Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या दोन कंपन्यांचा उल्लेख करत पवारांनी निशाणा साधला. या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच पलटवार केला आहे.
बारामतीतील कन्हेरी येथे पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित पहिल्या सभेत पवारांनी उद्योगांवर भाजप सरकारवर टीका केली. उद्योगधंद्यात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर घसरल्याचे पवारांनी म्हटले. त्यावर फडणवीसांनी या वयात इतके खोटे बोलायचे नसते, असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीसांनी ट्विट करत सगळा लेखाजोखाच मांडला आहे. ज्यांच्या काळात गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात तर कधी कर्नाटक नंबर 1 वर होते, ते आज महाराष्ट्र क्रमांक 1 वर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत. तरी सुद्धा खोटा नरेटिव्ह सेट होण्यापूर्वी वास्तव महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगावे लागेल, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
टाटा एअरबस प्रकल्प नागपूरमध्ये होणार होता. तो गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरून फडणवीसांनी प्रकल्पाच्या कराराबाबतची माहिती देत तत्कालीन महाविकास आघाडीवर खापर फोडले आहे. या संपूर्ण कालखंडात राज्यात सरकार होते, महाविकास आघाडीचे. त्यांच्याच काळात टाटांचे अधिकारी नागपुरात एमएडीसीच्या कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना प्रतिसाद द्यायलाही कुणी तयार नव्हते, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
शरद पवारांनी फॉक्सकॉन कंपनीही गुजरातला गेल्याचा उल्लेख भाषणात केला होता. त्यावरही फडणवीसांनी पत्रव्यवहार, अर्ज आदींची माहिती तारखांनिशी दिली आहे. टाटा एअरबस, फॉक्सकॉन असो, किंवा अन्य प्रकल्प सातत्याने खोटे बोलून मविआच्या नेत्यांनी दिशाभूल केली. पुन्हा पुन्हा खोटे बोलून तोच तो अजेंडा सांगितला जात आहे. स्वत:जवळ काही सांगण्यासारखे नसले तर खोट्याशिवाय कशाचाच सहारा नसतो, हेच सत्य असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.
एकीकडे 52 टक्के परकीय गुंतवणूक राज्यात आणणारे सरकार आहे आणि दुसरीकडे गुजरातच्या ब्रँड अॅम्बॅसिडरच्या भूमिकेतील कर्तव्यशून्य महाविकास आघाडी. राज्यातील जनताच याचा निकाल 20 नोव्हेंबरला लावेल, असेही फडणवीसांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.