Devendra Fadnavis | Ajit Pawar | Eknath Shinde | Sharad Pawar| Uddhav thackeray | Nana Patole Sarkarnama
महाराष्ट्र

Assembly Election 2024 : आजघडीला निवडणुका झाल्यातर महायुती की 'मविआ', कोण ठरणार वरचढ? मोठा ओपिनियन पोल समोर

Akshay Sabale

केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू-काश्मीर आणि हरयाणातील निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा मात्र केली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

मात्र, लोकसभेत '440' चा झटका बसल्यानंतर सत्ता राखण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विविध योजना, विकासकामे आणि जनतेपर्यंत पोहचण्यासाठी महायुतीकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तर, मेळावे, रॅली यांच्या माध्यमातून सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.

यातच आजघडीला विधानसभेच्या निवडणुका झाल्यातर महायुती की महाविकास आघाडी कोण वरचढ ठरणार? याचा एक ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलनुसार विधानसभेला भाजप ( Bjp ) पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरू शकतो. तर, शिंदेंच्या शिवसेनेला 30 पेक्षाही कमी जागा मिळताना दिसत आहेत. लोकसभेनंतर विधानसभेलाही महाविकास आघाडीत काँग्रेसला जनतेनं पसंती दिल्याचं दिसत आहे.

'टाइम्स नाउ नवभारत'च्या ओपिनियन पोलनुसार, 42 हजार जणांची मते जाणून घेतली आहेत. भाजपला पोलमध्ये 95 ते 100, शिंदे गटाला 19 ते 24 आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला ( Ncp ) 7 ते 12 जागा मिळताना दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) काँग्रेसला ( Congress ) 42 ते 47, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 26 ते 31 आणि शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला 23 ते 28 जागा मिळू शकतात. अन्य पक्षांना 11 ते 16 मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भाजपला 25.8, शिंदे गटाला 14.2 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 5.2 टक्के मते मिळतील. काँग्रेसला 18.6, ठाकरेंच्या शिवसेनेला 17.6, आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला 6.2 टक्के मते मिळतील, अशी शक्यता पोलमध्ये वर्तवली आहे.

जर, विधानसभेत बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता आहे. निवडणुकीत असं चित्र राहिलं, तर महायुतीला सत्तेत येण्यासाठी मित्रपक्षांची आवश्यकता भासणार आहे. त्यासह महाविकास आघाडी सत्तेपासून बरीच दूर असल्याचं पोलमध्ये दिसत आहे. त्यासह शिंदेंपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेचा 'स्ट्राइक रेट' विधानसभेला वाढल्याचं दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT