पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रशांत जगताप यांच्या विरोधात वानवडी भागातील प्रभागातून अभिजित शिवरकरांना भाजपकडून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना हव्या असलेल्या जागा आम्ही दिल्या आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनीही आम्ही ठाकरे बंंधूंसोबत जाण्यास तयार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे ठाकरे बंधूंसोबत पवारांची राष्ट्रवादी असणार हे निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व देण्यात आले आहे. आता मलिक यांच्या घरातील तिघांना मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये मलिक यांचे बंधू, बहीण आणि सूनेचा समावेश आहे. नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक १६२ मधून, मलिक यांची बहीण सईदा खान यांना १६८ मधून, तर कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक यांना १७० मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकिट देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही महायुतीसोबत आहोत. मात्र, महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपकडून रिपब्लिकन पक्षाला १५ जागा मिळाव्यात, अशी आमची भूमिका आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
नांदेड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे, असे विधान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले आहे. पक्षश्रेष्ठींकडून तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्थानिक पातळीवर कमलकिशोर कदम, डॉ. सुनील कदम यांच्यासोबत आमची चर्चा झाली आहे, असे आमदार चिखलीकर यांनी स्पष्ट केले
आयुष कोमकर याच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर हा आज (ता. २७ डिसेंबर) पुणे महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोलिस बंदोबस्तात निवडणूक कार्यालयात दाखल झाला आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात एक माजी महापौर, शहराध्यक्ष यांच्यासह नऊ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी होण्याची वाट न पाहता पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. आता आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून 122 जागांपैकी 54 जागांवर मनसे, तर 68 जागांवर शिवसेना ठाकरे सेना पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहेच.
कल्याण–डोंबिवलीत महायुतीमध्ये सक्रिय भूमिका बजावणारे आणि आगरी–कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या ‘निर्धार मेळाव्या’त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
जालना महापालिका निवडणुकीत महायुतीची आज दुपारी चार वाजता महत्वाची बैठक होणार असून, या बैठकीनंतर युतीची घोषणा होईल, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. अंतिम टप्प्यात युती संदर्भात चर्चा सुरू आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लिंकवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली आहे. लोणावळा खंडाळा महाबळेश्वर कोल्हापूर इथं सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या खासगी वाहनाने मोठ्या प्रमाणात पर्यटक बाहेर पडल्यामुळे वाहनांची गर्दी झालेली आहे. महामार्ग पोलिस ही वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप, अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नेत्यांकडून महायुतीवर शिक्कामोर्तब झाला असला, तरी जागा वाटपावर तिढा कायम आहे. भाजप मंत्री गिरीश महाजन जळगावमध्ये आल्यावर महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. महायुतीवरील जागा वाटपावर तीन ते चार दिवसांपासून गोपनीय बैठका सुरू होत्या. राष्ट्रवादीची मनधरणी करण्यात भाजपला यश आले.
धाराशिवमध्ये नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षा ॲक्शन मोडवर आली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटलांकडून बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शिरढोण, ईटकुर, येरमाळा गटात आमदार कैलास पाटलांनी बैठका घेतल्या.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील संभ्रम आणि अनिश्चिततेचा फटका आता थेट प्रचारावर दिसून येत आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेने स्वतंत्र प्रचाराची ठाम भूमिका घेत मैदानात उतरण्याचा निर्णायक पाऊल उचलले आहे. एकीकडे युतीच्या बैठका वारंवार होत असल्,या तरी त्यातून कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने अखेर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपची वाट न पाहता स्वतंत्र प्रचाराला सुरुवात केली आहे.
खोपोलीतील एकनाथ शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या हत्येत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रवींद्र देवकर व त्याचा मुलगा दर्शन पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे इथं आज सकाळी रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांच्या गाडीला पोलिसांनी गाडी आडवी घालत पकडले. जिल्हा पोलिस अधीक्षक आचल दलाल याच्या मार्गदर्शनाखाली 8 वेगवेगळ्या टीम इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
भाजपने ठाकरे यांच्या शिवसेनेला दिलेल्या धक्क्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा आज नाशिकमध्ये दौरा आहे ते तपोवन परिसरात झाडांची पाहणी करणार करणार आहेत. दुपारी महापालिका प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
Pune NCP : अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती पुण्यात फिस्कटली असल्याची माहिती समोर येत आहे. घड्याळ की तुतारी, कोणत्या चिन्हावर लढायचं यावरुन ही युती फिस्कटल्याची समजते.
मुंबईतील महायुतीतील जागवाटपाचा तिढा सुटला आहे. सर्व 227 जागांवर शिवसेना आणि भाजपच्या बैठकीत एकमत झाले आहे. उद्यापासून पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.