उद्धव ठाकरे म्हणाले, आपले हिंदूत्व चूल पेटवणारे आणि त्यांचे हिंदूत्व हे घर पेटवणारे आहे. मोदी पंतप्रधान असताना जर सुरक्षित वाटत नसेल तर मोदींनी राजीनामा द्यावा . हे कटेंग आणि बटेंगेच्या घोषणा देतायेत. सत्ता येईपर्यंत सबका साथ सबका विकास आणि सत्तेत आल्यावर कटेंग तो बटेंगे. याचा घरा नारा लुटेंगे आणि दोस्तो मे बाटोंगे असा आहे, अला टोला ठाकरेंनी लगावला.
ओबीसींचा डेटा माहीत नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण थांबवले आहे. तसेच एससी, एसटी आरक्षणाचे वर्गीकरण करून त्यामध्ये क्रिमीलेयर लावले आहे. त्यामुळे भाजपाप्रमाणे काँग्रेस सुद्धा आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून महिलांविषयी वक्तव्य करणाऱ्या धनंजय महाडिकांचे समाचार घेतला.त्यांनी महिलांना नोकर समजले आहे काय ? प्रचार रॅलीसाठी आलेल्या एकाही महिलेच्या केसाला जरी धक्का लागला तरी मुन्ना तुझा हात उखडुन काढल्याशिवाय राहणार नाही. ही जाहीर धमकी समज. ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले आहे, असाही इशारा महाडिक यांना ठाकरेंनी दिला.
नागपूरमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा रोड शो होता. काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ प्रियांका यांचा रोड शो होता. मात्र, या रोड शोमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी वडगाव शेरीचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांच्यासह राज्यातील बसप उमेदवाराच्या समर्थनार्थ जाहिर 'महासभा' घेतली. सभेदरम्यान त्यांनी बसप सत्तेत शामिल होईल असे थेट भाष्य केले. स्वबळावर सरकार आणण्याचा प्रयत्न बसपचा आहे, पंरतु, योग्य संख्याबळ आले नाही तर 'बॅलेसिंग पॉवर' म्हणून सरकार बनवणाऱ्या पक्षाला समर्थन देवून आणि सरकारमध्ये सहभागी होवून लोकांना न्याय देवू, असे आश्वासन यावेळी उपस्थितांना मायावतींनी दिले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. तुळस येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे जाहीर केले. माझी मुलगी सोनाली ही माझा राजकीय वारसदार नाही, लवकरच माझा वारसदार ठरेल, असे केसरकर म्हणाले.
गडचिरोलीतील देसाईगंज येथील जाहीर सभेतून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महायुती सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. मागील दहा वर्षापासून देशात भाजपची सत्ता आहे त्यांनी काय केलं? असा सवाल करत त्यांनी हे केवळ धर्म आणि जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला. तसंच यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला. महायुतीच्या काळात 8 लाख नोकऱ्या महाराष्ट्राबाहेर गेल्या. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
कराड विमानतळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. तर यावेळीही उद्धव ठाकरेंनी या तपासणींचा व्हिडिओ बनवला असून माझ्याआधी कोणाची बॅग तपासली हा प्रश्न त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला.
उद्धव ठाकरे सत्तेत राहिले असते तर महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला असता, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार त्यांना नव्हता. त्यांनी विकासाला स्थगिती देण्याचं काम केलं. ते सत्तेत राहिले असते तर महाराष्ट्र दहा वर्षे मागे गेला असता."
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात प्रचारासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील दौरा गुंडाळला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये चार सभांचं नियोजन होतं. त्यासाठी ते शनिवारी रात्री नागपुरात आले होते. अमित शाह आता तातडीने दिल्लीकडे रवाना झालेत. त्यांच्या सभा स्मृती इराणी, शिवराजसिंह चौहान आणि भाजपचे इतर नेते घेणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांच्यासाठी ही सभा घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. 20) मतदान होणार आहे. त्यामुळे बुधवारी मार्केट यार्ड बंद ठेवलं जाणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील मुख्य बाजारासह उपबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. बारामतीहून करमाळ्याकडे आले असता त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात सभा घेत आहेत. मात्र, आजचा त्यांचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. काही अपरिहार्य कारणाने दौरा रद्द करत असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय ते आता तातडीने दिल्लीला जाणार आहेत. मात्र, प्रचारासाठी एक दिवस उरला असताना अमित शहांचा दौरा रद्द झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या या गोळीबाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बीड-लातूर रोडवरील सेलू आंबा टोल नाक्यावर ही घटना घडली असून संदीप तांदळे आणि अभय पंडित असे जण या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्यामुळे राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची गडचिरोलीत तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची देखील आज गडचिरोलीत सभा होणार आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची दिवसेंदिवस ताकद वाढत असल्याचं दिसत आहे. तर 'आम्ही दोघेही शिवसैनिक आहोत. त्यामुळे गंगाधर हेच महादेव आहेत आणि गंगाधर हेच शक्तिमान आहेत. त्यामुळे मतदारांनी गंगाधर बधे यांना महादेव बाबर समजूनच मोठ्या बहुसंख्येने मतदान करावे', असं आवाहान माजी आमदार महादेव बाबर यांनी मतदारांना केलं आहे. त्यामुळे आता पुण्यात आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दर्यापूरमध्ये माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत मोठा राडा झाला आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावातील सभेत काही लोकांनी नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचं समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.