिक मदत देखील जिल्ह्यातील मराठा बांधव करणार आहेत.

Manoj Jarange Morcha : जरांगेसोबत किल्ले शिवनेरीकडे जाताना मराठा आंदोलकाचा मृत्यू 

मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत किल्ले शिवनेरीकडे जाताना मराठा आंदोलक सतीश न्यानोबा देशमुख (वय 40) यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर आणि कुटुंबाने घेतलं राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन

क्रिकेटपटू आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर व कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन घेतले.

Nashik : नाशिकमध्ये संत संमेलनाला सुरुवात 

नाशिकमध्ये गणेशोत्सव आणि आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोडच्या बालाजी मंदिरात या संमेलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा कामांचा आढावा यात घेणार आहे. बैठकीला अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेन्द्रनंद सरस्वती उपस्थित आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू महंत देखील संत संमेलनाला उपस्थित आहेत.

Sanjay Raut:फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात: राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

मराठा समाजाच्या मागण्या नवीन नाहीत. यापूर्वी महायुती सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जरांगेंशी चर्चा सुद्धा केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात असे राऊत म्हणाले. मुंबई ही मराठी माणसांची आहे. ही मराठी माणसांची राजधानी आहे. जर मुंबईत कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकते. त्याला सरकार परवानगी देते तर मग मराठा समाजाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी, असे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange live: आठमूठे भूमिका सोडून द्या...

'अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही. गोरगरिबांची मनं जिंकण्यांची मुख्यमंत्र्यांकडे योग्य संधी आहे. तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत. फक्त आठमूठे भूमिका सोडून द्या.', असे म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. जुन्नर येथून मुंबईकडे रवाना होताना जरांगे माध्यमांशी बोलत होते.

Maratha Reservation: भाजपकडून खारघरमध्ये बॅनरबाजी

मराठा आंदोलक मनोज जरांगे शुक्रवारी मुंबईत येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी भाजपकडून खारघरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड, निरंजन डावखरे नरेंद्र पाटील यांनी हा बॅनर लावलेला आहे. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडवणीस, अशा प्रकारचा मजकूर बॅनरवर आहे.

Dharashiv : मराठा-ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये जमावबंदी

मराठा आणि ओबीसी समाजांच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. उपोषण, मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, सभा घेण्यास धाराशिवमध्ये बंदी घालण्यात आली आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

Maratha Reservation : इतिहास शिव्यांना नव्हे तर इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो; भाजपकडून मुंबईत बॅनरबाजी

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या जुन्याच मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात करणार आहेत. यासाठी जरांगेसंह त्यांचे राज्यभरातील समर्थक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. तर जरांगे मुंबईत दाखल होण्याआधी भाजप नेत्यांकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजीने करण्यात आली आहे. या बॅनरवर 'इतिहास शिव्यांना नव्हे तर इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो'; असं लिहिलं आहे. शिवाय मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते, असाही उल्लेख बॅनवर करण्यात आला आहे.

ॠषिपंचमीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून दरवर्षी अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही ते करण्यात आलं होतं. यावेळी ॠषिपंचमीनिमित्त 35 हजार महिलांनी एकत्रित अर्थवशीर्ष पठण केलं.

OBC : राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बोलावली तातडीची बैठक

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या हालचालीत वेग आला असतानाच आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठकी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बोलावली असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.

RSS : मंदिर, पाणी आणि स्मशानात भेदभाव नको-  मोहन भागवत

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशासह जगभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. सध्या जगभरात कट्टरता असहिष्णुता आणि अस्थिरता वाढत आहे. धर्म सर्वत्र पोहोचला पाहिजे. मात्र त्याचा अर्थ धर्मांतर करणे नव्हे, धर्म म्हणजे एक जीवनस्वभाव आहे. तर सामाजिक समरसतेवर बोलताना ते म्हणाले, "मंदिर, पाणी आणि स्मशान हे सर्वासाठी खुलं असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव असायला नको."

Nagpur Crime : नागपुरात राष्ट्रवादीच्या नेत्याची 23 लाखांनी फसवणूक

नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची 23 लाखांनी फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. पेठे यांच्या खात्यातील परस्पर शेअर अन्य खात्यात ट्रान्सफर करून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी नंदन ओमप्रकाश गोस्वामीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे शिवनेरीवर दाखल

मनोज जरांगे पाटील काल अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यानंतर रात्रीच्या मुक्कामानंतर ते आता शिवनेरीवर दाखल झाले आहेत. ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

Virar Building Collapses : विरार इमारत दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू

विरार इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा शोध लागला असून त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इतर गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळला होता. या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक कुटुंब गाडली गेली. या कुटुंबांचे शोधकार्य एनडीआरफ पथक आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT