Jalna News : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकारचा शपथविधी झाला की लगेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे शपथविधीनंतर काही तासांतच नव्य सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.
मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी भावी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, सरकार आता तुमचे आहे, मराठा आरक्षण लवकर द्यायचे. बेईमानी करायची नाही. बेईमानी केली तर तुम्हाला खूप भोगावं लागेल. मी आणि आमचा मराठा समाज मैदानातच नव्हता. आम्ही असतो तर तुमच्यात किती दम आहे ते बघितले असते.
सरकारला जाहीरपणे सांगतो, मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या, नाहीतर समाज छाताडावर बसेल. सामुहिक आमरण उपोषणाला बसणार आहे. तुमचे सरकार स्थापन झाले की लगेच बैठक घेऊन उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
कुणाचंही सरकार असलं तरी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्ही आमच्या लेकरांच्या भविष्यापासून दूर जाऊ शकत नाही. मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन करतो. पण मराठा आरक्षणात खोडा घालू नये. नाहीतर मराठा तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला.
महायुतीतील काही नेत्यांकडून जरांगे फॅक्टर निवडणुकीत फेल झाल्याचा दावा केला आहे. त्यावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही मैदानातच नव्हतो. जे निवडून आलेत तो सगळा फॅक्टर मराठ्यांचाच आहे. सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आले आहे. मराठा बंधनमुक्त केला होता. कुणाचाही दावणीला समाज बांधला नव्हता. मराठ्यांशिवाय या राज्यात कुणाचाही सत्ता येऊ शकत नाही. मराठा फॅक्टर घाबरूनच मराठ्यांना तिकीटे दिली. म्हणून तर 204 निवडून आले. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला, तुमची हयात जाईल, असे जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.