Maharashtra Budget Session 2024 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Budget Session 2024: 'ते' पंचामृत आणि आताचं पंचामृत हे स्क्रीप्टेड - पटोले

सरकारनामा ब्यूरो

फडणवीसांचं भाषण आणि दादांचं भाषण सारखंच -

हे बजेट या राज्यामधील लोकांच्या तोंडाला पानं पुसणारं झालं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फडणवीसांच्या मागील भाषणात आणि अजित पवारांच्या भाषणात काहीही फरक नाही. त्यामुळे ते फडणवीसांचं पंचामृत आणि आताचं पंचामृत हे स्क्रीप्टेड वाटतं. असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात म्हटलं आहे.

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चेवर बोलताना अंबादान दानवे यांनी ताशेरे ओढले. मागच्या वर्षीचा अंतरिम अर्थसंकल्पाला केंद्राने पंचामृत म्हटले होतं. त्यावरुन त्यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतले "अर्थसंकल्पातून सरकारला काय करायचं, या सगळ्या गोष्टी जनतेला समजत असतात. अर्थसंकल्प राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असतो. परंतु यावर्षीचा अंतरिम अर्थसंकल्प कोणासाठी आहे? सर्वसामान्यांसाठी, बेरोजगारांसाठी आहे काय की, आणखी कशासाठी असा प्रश्न पडतो.

हा अर्थसंकल्प राज्याला डबघाईस घेऊन जाणारा आहे. मागच्या वर्षीचा अंतरिम अर्थसंकल्पाला केंद्राने पंचामृत म्हटले होतं. पंचामृताला खूप महत्व आहे. या पंचामृतातील एक थेंब तरी पडला का? असा थेट सवाल दानवेंनी पवारांना केला. एकीकडे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये द्यायचे आणि दुसरीकडे शेतमालाला भाव दिला जात नाही. या दोन हजार रुपयांत काय होणार? तेवढे पैसे तर शेतकऱ्यांना भाड्यालासुद्धा पुरत नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला तर त्यांना अशा मदतीची बिलकूल गरज नाही असेही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

तो डाव आम्ही उधळून लावू-दानवे

राज्याला 7 लाख 82 हजार 981 कोटीं रुपयांच्या कर्जापर्यंत नेण्याचं काम सुरू आहे. या अर्थसंकल्पाचं विश्लेष केलं तर धनगर समाजाला 22 योजना होत्या त्याला निधी दिला नाही. विदर्भ मराठवाड्याला सापत्न वागणूक दिली आहे. अनुसुचित जाती जमातीला कमी तरतूद आहे. माहिती आणि जनसंपर्क या विषयावर सर्वाधिक तरतूद केली आहे. राज्याच्या विकासासाठी कुठलीही तरतूद नाही. शेतकऱ्यांना बर्बाद करण्याचा डाव सरकारने आखला आहे. मात्र, तो डाव आम्ही उधळून लावू, असा इशारा दानवेंनी अजित पवार यांना दिला.

"लेक लाडकी' योजनेच्या निधीसाठी अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. त्यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे, मध्य प्रदेशाच्या धर्तीवर सुरु असलेल्या 'लेक लाडकी' योजनेत महाराष्ट्रातील किती जणांना, किती लेकींना त्यांचा फायदा झाला, हे सरकारने सांगावे. अनेकांना या योजनेचा फायदा मिळाला नाही, योजना राबविणारे आणि मंत्री यांना त्यांचा फायदा झाला. अंगणवाडी सेविकांच्या मागण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे, अशी खंत दानवे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर योगेश सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून विधानसभेत आमदार राम कदम आणि आशिष शेलार यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "राम कदम यांनी मांडलेला प्रश्न हा देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी होता. तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत फडणवीस आमदारांवर चिडले होते. भाजपचा एकही आमदार फडणवीस यांच्या बाजूने बोलत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, त्या दिवसापासून आजपर्यंत भाजप आमदारांच्या बोलण्यात सर्वसामान्य व्यक्ती कुठे दिसत नाही. मात्र, फडणवीस यांचे नाव वारंवार घेतले जात असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

फडणवीसांबाबत वादग्रस्त विधान केलेला व्हिडिओ व्हायरल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या योगेश सावंत यांच्याबाबत मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली होती. सावंत यांचे संबंध बारामतीशी असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम, आशिष शेलार यांनी केला.

योगेश सावंत यांच्यावर कारवाई न करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यावर दबाब आणला, असा गंभीर आरोप कदम, शेलार यांनी विधानसभेत केला. तालिका अध्यक्षांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहे. योगेश सावंत यांनी फडणवीसांबाबत वादग्रस्त विधान केलेला व्हिडिओ व्हायरल केला आहे.

अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी लक्ष वेधून अशा प्रकरणाकडे सरकारने गंभीरपणे पाहावे, असे सरकारला सांगितले. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण केले. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री आमित शाह यांनी नुकतेच केले. त्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले,'शाह योग्यच बोलले आहे. २०१९ला आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचे होते. त्यासाठी भाजपला संपवविण्याचा डाव उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत रचला होता,' विधानभवन परिसरात शेलार माध्यमांशी बोलत होते.

Maharashtra Budget Session 2024

अजित पवार यांनी विधानसभेत राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना आणि शेवटी अजितदादांनी कुसुमाग्रजांच्या कवितांच्या ओळी वाचून दाखवून विरोधकांना चिमटा काढला. त्याला विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात अजितदादांना प्रत्युत्तर दिले. अजितदादांनी कुसुमाग्रजांच्या कविता वाचताना अजितदादांनी त्यातील मधल्या ओळी टाळल्या, असे सांगत वडेट्टीवारांनी त्या कुठल्या ओळी होत्या.त्या सभागृहात त्यांनी वाचून दाखवल्या.

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।

मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

या 'स्वातंत्र्यदेवतीची विनवणी'कवितेतील या ओळी अजित पवारांनी वगळल्या, हे वडेट्टीवारांनी सभागृहाच्या लक्षात आणून देत सरकारला खडेबोल सूनावले.

सर्व परीक्षा एमपीएसच्या मार्फेत घ्या

परीक्षा गैरव्यवहाराबाबत श्वेतपत्रिका काढावा, सर्व परीक्षा एमपीएसच्या मार्फेत घ्याव्यात, अशी मागणी विरोधकांनी केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करीत सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते.

दानवे म्हणाले की, राज्यात दररोज वेगवेगळ्या परीक्षा होत आहेत. पण रोज पेपरफुटीचे प्रकरण घडत आहेत. दररोज राज्यातील विविध भागातून पेपर फुटल्याचे फोन येत आहेत. परंतु, ज्यांच्याकडे पैसे आहेत, अशा लोकांचे रॅकेट महाराष्ट्रात कार्यरत असून, ते रॅकेट पेपर फोडत आहेत. उत्तर प्रदेशात असे घडल्यानंतर त्यानंतर त्यांनी सर्व परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे या प्रकरणी सरकारने ठोस पाऊले उचलली पाहिजे.

सरकारने केलेल्या कामाचा गाजावाजा करण्यासाठी जाहीरातीवर सरकारने अवाढव्य खर्च केला. समाजकल्याण विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास, ऊर्जा विभागावर अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करुन दिले नाही, त्यामुळे हे बजेट कुणासाठी आहे, हे सरकारने सांगावे- वडेट्टीवार

सरकारचा नवा गोरखधंदा सुरु

अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात शिधापत्रिकेवर महिलांना साड्या वाटण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात आक्षेप घेतला . साड्या वाटप करण्यापेक्षा महिलांच्या हातात शस्त्र देण्याची गरज आहे. त्यांना संरक्षण द्या, साड्या वाटून मते मागणार आहेत, सरकारने हा नवा गोरखधंदा सुरु केला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT