Maharashtra assembly election 2024 Voting Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Elections 2024 LIVE Updates : निकालापूर्वीच भाजपला धक्का; आमदाराने केली मोठी घोषणा

Maharashtra Assembly Elections Result 2024 LIVE : महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान पार पडलं असून उद्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यासह देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. निकालाआधी विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. त्यामध्ये राज्यात कोणाचं सरकार येणार याबाबतचा दावा करण्यात आला आहे. तर या पोलवर राजकीय नेते काय प्रतिक्रिया देत आहेत ते जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

Assembly Elections 2024 : भाजपमधील असंतोषामुळे घेतला राजकीय संन्यास

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालापूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या विद्यामान आमदाराने राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली. पक्षातील नेत्यांकडून झालेल्या आरोपामुळे व्यथित होऊन संन्यास घेण्याची घोषणा भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी पत्रकार परिषदेत केली. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत.

मी आता राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी भाजपचे काम करणार नाही आणि कोणत्याही पक्षात जाणार नाही. आता मी समाज कार्य करणार आहे. १९८३ पासून मी भाजपचे कार्य केले. त्यावेळी पक्षाला गावागावात नेले. संघटना मजबूत केली. त्यामुळे २००९ मध्ये आमदार झालो. त्यानंतर २०१४ मध्ये पराभव झाला. परंतु पुन्हा २०१९ मध्ये निवडून आलो, अशी भावना दादाराव केचे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली.

Assembly Elections 2024 : लाडक्या बहिणींचे 65 टक्के मतदान

2019 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 57 लाख 96 हजार अधिक महिलांनी मतदान केले आहे. 2019 मध्ये महिलांच्या मतांची टक्केवारी 58.83 टक्के होता. मात्र, यंदा तो महिलांच्या मतदानाची टक्केवारी 65 टक्क्याहून अधिक आहे. यंदा तब्बल तीन कोटी 6 लाख 49 हजार महिलांनी बजावला मतदानाचा हक्क. तर 2019 साली 2 कोटी 48 लाख 52 हजार महिलांनी केले होते मतदान.

Narayan Rane : महायुतीचीच सत्ता येणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार हे महायुतीशी हातमिळवणी करणार आहेत, असा दावा माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

Vinod Tawde : विनोद तावडे यांनी पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस, रडारवर कोण कोण?

भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे मुंबईतील पैसे वाटप प्रकरणानंतर काँग्रेसविरुद्ध चांगलेच आक्रमक झालेत. मुंबई विरारमधील विवांत हाॅटेलमध्ये विनोद तावडे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत बसलेले असताना, त्यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. मविआसह विरोधकांनी यावर भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त सुप्रिया नेत यांनी देखील जोरदार टीका केली होती. दरम्यान, विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप फेटाळलेत. काँग्रेसने यात आपली विनाकारण बदनामी केली म्हणून, खरगे, गांधी आणि श्रीनेत यांना विनोद तावडे यांनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

Devendra Fadnavis : सागर बंगल्यावर हालचालींना वेग

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आले आहेत. तर, मनसेचे बाळा नांदगावकर यांन देखील फडणवीसांची भेट घेतली आहे.

Nana Patole Live News : महायुती काहीही पाप करू शकते - नाना पटोले 

उद्या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षाकडून आपले आमदार फूटू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दुपारी 1 वाजता काँग्रेस उमेदवारांची ऑनलाइन बैठक होणार असल्याची माहिती दिली आहे. तसंच सर्व उमेदवारांना 17 सी फॉर्म बंधनकारक केला असून रमेश चेन्निथला, बाळासाहेब थोरात हे या उमेदवारांची बैठक घेणार आहेत. तसेच महायुतीत गडबड असून ते काहीतरी पाप करु शकतात असा दावा पटोले यांनी केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या निकालावर तब्बल 50 कोटींचा सट्टा

छत्रपती संभाजीनगर पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघाचा निकाल काय लागणार यासाठी मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सट्टा बाजार तेजीत आला आहे. तर संभाजीनगरच्या निकालाबाबत सट्टा बाजारातील बुक्की देखील संभ्रमात पडले आहेत. आतापर्यंत तब्बल 50 कोटींचा सट्टा लागल्याची माहिती समोर येत आहे.

J P Nadda Live News : मणिपूर सारख्या गंभीर विषयावरही काँग्रेसकडून राजकारण - जे.पी नड्डा

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीलं आहे. या पत्रात त्यांनी मणिपूर सारख्या गंभीर विषयावर काँग्रेस राजकीय फायदा करून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर देशाला कमजोर करणाऱ्या शक्तींना आम्ही पाठिंबा देणार नसल्याचंही त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.

Sanjay Ruat Live News : 26 तारखेला आम्हीच सरकार स्थापन करू - संजय राऊत

राज्यात आम्हीच सरकार स्थापन करू महाविकास आघाडी 160 जागा सहज जिंकेल. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, असं म्हणत 26 तारखेला आम्हीच सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

BJP Politics Live News : भाजपचा पुढचा अध्यक्ष कोण?

भाजपची आज राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबात महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे प्रभारी आणि सहप्रभारी उपस्थित राहणार आहेत. तर ही बैठक भाजप मुख्यालयात होणार आहे. त्यामुळे आगामी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण असणार याचा निर्णय या बैठकीत होणार आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 LIVE : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहेत. उद्या राज्यातील सर्व 288 मतदारसंघातील निकाल जाहीर होणार आहेत. या निकालानंतर राज्यात आगामी सरकार कोणाचं असणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

Malvan statue collapsed : चेतन पाटीलला जामीन मंजूर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणी मालवणच्या दिवाणी न्यायालयाने जामीन फेटाळला होता. मात्र, चेतन पाटील याला आता मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Election Commission LIVE News :  बटेंगे तो कटेंगे घोषणेवर कारवाई होणार?

विधानसभा निवडणुकी दरम्यान विविध पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या वादग्रस्त घोषणा आणि वक्तव्याचा अहवाल निवडणूक आयोगाने मागवला आहे. त्यामुळे आता राज्यातील प्रचाराक वादग्रस्त ठरलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेवर आयोग कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Assembly Elections Live News : युती आघाडीतील मित्र पक्षांचा मुख्यमंत्रिपदावर दावा

राज्यात महाविकास आघाडी की महायुती कोणाची सत्ता येणार हे उद्या जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधीच मुख्यमंत्रि‍पदावरून युती-आघाडीत वाद सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं नेतृत्व करावं अशी मागणी केली जात आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री रहावेत अशी मागणी केली जात आहे. तिकडे महाविकास आघाडीतही संजय राऊत आणि नाना पटोलेंमध्ये सीएमपदावरून मतभेद असल्याचं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT