Chandrashekhar Bawankule Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : 'कुणबी बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई...'; बावनकुळेंची माहिती

Sarkarnama Headlines Updates : 4 ऑक्टोबर 2025 रोजीच्या देशासह राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका, वेंगुर्ल्यात नऊ पर्यटक समुद्रात बुडाले, यासह ताज्या अपडेट जाणून घेऊयात.

सरकारनामा ब्युरो

'कुणबी बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई...'; बावनकुळेंची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असल्याचं नमूद केलं आहे.तसेच त्यांनी बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरले जाणार असल्याचंही सांगितलं आहे. याबाबतची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान; म्हणाले,'जमेल तिथं महायुती अन्...'

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी जमेल तिथं महायुती आणि जमेल तिथं स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. जिल्हा परिषद नगर पंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरु केल्याचंही त्यांनी म्हटलं.

Maratha Community : चुकीचे कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई, देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला आहे. बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महसूलमंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच, राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता 10 ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा मागे घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी ओबीसी शिष्टमंडळाला केल्याचे त्यांनी सांगितले. ​

Gautami Patil : गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही, पोलीस उपायुक्तांनी केले स्पष्ट..

कायद्यानुसार अपघातात को-पॅसेंजरवर कारवाई केली जात नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे, गौतमी पाटीलवर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे पुण्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट केले आहे . गौतमी पाटील हिने गाडीचे कागदपत्रं पोलिसांकडे सादर केले आहेत. तसेच, गरज भासल्यास गौतमी पाटीलला चौकशीसाठी बोलवलं जाईल. मात्र, गौतमीला सध्या तरी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं नाही. गौतमी पाटील गाडीत होती की नाही याबाबतचं कोणतंही स्पष्टीकरण अजून समोर आलेले नाही. 

Rohit Pawar : गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर रामराज्य येईल

अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…! आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल’, अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे.

Gulabrao Patil : तुम्ही जास्त जागा लढा पण युती करा, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांची भाजपला गळ

आमदारकी-खासदारकीच्या निवडणुकीत युती केली जाते, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती का करत नाही? असा प्रश्न यावेळी गुलाबराव पाटील यांनी विचारला. दोन चार जागा इकडे तिकडे करा, पण युती करा असं आवाहन गुलाबरावांनी केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे हवं तर तुम्ही 100 जागा लढा, आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे 50 जागा लढतो पण युती करा असं त्यांनी भाजपला केले. युती जर केली नाही तर कार्यकर्ते मरुन जातील असंही ते म्हणाले.

Affected Farmers : नुकसान पावणे दोन लाखांचे, सरकारी मदत फक्त बीवसशे पन्नास.. 

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे केले. तत्पूर्वी सरकारने 2215 कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. मात्र, शेतकऱ्यांना ही मदत कुठपर्यंत पुरणार असा प्रश्न आहे. त्यातच, मे महिन्यात मिळालेल्या मदतीनंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मे महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इंदापूर तालुक्यातील सणसर गावच्या शेतकऱ्याचे पावणे दोन लाखांचे नुकसान झाले होते, पण सरकारकडून त्यांस केवळ 2550 रुपये मदत मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्पेशल पॅकेज जाहीर करणार असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगीतले. सध्या पूरग्रस्तांच्या शेतीचे व घराचे पंचनामे सुरु असून तातडीची मदत देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. यामुळं नदी नाले, धरणे तुडुंब भरली होती. यामुळं मोठ्या प्रमाणात सीना नदीत पाण्यातचा विसर्ग आला होता. त्यामुळं सीना नदीला महापूर आला. यामुळं शेती पिकांचं, घरांचं मोठं नुकसान झालं आहे.

पुण्यात पर्वती परिसरात फुटली पाईपलाइन

पुण्यातील पर्वती परिसरात महात्मा फुले वसाहत येथे बोअरचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचले आहे.

राज्यात अतिवृष्टीसंबंधी बैठकीला सुरुवात

राज्यात अतिवृष्टीसंबंधी बैठकीला सुरुवात या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यासोबत मंत्री मकरंद पाटील, गिरिश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित .

Shivsena : स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्याने हाती घेतले 'कमळ'

स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु असताना ठाकरे गटाला सिंधुदुर्गमध्ये धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सिंधुदुर्गमधील वैभववाडीचे तालुका अध्यक्ष मंगेश लोके यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रेम करायचे वय आता निघून गेलय; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकरांना टोला

प्रेम करायचं एक वय असतं परंतु त्यांना आता उतारवयात प्रेम सूचलय. प्रेम करायचं वय आता निघून गेलं आहे. तुम्ही लोकांना त्रास दिला, त्यांची घरं दार उध्दवस्त केली. आता उतरावयात प्रेम आठवलाय लागलय का असा टोला ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांना टोला‌ लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता निंबाळकर-गोरे यांच्यातील मनोमिनाला सध्यातरी ब्रेक लागला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शेकाप पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली भेट

शेकाप पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली असून राजकीय चर्चांना उधान आले आहे. जयंत पाटील यांनी, नवी मुंबई विमानतळामध्ये कामगारांच्या भरतीत स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यात यावे विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जावं यासाठी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तसेच यामुद्द्यावरून मोर्चा काढण्यासाठी ही चर्चा झाल्याचे कळत आहे.

'बायकोने जाळून घेतलं की जाळलं'? अनिल परब यांच्या आरोपावर रामदास कदम संतापले

रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. याचदरम्यान शिवसेना नेते अनिल परब यांनी यांनी देखील कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी 1993 मध्ये कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले होते की, त्यांना जाळले होते, याचीही नार्काे टेस्ट केली जावी, अशी मागणी केली. यावरून कदम यांनी थेट अनिल परबांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट म्हटले.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आदिती तटकरे यांचं उत्तर : आतापर्यंत जे कुणाला जमलं नाही ते महायुती सरकारने केलं

लाडकी बहीण सारख्या योजनांमधून सरकार पगारी मतदार तयार करीत आहेत , अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली होती. ज्याला महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी, आतापर्यंत जे कुणाला जमलं नाही ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. त्याचे नकारात्मक पडसाद लाडकी बहीण योजना सुरू केल्या पासूनच पहायला मिळाले. परंतु कुठल्याही टीकेकडे लक्ष न देता ही योजना पुढे सुरू ठेवणार आहोत. लाडक्या बहिणींच्या या योजनेमुळे आलेला आनंद आमच्यासाठी महत्वाचा असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

'ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि...' : उद्धव ठाकरेंचे दोनच वाक्यात कदमांच्या आरोपांना प्रत्युत्तर

एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष तुटून पडला आहे. कदम यांच्यावर शिवसेनेकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. यानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहे. अशातच ठाकरे यांनी मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही, अशा शद्बात त्यांनी कदम यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे.

Gautami Patil : अपघातावेळी गाडीत गौतमी होती, रिक्षाचालकाच्या मुलीचा दावा

गौतमी पाटीलच्या कारला झालेल्या अपघाताच्या तपासाला वेग आला असताना आता जखमी रिक्षाचालकाच्या मुलीने यासंदर्भात एक दावा केला आहे. अपघातावेळी गाडीत गौतमी देखील होती असा माझा संशय आहे असा दावा रिक्षाचालकाच्या मुलीने केला आहे. माझा संशय गौतमी मॅडमवर आहे, असं मुलीचं म्हणणं आहे.

Uddav Thackeray : ठाकरे ब्रॅण्डचा जन्म पुण्यात झाला : उद्धव ठाकरेंचे विधान

ठाकरे ब्रॅण्ड हा काही आत्ताच जन्माला आलेला नाही. तो गेल्या पाच ते सहा पिढ्यांपासून महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रॅण्ड आहे. ठाकरे ब्रॅंडचा जन्म पुण्यात झाला आहे. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ते पुणे दोऱ्यावर आहेत.

Ramdas Kadam : रामदास कदम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार : अनिल परब

रामदास कदम यांच्यावर अबू नुकसानीचा दावा करणार असून त्यातून जी रक्कम येईल ती दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करू असं अनिल परब यांनी यांनी म्हटलं आहे. रामदास कदम यांच्या आरोपांना त्यांनी आज उत्तर दिलं.

Ramdas Kadam : रामदास कदमची अक्कल गुढग्यात : अनिल परबांचा हल्लाबोल

बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाला निधनानंतर दोन दिवस मातोश्री मध्ये ठेवून हाताचे ठसे घेतल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला त्यावर उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं. 'रामदास कदमची अक्कल गुढग्यात'  असल्याचा हल्लाबोल परबांनी केला. हे लोक बाळासाहेबांच्या मृत्यूचे राजकारण करत असल्याचे परब म्हणाले.

Karnataka Government : ‘शक्ती’ योजनेला आंतरराष्ट्रीय बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची मान्यता

कर्नाटक सरकारचा प्रमुख महिला सक्षमीकरण उपक्रम असलेल्या महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास म्हणजे ‘शक्ती’ योजनेने आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्समध्ये बाजी मारून एक जागतिक टप्पा गाठला आहे. महिलांसाठी मोफत बस प्रवास देणारी ही योजना सुरू झाल्यापासून ५०० कोटींहून अधिक मोफत तिकिटे जारी केली आहेत. ही मान्यता गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसध्ये या योजनेची नोंद झाल्यानंतर आली आहे.

Chandrapur Update : शेतकरी विषप्राशन प्रकरणात तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील कुरोडा इथल्या शेतीसंबंधी प्रकरणात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करता जाणीवपूर्वक कर्तव्यात कसुरी केल्याने भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी आदेश जारी केले आहेत. अर्जदार परमेश्वर विश्वनाथ मेश्राम यांनी कुरोडा इथल्या शेतजमिनीवर 2015 च्या न्यायालयीन आदेशानुसार वारसांची नावे अभिलेखात नोंदविण्याची मागणी केली होती.

Sudhir Mungantiwar On Prakash Ambedkar : 'देशाचे पंतप्रधान 'ओबीसी' आहेत'; मुनगंटीवारांनी आंबेडकरांनी आठवण करून दिली

भाजप आणि RSS ओबीसींचा घात करीत आहेत, या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत आणि ओबीसींचा घात करतील, असे म्हणणे योग्य नाही. ही अशक्य गोष्ट आहे, शब्दात मुनगंटीवार यांनी आंबेडकरांचे विधान खोडून काढळं आहे.

Raju Shetti : जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही; माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा

सरकारच्या सुलतानी वागण्यामुळे शेतकरी खचला आहे, शेतकऱ्यांना लढण्याची उर्मी निर्माण करायची आहे. शेतकऱ्यानी आत्महत्येच्या दिशेने जावू नये, सगळे एकत्र मिळून लढा उभा करू. हे सरकार दरिद्री आणि भामटं आहे, एका बाजूला सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा-आठवा वेतन आयोग लागू करते, मेट्रोसाठी पैसे आहेत, पण शेतकऱ्यांसाठी मदत म्हणलं की, अजितदादा म्हणतात सगळी नाटक करता येतात पण पैशाचं नाही, याची आठवण करून, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Sindhudurg News : बेळगाव अन् कुडाळ इथले नऊ पर्यटक समुद्रात  बुडाले; चार जणांचा मृत्यू, तीन बेपत्ता, दोघे वाचले

वेंगुर्ल्यातील शिरोडा वेळागर बीचवर सायंकाळी बेळगाव अन् कुडाळ इथले नऊ पर्यटक बुडाले होते. यातील तीन पर्यटकांचे मृतदेह हाती लागले होते. तर दोघांना वाचविण्यात यश आले. दरम्यान रात्री उशिरा एका पर्यटकांचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आला. तर चार पर्यटक बेपत्ता होते. यातील अजून एकाचा मृतदेह सकाळी आरवली येथील किनाऱ्यानजीक दिसून आला. आणखी तिघांचा शोध घेण्यात येत आहे.

Akole VBA Politics : 'वंचित'च्या माजी आमदाराकडून औरंगजेबाचा गौरवपूर्ण उल्लेख; वाद उफळण्याची शक्यता

अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विराट सभा पार पडली. याच मेळाव्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांच्या भाषणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. खतीब यांनी आपल्या भाषणात औरंगजेबाच्या मजारीचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी औरंगजेबाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रकाश आंबेडकरांमुळेच खुलताबाद मधील औरंगजेबाची कबर वाचल्याचं ते म्हणाले. खतीब वंचितच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.

Jalgaon Crime Update : जळगाव शासकीय रुग्णालयातील डॉक्टरवर हल्ला; बेदम मारहाणीत डॉक्टर रक्तबंबाळ

जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉ. मोहित गादिया यांच्यावर उपचारादरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. रुग्णालयात गर्दी केल्यामुळे डॉक्टरांनी नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले होते. त्याचा राग आल्याने काही नातेवाईकांनी डॉ. गादिया यांना कानशिलात लगावत खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरांच्या कानाचा पडदा फाटला असून नाकातून रक्तस्त्रावही झाला आहे. पोलिसांनी दोघा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

Sharad Pawar : मंत्री शिवराज चव्हाण यांची सुप्रियांनी भेट घेत नुकसानग्रस्तांना उभे करण्यासाठी मदतीची मागणी केली; शरद पवार यांची माहिती

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. नुकसानग्रस्तांचं पुनर्वसन आवश्यक आहे. यावर सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. पक्षाच्यावतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री कृषी शिवराज चव्हाण यांची भेट घेतली असून, महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांच्या कानावर घातली आहे. अपेक्षा अशी आहे त्यांच्याकडून लवकरात लवकर निर्णय होतील, अन् नुकसानग्रस्तांना उभे करण्यासाठी सरकार हातभार लावेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde SDhivsena : करमाळा इथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद विकोपाला; जिल्हाप्रमुख महेश चिवटेंवर जीवघेणा हल्ला

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे करमाळा इथले जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. महेश चिवटे हे शिंदेंचे स्वीय सहायक मंगेश चिवटे यांचे बंधू आहे. रश्मी बागल, दिग्विजय बागल यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, दुपारी 12 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार

ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून दुपारी बारा वाजता ते पुणे श्रमिक पत्रकार संघ वार्तालाप करणार आहेत. त्यानंतर 1 वाजता अजित नागरी पतसंस्था महिला मेळाव्याला संबोधित करतील. तर पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात शिवसेना शाखा प्रमुख व पदाधिकाऱ्यांची बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत.

जागतिक पातळीवर मोदींना किंमत नसल्याने जगातील बहुसंख्य देश पाकिस्तानच्या बाजूने - प्रकाश आंबेडकर

डोनाल्ड ट्रम्प हे मोदींना विश्वगुरू नव्हे तर चपराशी समजत असल्यामुळे त्यांनी अमेरिकेतून भारतीयांना हकलण्याचं धोरण स्वीकारलं आहे. मोदींना जागतिक पातळीवर किंमत नसल्याने जगातील बहुसंख्य देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहत आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

Nashik Kumbhmela : मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज कुंभमेळा आढावा बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत कुंभमेळा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी नाशिक जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्री, यांच्यासह मंत्री समितीचे सदस्य राहणार उपस्थित राहणार आहेत.

Gautami Patil Car Accident : गौतमी पाटीलला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बजावली नोटीस

पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबर रोजी एका एका रिक्षाला गौतमी पाटीलच्या भरधाव कारनं जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले होते. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आता थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोषींवर कडक कारवाई करण्याची निर्देश दिल्यामुळे आता गौतमी पाटीलवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Prakash Ambedkar: मोदींना टाटा, बाय बाय करा अन् देश वाचवा, प्रकाश आंबेडकरांचा ओबीसींना सल्ला

मोदींना टाटा बाय बाय करून देशाला वाचवा असे, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. तसंच ओबीसींचा घात आरएसएस-भाजपने केला आहे. एवढं तरी ओबीसींनी डोक्यात घ्यावे, तरच ओबीसी आरक्षण वाचेल स्थानिक पातळीवर ओबीसी नेतृत्वाला संधी देणारे आरक्षण आता हातातून जाण्याची शक्यता असून नुसते राजकीय आरक्षण जाणार नाही, तर शैक्षणिक आरक्षण सुद्धा जाईल. त्यामुळे ओबीसींनी वेळीच सावध व्हावं, असा इशारा देखील आंबेडकर यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT