Maharashtra Cabinet Decisions 
महाराष्ट्र

Cabinet Decisions: पोलिसांसाठी 'मुख्यमंत्री शौर्य पदक' ते पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई; जाणून घ्या मंत्रिमंडळाचे निर्णय

Cabinet Decisions: राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडली, यावेळी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Amit Ujagare

Cabinet Decisions: राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडली, यावेळी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पोलिसांनी केलेल्या साहसी कामगिरीसाठी पोलीस शौर्य पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. तर पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याबाबतची धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर वडास समाजासंबंधी, नवीन तंत्रज्ञान-संशोधनासाठी योजना, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भत्त्याबाबत, वसतीगृह कर्मचाऱ्यांचं मानधन, स्वाधार योजनेच्या अनुदानाबाबत काही महत्वाचे निर्णय या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

मुख्यमंत्री शौर्य पदक

पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना जोखीम पत्करुन केलेल्या कामगिरीसाठी रोख पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार, पदक तसेच प्रशस्तीपत्रानं सन्मानित करण्यात येणार आहे. याच्या निवडीसाठी त्रिस्तरीय विविध समित्यांच्या रचना, वर्षभरातील कामगिरीची दखल घेतली जाणार आहे. यावर्षी १ जानेवारी २०२६ पासूनची कामगिरी यासाठी गृहीत धरली जाणार आहे. दरवर्षी महाराष्ट्र दिन १ मेच्या पूर्वसंध्येला या शौर्य पदकांची घोषणा केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे शौर्यपदक प्रदान केलं जाणार आहे.

पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई

पोलीस कोठडीत असताना होणाऱ्या अनैसर्गिक मृत्यूच्या बाबतीत मृताच्या कायदेशीर वारसांना वेळेत आर्थिक सहाय्य देण्यासाठी, सर्वसमावेशक अशा धोरणाला राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

वडार समाजाला मोठा दिलासा

पारंपारिक दगडफोड व उत्खननातील गौण खनिज स्वामित्वधनासाठी (रॉयल्टी) वाढीव सवलत दिली जाणार आहे. तसंच वार्षिक उत्खनन मर्यादा दोनशेवरुन पाचशे ब्रास करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९६८ मध्ये सुधारणेला मंजुरी देण्यात आली आहे.

नवतंत्रज्ञान, संशोधनासाठी 'सीएम सृष्टी' योजना

शैक्षणिक संस्थांसाठी उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधनासाठी सीएम सृष्टी योजना राबवण्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय उच्च व तंत्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतनं, रसायन तंत्रज्ञान संस्था-आयसीटी, मुंबई. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड या संस्थांच्या माध्यमातून या योजना राबवल्या जाणार आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भत्त्यांमध्ये सुधारणा

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

सामाजिक न्याय विभागांर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, चौकीदारांच्या मानधनात भरीव वाढ होणार आहे. राज्यातील सुमारे २ हजार ३८८ अनुदानिक वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांना यामुळं दिलासा मिळाला आहे.

स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी पात्र पण अर्ज करुनही प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी तसंच बारावीनंतरच्या व्यावसायिक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व शैक्षणिक सुविधांसाठी मिळणाऱ्या भत्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT