Maharashtra Freedom of Religion Act (AI Image) Sarkarnama
महाराष्ट्र

Religious conversion Maharashtra : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल; पुण्यात प्रवचनातून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न

Maharashtra Freedom of Religion Act, first conversion case Maharashtra : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतर ब्रिटनहून आलेल्या धर्मगुरूवर पुण्यात बेकायदेशीर धर्मांतराचा पहिला गुन्हा; हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीवरून कारवाई

Rajanand More

Pune News : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. या कायद्याअंतर्गत पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात ब्रिटनहून आलेल्या एका धर्मगुरूवर बेकायदेशीर धर्मांतराचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी हिंदुत्तवादी संघटनांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी त्याची दखल घेत गुन्ह्याची नोंद केली आहे.

ब्रिटीश धर्मगुरूकडून पुण्यातील गुरुवार पेठेतील एका चर्चमध्ये दोन दिवसांपूर्वी प्रवचन दिले जात आहे. त्यांनी या प्रवचनाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायद्यांतर्गत अशाप्रकारे धर्मांतराचा प्रयत्न करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे ब्रिटनहून आलेल्या या व्यक्तीविरोधात पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र विधिमंडळात कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही नुकतीच त्याला मंजुरी दिली. त्यानंतर 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026' (Maharashtra Freedom of Religion Act, 2026) हा कायदा राज्यात लागू झाला आहे. त्याबाबतचे अधिकृत राजपत्र ३० जुलै रोजी प्रकाशित झाले आहे. त्याच तारखेपासून हा कायदाही अंमलात आला आहे.

काय आहेत तरतुदी?

धर्मस्वातंत्र्य कायद्यामध्ये धर्मांतरासाठीची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. धर्मांतर करण्यासाठी ६० दिवस आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्याबाबतची नोटीस द्यावी लागणार आहे. त्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार पुढील सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरही धर्मांतर करता येऊ शकतो. यामध्ये नोटिशीवर तक्रारही नोंदविता येऊ शकते. धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीचे पालक, भावंडे, नातेवाईकांना ही तक्रार करता येईल. त्यानंतर सर्व चौकशीअंतीच धर्मांतरावर निर्णय घेतला जाईल.

किती होईल शिक्षा?

कायद्यातील तरतुदींअंतर्गत दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतुद आहे. संबंधित व्यक्तीने हा गुन्हा वारंवार केला असल्यास ही शिक्षा १० वर्षांपर्यंत वाढेल, अशीही कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. जबरदस्तीने, फसवणूक करून, कोणत्याही प्रकारचे अमिष दाखवून किंवा चुकीची माहिती देऊन धर्मांतर करणे, शिक्षेस पात्र असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT