CM Eknath Shinde Speech : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेले उपोषण सुरूच आहे, पण त्याआधी त्यांनी सगेसोयरेची अधिसूचना सरकारने काढल्यानंतर मुंबईत जाण्याचा निर्णय नवी मुंबईत स्थगित केला. अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी आता ते आग्रही असून, सरकारने फसवणूक केल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक सादर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर भाष्य केले. (Maharashtra Assembly Session LIVE Updates)
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, एकनाथ शिंदेंनी वेळ मारून नेली, असे काही लोकांना वाटले. पण आम्ही सरकार म्हणून दीड वर्षात जे काम केले ते प्रत्येक निर्णय़ सर्वसामान्य माणसाच्या हिताचा घेतला. राज्यकर्त्यांना वैयक्तिक लाभ होईल, तेव्हा कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शब्द देताना विचारपूर्वक, दहा वेळा, शंभर वेळा विचार करून शब्द देतो. एकदा शब्द दिला की तो पाळण्याचा प्रयत्न करतो. शब्द फिरवत नाही. त्यामुळेच लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. म्हणून आज या ठिकाणी शब्द पाळतोय. (Maratha Reservation)
मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) जे आंदोलन केले आहे, त्यांच्या आंदोलनाचा एकजुटीचा हा विजय आहे. आंदोलकांनी आजवर कधी संयम सोडला नाही. या वेळी काही ठिकाणी अनुचित घटना घडल्या, त्या घडायला नको होत्या. आज मराठा समाजाने, जरांगेंनी आमच्यावर विश्वास ठेवत त्यावेळी उपोषण मागे घेतले. त्यानंतर आपण पुढची प्रक्रिया सुरू केली, असे शिंदे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील महत्त्वाचे दहा मुद्दे –
1. माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याच्या आणि पदवी, पदव्युत्तर पदवी व व्यावसायिक पाठ्यक्रम साध्य करण्याच्या बाबतीत, मराठा समाजाची शिक्षणाची पातळी कमी आहे.
2. दारिद्र्यरेषेखाली असलेली व पिवळी शिधापत्रिका असलेली मराठा कुटुंबे 21.22 टक्के इतकी आहेत. मराठा कुटुंबांची टक्केवारी, राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असून, ते आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत.
3. सार्वजनिक नोकऱ्यांच्या सर्व क्षेत्रांमध्ये मराठा समाजाचे अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे आणि म्हणून सेवांमध्ये पर्याप्त प्रमाणात आरक्षण देण्याच्या दृष्टीने तो विशेष संरक्षण मिळण्यास पात्र आहे.
4. मराठा समाजाचा उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेला वर्ग 84 टक्के इतका आहे.
5. खुल्या प्रवर्गाच्या, उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेल्या वर्गाच्या तुलनेतदेखील त्याची आर्थिक स्थिती खूपच निम्न आहे.
6. दुर्बल मराठा वर्गाचा, उत्पन्नाचा स्राेत शेती असल्याने आणि प्रत्येक वर्षागणिक हा स्राेत कमी-कमी होत असल्याने त्याला दशकानुदशके आत्यंतिक दारिद्र्य सोसावे लागत आहे.
7. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीच्या टक्केवारीमध्ये 94 टक्के व्यक्ती मराठा समाजातील आहेत.
8. शेतीतून मिळणारा परतावा कमी, धारण जमिनीचे तुकडे होणे, शेतीशी संबंधित असलेली पारंपरिक प्रतिष्ठा गमावणे, युवकांच्या शैक्षणिक प्रशिक्षणाकडे लक्ष न देणे, इत्यादी घटकांमधून मराठा समाजाची आर्थिक स्थिती ढासळत असल्याचे दिसून आले आहे.
9. निरक्षरता व उच्च शिक्षणाचा अभाव यामुळे मराठा वर्ग ज्या नोकऱ्यांमुळे त्याला समाजात काही स्थान मिळू शकेल, अशा प्रतिष्ठित नोकऱ्यांमध्ये व रोजगारामध्ये प्रवेश करू शकलेला नाही.
10. मराठा वर्ग हा केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या दृष्टीनेदेखील मुख्य प्रवाहातून पूर्णपणे बाहेर राहिला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.