Nana Patole Sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole : नाना पटोलेच प्रदेशाध्यक्ष; खर्गेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?

Highlights of Nana Patole and Mallikarjun Kharge's meeting: विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती.

Rajanand More

New Delhi : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीची धुळधाण उडाली. सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला असून केवळ 16 आमदार निवडून आले आहे. ही नामुष्की ओढवल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. पण त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

नाना पटोले यांनी सोमवारी दुपारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. राज्यातील निकालाबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. मात्र, राजीनाम्याबाबत बैठकीत कसलीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केली. ही चर्चा केवळ मीडियात असून अध्यक्षांनीही आपल्याशी त्याबाबत काही चर्चा केली नसल्याचे सूचक विधान पटोलेंनी केले आहे.

खर्गे यांनी निकालाबाबत सविस्तर माहिती दिल्याचेही पटोलेंनी सांगितले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित असून मान्य करता येणार नाही. हे मशीनने तयार झालेले सरकार आहे. लोकांनी नोट जिहाद, दारू जिहाद पाहिला आहे. यामागील शुक्राचार्य कोण, असा प्रश्न उपस्थित करत पटोलेंनी महायुतीवर निशाणा साधला.

जनता आमच्यासोबत आहे, असा विश्वासही पटोलेंनी यावेळी व्यक्त केला. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या मतांमध्ये मोठी तफावत आहे. लोकसभेला मिळालेली मते आणि विधानसभेला मिळालेल्या मतांमध्ये एवढी तफावत कशी, अशी शंका पटोलेंनी उपस्थित केली.

दरम्यान, पराभवाची जबाबदारी स्वीकारून पटोले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निकाल लागताच सुरू झाली होती. उमेदवार निवडीपासून मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवरून झालेल्या वादाला पटोले जबाबदारी असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. उमेदवार जाहीर करण्यास विलंब केल्याने प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला नाही. महाविकास आघाडीत त्यावरून कुरबुरी पाहायला मिळाल्या. त्याचा चुकीचा संदेश जनतेत गेल्याचीही चर्चा आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT