बीड कोचिंग क्लासमधील लैंगिक छळ प्रकरणावरून बीडसह राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरता कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. अशातच आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणाचा तपास महिला IPS अधिकाऱ्याकडे सोपवल्याची घोषणा विधानसभेत केली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन केलं आहे. पटोले अध्यक्षांच्या आसनासमोर गेल्यामुळे हे निलंबन करण्यात आलं आहे. तर निलंबनानंतर विरोधकांनी सभात्याग केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
भाजप खासदार नारायण राणे यांनी एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत, असं म्हणत उद्धव यांना डिवचलं आहे. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या याच टीके संदर्भात प्रतिक्रिया देताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले, "नारायण राणे यांनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष काढला आणि एक वर्षात आपला पक्ष का सोडला? त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला? त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. नारायण राणे आणि राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते."
वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमी मराठी माणसाच्या विरोधात बोलतात. या माणसाला जो कानाखाली वाजवेल त्याला एक लाखाचे बक्षीस दिले जाईल असे सायन कोळीवाडा मधील शिवसेना ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक प्रशांत भिसे यांनी जाहीर केलं आहे.
पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाला सुरूवात झाली तरीही अद्याप विरोधी पक्षनेतेपदाची निवड झालेली नाही. यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सरकार आणि विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी माझं नाव दिलं होतं. मात्र, सरकारने अध्यक्षांकडे आणि त्यांनी सरकारकडे बोट दाखवत हे पद रिक्त ठेवलेलं आहे. यासाठी विधिमंडळाकडून आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण शिल्लक राहिलेली नाही. मात्र, त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा लागतो. ही अध्यक्ष आणि सरकार दोघांची जबाबदारी आहे. हे दोघे एकमेकांकडे बोट दाखवत असले तरी आम्ही अज्ञानी नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधपक्षनेते पदाची निवडीवरून सरकारवर निशाणा साधला.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज कोल्हापूरसह राज्यभरात रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवरच कोल्हापूर पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना नोटीस लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात बंदी आदेश लागू असल्यामुळे त्यांना आंदोलन करता येणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर आज रास्ता रोको असल्याने आज सकाळी शिरोळ येथील निवासस्थानी पोलिसांनी कायदा व सुव्यस्थेच्या पार्श्वभुमीवर त्यांना नोटीस दिली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक्सवर एक कविता शेअर करत ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सामनात छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम, अशांना कधीच जाग येत नसते, जे घेतात झोपेचं सोंग, ओळखा पाहू कोण? असं म्हणत त्यांनी ठाकरेंचं मराठी प्रेम बेगडी असल्याचं म्हटलं आहे. तर आता चित्रा वाघ यांच्या याच कवितेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कशासाठी आमदार व्हायचं असतं… काय करू लागली… जनतेचे प्रश्न सोडून, कविता करू लागली…ऐकून कविता यांची जनता आता हसू लागली.. इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…’, अशा शब्दात त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमिवार आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून हे आंदोलन केलं जाणार आहे. कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी सहभागी होणार आहेत.
Pune News, 01 July : मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. सोमवार (ता. 30 जून) रोजी रात्री 9 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवारी सकाळी 11 वाजता लेख पॅराडाईज या राहत्या घरापासून निघणार आहे. तर अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी येथे करण्यात येणार असल्याची माहिती भेगडे कुटुंबियांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.