Maharashtra Education News: शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृह निर्वाह भत्त्यात वाढ करण्यापासून खासगी अनुदानित शाळांच्या नियमनासाठी स्वतंत्र कायद्याचे प्रारूप तयार करण्यापर्यंत अनेक विषयांना राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील आर्थिक सुविधा, प्रशासकीय कामकाज आणि वेतन संरचनेत बदल होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण तसेच शालेय शिक्षण विभागाशी संबंधित प्रस्तावांचा समावेश आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे सुधारित दर लागू करण्यास मान्यता देण्यात आली. ईबीसी, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. भोजन, निवास आणि दैनंदिन खर्चासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ झाल्याने विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.
शालेय शिक्षण विभागाशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. खासगी अनुदानित शाळांच्या कामकाजावर सर्वंकष नियंत्रण आणि नियमन आणण्यासाठी 'महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६' चे प्रारूप तयार करण्यात आले आहे. हे विधेयक विधिमंडळात सादर करण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे.
शालार्थ प्रणालीत समाविष्ट असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सक्षमीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) नोंदणीकृत बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या अधिनियमांमध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात आली. कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती तसेच वार्षिक अहवाल आणि लेखे यांसंदर्भातील तरतुदींमध्ये एकसमानता आणण्याचा या सुधारणांचा उद्देश आहे.
शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांप्रमाणे खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांमधील ग्रंथपालांनाही सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकूणच, वसतिगृह भत्त्यातील वाढ, शालार्थ कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुविधा, विद्यापीठांच्या प्रशासकीय सुधारणांसह खासगी शाळांच्या नियमनाचा नवा कायदा आणि ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीतील बदल अशा विविध निर्णयांचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.