शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची रविवारी दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वरळी मतदारसंघातून मिलिंद देवरा तर कुडाळमधून निलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. आमची फार मोठी चूक होती. चूक लक्षात आल्यानंतर पवारसाहेब जो निर्णय घेतली त्यासोबत राहणार असल्याचा निर्णय झाला असल्याचे रमेश थोरात म्हणाले. अजित पवारांचा साथ सोडायचा प्रश्न नाही मात्र मी भारतीय जनता पक्षासोबत राहू शकत नाही, असे रमेश थोरात म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता.27) आपला उमेदवारी दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 29 ऑक्टोबर अंतिम तारीख असल्याने उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
माहीम मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर भेटले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यावेळी उपस्थित होते. माहीम मतदारसंघात मनसेचे उमेदवार राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठींबा देण्याबाबत सदा सरवणकर यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या पक्षाला एकही जागा जाहीर करण्यात आली नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आरपीआयला पाच जागा हव्या असल्याचे पत्र दिले आहे. आम्ही 2012 पासून भाजपसोबत आलो पण आज आरपीआय कुठे दिसत नाही. मी त्यांचेकडे नाराजी व्यक्त केली आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज तिसरी यादी जाहीर केली आहे. यात नऊ जणांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार , अजित पवार यांचे खंदे समर्थक, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी मराठा कार्ड काढल्याचे बोलले जाते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत देशमुख यांनी नुकताच प्रवेश केला आहे. मुंडेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देशमुख यांना उमेदवारी देऊन घेरलं आहे. लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे फॅक्टरने अनेक नेत्यांना दणका दिला होता. आता विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर किती चालणार हे निकालानंतरच कळेल.
मोहोळ - सिद्धी रमेश कदम
अणुशक्तीनगर - फहाद अहमद
चिंचवड - राहुल कलाटे
भोसरी - अजित गव्हाणे
करंजा - ज्ञायक पटणी
हिंगणघाट - अतुल वांदिले
हिंगणा - रमेश बंग
माजलगाव - मोहन बाजीराव जगताप
परळी - राजेसाहेब देशमुख
पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला आहे. या मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत मोकाटे यांना ए.बी फॉर्म दिला आहे. त्यामुळे आता त्यांची उमेदवारी फिक्स झाली असून मातोश्रीवर ठाकरे यांनी त्यांना ए.बी फॉर्म दिला आहे. त्यामुळे आता कोथरूडमध्ये चंद्रकांत मोकाटे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा सामना होणार आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रशांत जगताप तर महायुतीकडून चेतन तुपे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुती आणि आघाडीतील इच्छुकांनी बंडखोरी केली आहे.त्यामुळे चेतन तुपे, प्रशांत जगताप यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मतदारसंघात सध्या आघाडीत बिघाडीच्या राजकारणावर जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हडपसर विधानसभा काँग्रेस समितीच्या वतीने नुकत्याच घेतलेल्या निर्धार मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागांच्या अदलाबदलीत काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे घेऊन बाळासाहेब शिवरकर यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी जोरदार मागणी केली.
प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार महादेव बाबर यांनी कार्यकर्ते व शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपल्या संपर्क कार्यालयावर मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आघाडीच्या जागा वाटपावर तीव्र नाराजी व्यक्त करीत माजी आमदार बाबर यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची मागणी केली. युती आणि आघाडीतील नेते बंडखोरांची समजूत काढणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधूमाळी सुरु झाली आहे. पुण्यात काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी येणार आहेत. याबाबत पुणे शहर काँग्रेस कमिटीकडून त्यांना पत्र पाठवले होते. पुण्यात राहुल गांधी यांचा रोड शो होणार आहे. त्यांची जाहीर सभा होणार नाही, त्यांच्या रोड शोची तारीख लवकरच निश्चित होणार असल्याचे असे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या पुण्यातील उमेदवारांसाठी राहुल गांधीचा एकत्रित रोड शो होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चार जणांची नवे जाहीर केली. गेवराईमधून विजयसिंग पंडित, फलटणमधून सचिन कांबळे- पाटील, पारनेरमधून काशिनाथ दाते यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मैदानात उतरवलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
MahaVikas Aghadi
पुण्यात आज महाविकास आघाडीची समन्वय बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाचे शहराध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. शहरातील उमेदवार ठरल्यानंतर महाविकास आघाडीमधील इच्छुक नाराज आहेत. तर काही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी बंड पुकारलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. नाराजीचा फटका आघाडीला बसू नये यासाठी ही समन्वय बैठक घेण्यात येत आहे.
वांद्रे टर्मिनसवर गोरखपूर एक्सप्रेस अडीच तास उशीरा आल्यामुळे प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 9 जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली आहे.
काँग्रेसची काल (शनिवारी) 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर,माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा यात समावेश आहे, पण सावंतांनी आपल्याला मतदारसंघ बदलून द्यावा, अशी विनंती केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो, असे त्यांनी टि्वट केले आहे.
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 16 जणांना संधी दिली आहे. या आधीत पहिलंच नाव असलेले नांदेड दक्षिणचे उमेदवार मोहनराव हंबर्डे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवणार असतील तर सगळे महायुती म्हणून त्यांना पाठिंबा देऊ, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. मात्र, माहिममधून शिवसेनेचे उमेदवार असलेले सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे माहिम मतदारसंघात ठाकरेंना पाठिंबा द्यायचा की नाही? यावरून शिवसेना-भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.