वडणुकीपूर्वी महायुतीतील तीनही पक्षांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता. मात्र सत्ता येताच तिघांनी शेतकऱ्यांना दिलेला आपला शब्द फिरवला, अशी टीका काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणी दत्तात्रेय गाडेची कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज पुणे सत्र न्यायलायत हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलचा शोध घेत असल्याची माहिती दिली. न्यायालयाने आरोपी दत्तात्रय गाडे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
धनंजय देशमुख यांचे साडू एका तरुणाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर धनंजय देशमुखांनी कायद्यासमोर सगळे समान असल्याच्या प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओची दखल बीड पोलिस आयुक्तांनी घेतली आहे. धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बीड पोलिस आयुक्त नवनीत कावत यांनी सांगितले आहे.
धुळवडी दिवशी पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रो ची प्रवासी सेवा सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत राहणार बंद आहे. त्यानंतर दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत पुणे मेट्रोची सेवा नियमित सुरू राहील. पुणे मेट्रो रेल ची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याच्यावर आणखी तीन कलमांची वाढ केली आहे. पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने अत्याचार करणे, अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांची वाढ. भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2), 115 (2) आणि 127(2) या कलमांची वाढ पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी आरोपी आणि पीडित तरुणीचे घटनेच्यावेळी परिधान केलेले कपडे जप्त करून क्राइम लॅबकडे पाठवले आहेत.
लाडकी बहीण योजना बंद केली तर दहा योजना सुरू करता येतील. असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे, या वक्तव्याने ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्यात कोथरूड परिसरात गजा मारणेच्या टोळीतील गुंडांनी तरुण अभियंत्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर मकोका अंतर्गत कारवाई करत ३ मार्चपर्यंत गजा मारणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्याला सांगलीच्या कारागृहात आणत असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानपरिषदेत बुधवारी एका प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. एमपीएससी, इंजिनिरींगचा अभ्यासक्रम येत्या काळात मराठीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे येत्या काळात याचा अभ्यास करणाऱ्या युवकांना मोठा फायदा होणार आहे.
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी खरेदी केलेल्या 35 कोटींच्या 100 शववाहिका पुण्यात डॉ. नायडू हॉस्पिटलच्या प्रांगणात धूळ खात पडल्या आहेत. तर 35 कोटींच्या खरेदीमागे काही काळंबेरे आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जानेवारीमध्येच पहिल्या स्लॉटच्या काही गाड्या आल्या. त्यानंतर उरलेल्या गाड्या जानेवारी महिन्यात आल्या. तीन महिन्यांहून अधिक काळ या शववाहिका पुण्यातील रुग्णालयाजवळ धूळखात उभ्या आहेत. याची चौकशी करावी, अशी मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
पुण्यातील स्वारगेट बससथनकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये काही दिवसांपूर्वीच धक्कादायक घटना घडली होती. बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 17 मार्चपर्यंत अटक करू करू नये, असे कोर्टाने म्हटले असून पुढील सुनावणी 17 मार्चला होणार आहे. कोरटकर हजर राहावेत की नको, यावर आज सुनावणी झाली. पोलिसांची विनंती कोर्टाने फेटाळली आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आज त्यांना घरी सोडण्यात आले असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याचा जामीन अर्ज वकिलांनी मागे घेतला आहे. पोलिसांनी खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आल्याने वकिलांनी अर्ज मागे घेतला. दरम्यान, खोक्याला पुढील एक-दोन दिवसांत बीडमध्ये आणले जाणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत उद्यापासून (रविवार) सलग चार दिवस बंद राहणार आहे. लासलगाव व्यापारी संघटनेने तसे पत्र बाजार समितीला दिले आहे. होळी निमित्ताने बाजार समिती बंद राहणार असून सोमवारपासून बाजार समितीचे व्यवहार पुन्हा सुरू होतील.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज आझाद मैदानात हजारो शेतकरी एकवटले. शक्तिपीठ महामार्ग विरोधात विधानसभेवरती मोर्चा धडकणार आहे. या आंदोलनासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी एकवटले आहेत.
लातूरमध्ये भर दुपारी रस्त्यावर एका युवकाला सात ते आठ लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हे टोळी युद्ध असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून, त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे.
आमदार रोहित पवार, आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? याच अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का? असा सवाल केला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी यावर लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही, असं म्हटलं आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचा खोटा पीए बनून जीवनाचा आनंद घेणाऱ्या भामट्याला उत्तराखंडमधील हरिद्वार पोलिसांनी अटक केली आहे. अमरिंदर सिंग असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक बनावट बीसीसीआय कार्डही जप्त केले आहे.
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येत वाँटेड असलेला कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा खळबळजनक दावा, एका स्थानिक वकिलाने केला आहे. नाशिक पोलिसांनी या दाव्याची दखल घेत, पडताळणी सुरू केली असून सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी सुरू केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ तारखेला होणार आहे. सरकारी पक्षाने वेळ मागितला होता, त्यांना कोर्टाने वेळ वाढवून दिला आहे. कोल्हापूरचे वकील विकास खाडे हे आरोपींचे वकील आहेत.
आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मी कॅमेऱ्यामागे फिरत नाही, कॅमेरे माझ्यामागे फिरकात, असे सांगत धसांनी मुंडेंना प्रत्युत्तर दिले आहे. पंकजा मुंडे यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार, असे धस यांनी सांगितले.
भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या कट्टर समर्थक 'खोक्या' सतीश भोसले याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. बीडचे पोलिस त्याला बीडला आणण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहेत. आताही त्यांनी मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाची घोषणा केली आहे. यावरून नवा वाद सुरू झाला आहे. याच वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, 'या देशातील मुस्लिम देशप्रेमीच आहेत', असे म्हणत टोला लगावला आहे.
राज्यात गेल्या तीन वर्षात तब्बल 1 लाख 4 हजार 710 अपघातांमध्ये 45 हजार 961 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. दारूप्रमाणेच ड्रग्ज सेवन केलेल्या चालकांचीही टेस्ट यापुढे घेतली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप मंत्री नीतेश राणे यांच्यावर टीका केली आहे. धनगर समाज मेंढी अन् बकरीला मुलांप्रमाणे जपतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना इतिहासाचे धडे द्यावे, असा देखील सल्ला दिला आहे.
मढी यात्रेदरम्यान मुस्लिम व्यवसायिकांना व्यापार करण्यास मनाई करत जागा देऊ नये, असा ठराव मढी ग्रामसभेत झाला होता. या ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. याबाबत मुकद्दर वजीरभाई पठाण यांनी याचिका दाखल केली होती. यानंतर आता मढी ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताला आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचे असून त्याआधी आपल्याला एक व्हावे लागेल. पण त्याहीआधी आपल्याला एक कट्टर हिंदू आणि हिंदू परिवार तयार करावे लागतील. त्यातून हिंदू तालुके आणि जिल्हा आणि शेवटी हिंदू राष्ट्र तयार होईल, असे वक्तव्य बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी केलय. ते नांदेड येथे शिवपुराण कथेत बोलत होते. त्यांचे आता हे वक्तव्य राज्यात चर्चेला आलं आहे.
सपा आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबवर उफाळून आलेल्या प्रेमानंतर राज्यात संतापाची लाट उसळी. यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी याचे मुळ कारण औरंगजेबची कबर असून तिच उखडून काढा असे म्हणत संताप व्यक्त केला होता. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कबरीला काँग्रेसने संरक्षण दिले असून ती भारतीय पुरातत्व विभागाच्या अख्यत्यारीत आहे. यामुळे असं लगेच निर्णय घेता येत नाही. पण आमचं सरकार ही कबर काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटलं होते. यानंतर आता मंत्री नितेश राणे यांनी औरंग्याची निशाणी नष्ट केलीय, आता कबरही उखडून काढू, अशा शब्दात इशारा देताना लाँग मार्च काढू असे म्हटलं आहे.
महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे 310 कोटी 84 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे आता महावितरणने थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी कठोर पाऊल उचलले असून एका महिन्यात 51 हजार 735 ग्राहकांना झटका दिला आहे. या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
अख्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा आज (ता.12) पासून न्यायालयीन खटला सुरू होत आहे. आज या प्रकरणाची पहिली सुनावणी होणार आहे. तर या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला असून त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे. तर आजच्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून वाल्मिक कराडचे आणखी कोणते कारनामे समोर येतात ते पाहावं लागणार आहे.
मंत्री नितेश राणे यांनी हिंदू खाटीक समाजातील तरूणांची बेरोजगारी थांबावी आणि हिंदूंना हिंदू माणसाकडून झटका मटण मिळावे म्हणून मल्हार झटका मटण संकल्पने आणली आहे. त्यांच्या या संकल्पनेला धनगर परिषदेने पाठिंबा दिला आहे. याबाबत अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे राणेंना पत्र देण्यात आलं आहे.
नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलेल्या संगमेश्वर आणि त्यांचे बलिदान झालेल्या तुळापूरसाठी भरीव निधीची तरतूद केली. या ठिकाणांचा विकास करण्याची घोषणा केली. यावरूम आता भाजप आमदारानेच सरकारचे कान टोचताना घरचा आहेर दिला आहे. भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी, छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काळात तब्बल 33 दिवस धर्मवीर गडावर ठेवण्यात आले होते, तेथेच त्यांचा अनन्वित छळ केला. जी भूमी छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झाली, अशा श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडाला विकास निधी देण्यास सरकार कमी पडले आहे. या गडाच्या विकासासाठी कोणताही निधी या अर्थसंकल्पात देण्यात आला नसल्याचे म्हटलं आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राज्य सरकारकडून क्रिमिलेअरबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिलीय. विधानपरिषद सदस्य राजेश राठोड यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिले आहे. तर याच्याआधीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात केंद्राकडे यासंदर्भात शिफारस करण्यात आल्याचेही मंत्री सावे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.