शिवसेना'UBT' पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात मुंबईतील नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका केली होती. शायना एनसी यांच्या तक्रारीवर खासदार सावंत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 79 आणि कलम 356 (2) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अरविंद सावंत यांनी 'इम्पोर्टेड माल नहीं चलेगा, ओरिजनल चलेगा', असे विधान सावंत यांनी केले होते.
"राज्यात वाढलेला भ्रष्टाचार, महिलांवर होणारे अत्याचार, अपमान किंवा ज्यापद्धतीने राजकीय आणि सामाजिक स्तर खालवण्याचे चाललेलं काम सुरू आहे. माणसांमध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये भेद निर्माण करून, राजकारण केले जात आहे. हे सर्व देशाला अंधाराकडे नेत आहे. त्यामुळे पुढची दिवाळी अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी असावी, यासाठी काम करावे लागणार आहे", असे म्हणत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिवाळीच्या राज्यातील आणि देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षाला अवघी एक जागा मिळाली आहे. त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात आली असून विधानसभेला जारी एक जागा असेल तरी आम्हाला एक विधानपरिषद आणि सत्ता आल्यावर मंत्रिपद देण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
लोकसभेला ताई (सुप्रिया सुळे) आणि विधानसभेला दादा (अजित पवार) असं मतदारांनी ठरवलं होतं," असं विधान बारामती विधानसभेचे उमेदवार अजित पवारा यांनी बारामतीत केले आहे. काहींनी ठरवलं होतं की लोकसभेला ताईंना निवडून द्यायचं आणि विधानसभेला दादाला. त्याबद्दल जास्त बोलणार नाही. परंतु मागच्या वेळी पहिल्या नंबरच्या मताधिक्क्याने पाठवलं. त्यामुळे मी पहिल्या नंबरचा निधी आणला. बारामतीत ९ हजार कोटी निधी देण्याचं काम केलं, यावेळीही विधानसभेत चांगल्या मताधिक्क्यांने संधी द्या”, असं आवाहन अजित पवारांनी मतदारांना केलं.
'अरविंद सावंत महिलांचा मान राखा आणि माफी मागा' अशी मागणी करत शिवसेनेनेच्या उमेदवार शायना एनसी या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी त्या रवाना झाल्या आहेत. शायना एनसी यांना अरविंद सावंत यांनी अप्रत्यक्षपणे माल असं म्हटलं आहे. त्यावर शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांचा समाचार घेतला घेत त्यांना सुनावले आहे. एखाद्या स्त्रीला माल शब्द वापरणं म्हणजे तिचा अपमान करणं आहे. जे उद्धव ठाकरे गटाचे नेते करीत आहेत. माल बोलल्याने तुम्हीच आता बेहाल होणार आहात, अशा शब्दात शायना एनसी यांनी सावंतांना खडेबोल सुनावले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये 8 नोव्हेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या काळात सभा होणार आहे. 8 नोव्हेंबरला धुळे, नाशिक येथे सभा होईल. 9 नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर तर, 13 नोव्हेंबरला सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबरला संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई येथे पंतप्रधान मोदींच्या सभा होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी महायुती सरकारवर टीका केली. अंधारावर मात करणाऱ्या दिवाळी सणाच्या शुभेच्छा देताना, गेली अडीच वर्षे या खोके सरकारने भ्रष्टाचाराचा अंधार राज्यात पसरवला आहे. या अंधारातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी शिवसेनेची मशाल हातात घेऊन लढू या, असे म्हटलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी. विधानसभा निवडणुकीत भूमिका घेताना राजू शेट्टींनी कोणालाच विश्वासात न घेतल्याचा आरोप करत जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा शेट्टी यांच्याकडे पाठवला आहे. तर राजू शेट्टी हुकुमशहा पद्धतीने संघटनेत काम करत असल्याचाही आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने चांगली कंबर कसली आहे. अशातच आता लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार सभा होणार आहेत. 8 नोव्हेंबरला नाशिक आणि धुळ्यात मोदींच्या सभा होणार आहेत.
यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न, अशा आशयाचे बॅनर्स पर्वती विधानसभा मतदारसंघात लावण्यात आले आहेत. या मतदारसंघात महायुतीकडून माधुरी मिसाळ तर महाविकास आघाडीकडून अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसचे आबा बागुल यांनी या मतदारसंघातून बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे बागुल नाराज होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. अशातच आता सध्या लागलेल्या बॅनरमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
माहिम मतदारसंघात सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी माघार घेण्यासाठी दबाव असल्याची चर्चा आहे. शिवाय ते या निवडणुकीतून माघार घेणार का? याबात तर्कवितर्क लावले जात असानाच आता आपण काहीही झालं तरी ही निवडणूक लढवणारच असल्याचं स्पष्ट केलं आहे.
बेलापूरमधील स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीतून माघार न घेता ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. आमच्या मागण्या मान्य होत नसल्याने आम्ही निवडणूक लढवत आहे. मात्र, मागण्या मान्य झाल्यास मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कागल विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
एकीकडे माहिम मतदारसंघात सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी माघार घेण्यासाठी दबाव आहे. तर दुसरीकडे मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी आपल्या प्रचाराला सुरीवात केली आहे. शिवाय आपण ही निवडणूक सहज जिंकू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी वापरलेल्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो, असं लाड यांनी म्हटलं आहे.
सावंत काय म्हणाले ?
अमीन पटेल यांच्या प्रचारसभेत अरविंद सावंत शायना एनसी यांना 'माल' म्हणाले. "आम्हाला इम्पोर्टेड माल नको... आमचा ओरिजनल माल आहे.."
माहिम विधानसभा मतदारसंघातून माघार घेण्यासाठी सदा सरवणकर यांच्यावर दबाव असल्याचं बोललं जात आहे. अशातच त्यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. विधानसभेच्या बदल्यात विधान परिषदेवर आमदारकी दिली जाईल. मात्र आता राज ठाकरेंच्या मुलासाठी या मतदारसंघातून माघार घ्यावी अशी मागणी भाजप आणि शिंदेंकडून केली जात असल्याची माहिती आहे.
दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघात कैवल्यधाम परिसरात निवडणूक आयोगाच्या पथकाने विविध देशांचे सुमारे 10 लाख डॉलर्स एका वाहनातून जप्त केले आहेत. या डॉलरची भारतीय चलनानुसार 9 कोटी रुपये किंमत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना काल पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर त्यांच्यावर आज अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र सुजात यांनी दिली आहे. तसंच प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघांच्या अधिकृत उमेदवार शायना एनसी या सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचल्या आहेत.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचा अर्ज फेटाळल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनीच त्यांचं ऑफिस फोडलं आहे. अर्जाच्या छाननीत त्यांचं वय 25 दिवसांनी कमी असल्याने अर्ज फेटाळला गेला. तर अंबेरे यांनी विरोधकांशी हात मिळवणी केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. पुण्यावरून जाणाऱ्या गाडीचा सिंदखेडराजा जवळ मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी काल (गुरुवारी) पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस मुंबईच्या अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी रवी राजा यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले आहे. "रवी राजा यांनी पक्षाने खूप काही दिले, सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून ते इच्छुक होते. पण इतर इच्छुकांच्या विचार करता रवी राजा यांना पक्षश्रेष्ठींनी तिकीट दिले नाही," असे गायकवाड म्हणाल्या.
नवी मुंबईतील सानपाडा येथे रात्री उशिरा 'ड्रंक अँड ड्राइव्ह'चं प्रकरण उघडकीस आलं आहे. एका कार चालकाने 3 जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली असून य दुर्घटनेत 3 जण जखमी झाले आहेत. वाहनचालकाला सानपाडा पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भरारी पथकाने गुरूवारी मध्यरात्री 17 लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली आहे. रोख रकमे संदर्भात कोणताही वैध पुरावा नसल्याने ही रोकड जप्त करण्यात आली असून आयकर विभागाच्या माध्यमातून पुढील तपासणी सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.