Pratap Sarnaik On Swargate Crime.jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Swargate Rape Case : सरनाईकांना खडबडून जाग; स्वारगेट घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काढले महत्वाचे आदेश

Transport Minister Pratap Sarnaik MSRTC News : प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे तसेच महिला सुरक्षारक्षक नेमण्याचे निर्देश प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Rajanand More

Pune Rape Case update : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खडबडून जागे झाले आहेत. या घटनेनंतर त्यांनी आपला मोर्चा महाराष्ट्रातील सर्वच बसस्थानके आणि आगारांकडे वळवला आहे. राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण (security audit) करण्याचे निर्देश सरनाईक यांनी गुरूवारी दिले.

सरनाईक यांनी गुरूवारी मुंबईत परिवहन विभाग व एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महिलांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्यात आला. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी आज दिल्या.

बसस्थानक व आगारांमध्ये उभ्या ठेवण्यात येत असलेल्या निर्लेखन बसेस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांची 15 एप्रिलपर्यंत विल्हेवाट लावण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले आहेत. राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद आहे. मात्र, सध्या हे पद रिक्त आहे. या पदावर भारतीय पोलिस सेवेतील (IPS) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याच्या सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्यभरात सर्वच एसटी बसस्थानके व आगारांमध्ये सीसीटीव्हीची एआय तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत यंत्रणा उभारण्यात यावी, नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे, बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम गतीने पूर्ण करावे, स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांची गस्त बसस्थानकावर वाढवण्यात यावी, अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या.

आगार व्यवस्थापक हे त्या आगाराचे पालक असल्यामुळे त्यांनी तेथील निवासस्थानामध्येच वास्तव्य करावे, असे आदेशही सरनाईक यांनी दिले. कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशांची फसवणूक होऊ नये, यासाठी बसस्थानकावर काम करणाऱ्या प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला त्याचे ओळखपत्र देण्यात यावे, अशी महत्वपूर्ण सूचना मंत्र्यांनी केली.

चालक – वाहकांनी आगारात आणलेली बस सोडताना ती बंद असल्याची, दरवाजे बंद करण्याची काळजी घ्यावी व साध्या बसेसमध्ये दरवाजासह खिडक्याही बंद असल्याची खात्री करावी. बस स्थानकांवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT