Maharashtra DJ Ban rules across districts: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून सुरू झालेल्या डीजेबंदीच्या मागणीनंतर महाराष्ट्रात विविध भागात याचे पडसाद दिसत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापरावर पोलिस व प्रशासनाने बंदी आणि निर्बंध लागू केले आहेत. ध्वनीप्रदूषण, नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेत विविध शहरांमध्ये आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीच्या दणदणाटावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
नागपूर शहरात पोलिसांनी ३ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत डीजेच्या वापरावर बंदी घातली आहे. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये गणेशोत्सवाच्या काळात डीजे लावण्यास पोलिसांकडून परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. सांगलीमध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी गणेश मंडळांना डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. सोलापूरमध्ये 13 ते 26 सप्टेंबर या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात डीजे आणि साऊंड सिस्टीमवर बंदी घालण्यात आल्याने डीजे व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. येथील व्यावसायिकांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन, नियमांच्या चौकटीत डीजेला परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. भंडारा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही प्रशासनाकडून डॉल्बीच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
कोल्हापुरात डीजे-डॉल्बीवर सरसकट बंदी नसून ,आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी दोन बेस आणि दोन टॉप लावण्यास परवानगी दिली आहे. पालघरमध्येही डीजेवर संपूर्ण बंदी नसून, नागरिकांना त्रास होणार नाही आणि ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचे पोलिसांनी आवाहन केले. मुंबईत न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. लाऊडस्पीकरला परवानगी असली तरी ध्वनीप्रदूषणाचे नियम लागू राहणार आहेत. साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांनी डीजे किंवा डॉल्बीवर सरसकट बंदी घालणे शक्य नसल्याचे सांगत. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ध्वनीमर्यादा पाळण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यात ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये प्रेशरमेड आणि प्लाझ्मा उपकरणांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. केवळ चार बेस, चार टॉपची मर्यादा निश्चित केली आहे. एकही बेस किंवा टॉप वाढवल्यास मंडळावर गुन्हा दाखल करून संपूर्ण ‘साउंड सिस्टिम’ जप्त केली जाईल, असा इशारा पुणे पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
एकीकडे नागपूर, सोलापूर, नवी मुंबई, पनवेल, धुळे, भंडारा, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी कडक निर्बंध किंवा बंदीची भूमिका घेण्यात आली आहे. तर कोल्हापूर, सातारा, पालघरमध्ये डीजेला काही अटींसह परवानगी देण्यात आली आहे. कोकणासहित इतर जिल्ह्यांमध्ये अजून याबाबत निर्णय झालेले नाहीत, त्यामुळे ‘महाराष्ट्रात DJवर नेमकी बंदी आहे का?’ या प्रश्नावर जिल्ह्यानुसार वेगवेगळे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले असले तरी त्यांच्याच पक्षात यावरून दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. खासदार मेधा कुलकर्णी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मुरलीधर मोहोळ, आमदार मेघना बोर्डीकर यांनी डीजेबंदीला पाठिंबा देत पारंपारिक पद्धतीने सण साजरा करावा असे आवाहन केले आहे. मात्र पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार प्रवीण दटके, नवनीत राणा यांचा मात्र याला विरोध असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.