Maharashtra CET 2027: व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सीईटी परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची संधी मिळणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) आगामी शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून राज्यातील ११ व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपली कामगिरी सुधारून प्रवेशाच्या संधी वाढवता येणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील जेईई परीक्षेच्या धर्तीवर राज्यातही हा बदल करण्यात येत आहे. यासाठी सीईटी सेलने आगामी शैक्षणिक वर्षातील दोन्ही सत्रांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पहिल्या सत्रातील परीक्षा २८ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेवर अवलंबून राहावे लागणार नाही. पहिल्या प्रयत्नातील कामगिरी समाधानकारक नसेल, तर दुसऱ्या सत्रात पुन्हा परीक्षा देऊन गुण वाढविण्याची संधी उपलब्ध होईल.
सीईटी सेलने या निर्णयात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. यामध्ये पीसीएम, पीसीबी, एमबीए, एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षांचा एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही सत्रांत परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रातील सीईटी परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. मात्र, पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्यास किंवा मिळालेले गुण वाढविण्याची इच्छा असल्यास दुसऱ्या सत्रातील परीक्षा देता येईल. दुसऱ्या परीक्षेला बसणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या तयारीनुसार दुसऱ्या प्रयत्नाचा निर्णय घेता येणार आहे.
या नव्या नियमातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्रांच्या परीक्षा दिल्यास त्यापैकी ज्या परीक्षेत सर्वाधिक पर्सेंटाइल गुण मिळतील, तेच गुण अंतिम गुणवत्तायादी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. म्हणजेच दुसऱ्या परीक्षेत गुण कमी मिळाले तरी पहिल्या परीक्षेतील अधिक गुणांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकतो. हा नियम शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून लागू होणार आहे.
एकाच वर्षात दोनदा परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. आजारपण, तांत्रिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे पहिल्या परीक्षेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही, तरी दुसऱ्या संधीचा उपयोग करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची आणि प्रवेशासाठी अधिक चांगली संधी मिळविण्याची मुभा मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.