अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वाहनांना काळा काचा तसेच काळा रंगाच्या फिल्म्स, वाहनांच्या फॅन्सी नंबर प्लेट, यांसह आमदार असल्याचा लोगो अनेक वाहनांवर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता अशा वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.
तांडा वस्ती निधी वाटपात भाजपमधील आमदारांना विश्वासात घेतलं जात नाही, कामाना मंजुरी दिली जाते, अशी तक्रार आमदार तुषार राठोड केली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांनी ही तक्रार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली असून आपल्याच पक्षाच्या पालकमंत्री अतुल सावे यांच्याविरोधात केली आहे.
सध्या राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचक संकेतानंतर उद्धव ठाकरे यांनीही केलेल्या भाष्यानंतर आता या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी देखील एक सूचक ट्वीट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी फक्त ठाकरे कुटुंबच नाही तर सर्वच कुटुंबांनी एकत्र यावं असं म्हटलं आहे. त्यामुळे आता त्यांनी अप्रत्यक्ष अजित पवारांना एकत्र येण्याचं आवाहन केल्याचं बोललं जात आहे.
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून ससून समितीचा दुसरा अहवालही आता समोर आला आहे. या प्रकरणातील दुसऱ्या अहवालात डॉ. घैसास हे दोषी असल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले आहे. घैसास यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील विलेपार्ले भागात असलेलं एक जैन मंदिर मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आलं होतं. यामुळे राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर आता या प्रकरणात आयुक्त भूषण गगराणी यांनी मोठी कारवाई केली आहे. गगराणी यांनी मंदिरावर कारवाई करणाऱ्या नवनाथ घाडगे या अधिकाऱ्याचे निलंबनाचे आदेश दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचे मार्किंग रात्रीच्या वेळी केलं जातयं असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी सरकारविरोधात हल्लाबोल करताना, जनतेचा विरोध डावलून हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असाही इशारा दिला आहे.
बघा जर दोघेही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येत असतील तर यात वाईट वाटायचे कारण नाही. फक्त मला वाटतं की माध्यमं त्यावर जास्त विचार करत आहेत. त्यामुळे वाट बघा. ते एकत्र आले तर उत्तम आहे. आम्ही स्वागत करू, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देण्यासंदर्भात भाष्य केले. याचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. शिंदेसेनेचे मंत्री, नेते यावर टीका करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र यावर चांगलेच चिडल्याचे दिसून आले. कामाचं बोला, तुम्हाला दुसरं काही दिसत नाही का? राजकारण रोजचं आहे, अशा शब्दात त्यांनी यावर भाष्य करणे टाळले.
निवडणुकीत ईव्हीएम पासून दुर राहण्यासाठी आपल्या खात्यावर धनंजय मुंडे यांच्या माणसाकडून 10 लाख रुपये टाकल्याचा दावा करणाऱ्या रणजीत कासले याने ही रक्कम उसने म्हणून घेतली होती. आणि यातील दोन लाख रुपये अद्याप त्याने परत केले नसल्याची तक्रार अंबाजोगाईतील ठेकेदार सुदर्शन काळे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाचे गेल्या पाच- सहा दशकांपासून कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही आजही आमच्या कुटुंबासाठी प्रिय आहेत, बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबीक इतिहासातला हा सोनेरी दिवस आहे. दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यावरून परळीत नायब तहसीलदारांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. परळी विधानसभा निवडणुकीत आपल्याला ईव्हीएम पासून दुर राहण्यासाठी पैसे दिल्याचा दावा त्याने केला होता. निवडणुका अशाच जिंकल्या जातात, असा आरोप करुन त्याने यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र, निवडणुक काळात रजणीत कासले सायबर पोलिस ठाण्यातच कार्यरत होता, असे सांगण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी नवी भूमिका घेतलेली नाही. यापूर्वीदेखील त्यांनी अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की एका हाताने टाळी वाजत नाही. त्यावेळच्या प्रस्तावाचं जे झालं होतं तोच अनुभव आताही त्यांना येईल, असं मला वाटतं. पक्ष चालवताना, संघटन चालवताना जो संयम लागतो, निर्णय घेण्यासाठी धाडस असावं लागतं ते राज ठाकरे यांच्याकडे आहे. पण राज ठाकरेंसोबत युतीत गेल्याने काय होईल त्याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे, असा टोला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला.
छगन भुजबळ म्हणाले की, दोघांची काय मतं आहेत? याची मला कल्पना नाही. अनेकांची मात्र इच्छा आहे की, दोघांनी एकत्र यावे. 2014 मध्ये एकत्र येण्याची संधी त्यांना होती. संधी चालून आली होती. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. मागील काही दिवसांत तुम्ही आम्ही कल्पना केली नाही, असे घडले आहे. मात्र, लगेच असे काही होईल असे वाटत नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत. दोघे एकत्र आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल.
विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मंदिरावली कारवाईनंतर निघालेल्या मोर्चानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या हकालपट्टीचा आदेश काढला. नवनाथ घाडगे यांच्या आदेशाने पालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दिगंबर जैन मंदिरावर कारवाई केली होती.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला पैशाअभावी उपचारास नकार दिल्याने तिचा मृत्यू झाला हेाता. या प्रकारणी मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे शहरातील अलंकार पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
शिवसेना नेते तथा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. मंत्री गोगावले हे समोर असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापूरमधील दोन नेत्यांमध्ये ढकलाढकली झाली. शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला, त्यामुळे मंत्री गोगावले यांच्यासह उपस्थित सारे आवक झाले. या प्रकारामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
थोपटे परिवार हे काँग्रेसचे स्वाभिमानी नेतृत्व आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांना पदाबाबत मागील काळात सामावून घेता आलं नाही, हे सत्य आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांना हाताशी धरून निवडणूक लागू दिली नाही. नाही तर थोपटे हे अध्यक्ष झाले असते. फडणवीसांनी थोपटेंवर अन्याय केलेला आहे. त्यामुळे संग्राम थोपटेंचा निर्णय हा दुःखद आहे. भाजपत गेल्यानंतर त्यांची फसगत होणार आहे, त्यामुळे थोपटे यांनी आत्मघातकी निर्णय घेऊ नये, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माजी आमदार संग्राम थोपटे यांना दिला.
परवा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेटीवर आम्ही शिंदेसाहेबांना विचारू, असे म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा पान्हा-पाझर फुटला असेल, तर ते शेवटी भाऊ-भाऊ आहेत, ते कधीही एकत्र येऊ शकतात, असे मंत्री गोगावले यांनी म्हटले.
शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून आपचे नेते खासदार राघव चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली. 'हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. एकत्र यायचं की नाही हे दोघांनी ठरवावं', असे त्यांनी म्हटलं आहे. शिर्डी इथं साईसमाधीचं दर्शन घेतलं.
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. क्रीडा मार्गदर्शकाचा जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या धनुर्विद्या प्रशिक्षक शुभांगी रुपडे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या वेटलिफ्टिंग खेळाडू कोमल वाकडे, कबड्डी खेळाडू शंकर गदाई यांचा सन्मान करण्यात आला. कबड्डी खेळाडू अस्लम इनामदार याच्या भावाने सन्मान स्वीकारला.
काँग्रेस आणि एमआयएमच्या लोकांनी वक्फ बोर्डाच्या हजारो एकर जमिनीवर कब्जा केला असल्याचा आरोप केंद्रीय कोळसा आणि खणीकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला. शिर्डीत साई दर्शनानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रेड्डी यांनी वक्फ कायद्याच्या मुद्यावरून काँग्रेस आणि एमआयएम पक्षावर जोरदार टीका केली आहे.
शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सातारा इथल्या दरे या मूळ गावी आहेत. शिवसेना मंत्री संजय राठोड हे त्यांच्या भेटीसाठी पोचले आहे. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, या मागणीसाठी मावळ तालुक्यात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये बजरंग दलाचे आणि विश्व हिंदू परिषदेचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी विचारलेल्या या प्रश्नाला राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे म्हणाले, कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेच आहे. मी ते पाहतो आहे असं राज ठाकरे म्हणाले.
बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात पिंपळनेर येथे आज (दि.१९) श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहाचा समारोप झाला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस एकत्र आले होते. या कार्यक्रमात बोलताना, गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव मोठे करण्याची माझी ऐपत नाही. परंतु हे नाव लहान होऊ देणार नाही. जीवनात कोणाला दुखवणार नाही. इतकेच मागणे मी भगवान बाबांकडे करते असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
संजय राऊत यांनी राज्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर सरकारवर टीका केली होती. सरकारला अनास्था असल्याचे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनल्याचे राऊत म्हणाले. राऊत यांच्या या टीकेवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी सवाल केला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "कोण संजय राऊत?" असं म्हणत उत्तर देणं टाळलं. त्यांच्या या उपरोधिक प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्यामुळे आपल्याला ती भाषा आलीच पाहिजे. मराठीची सक्ती आपण करतच आहोत, या राज्यात राहिल त्याला मराठी आलीच पाहिजे. मात्र, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे त्यामुळे हिंदी भाषा आली पाहिजे या मताचा मी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलं आहे. हिंदी भाषा ही वेगळी भाषा नाही राज ठाकरे यांचे जे मत असेल ते असेल, ज्या देशात आपण राहतो त्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे त्यामुळे प्रत्येकाला ती आली पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.
नाशिकमध्ये झालेली दंगल जाणीवपूर्वक घडवण्यात आल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवाय नाशिक दंगलीतील आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. तसंच नाशिकमध्ये कोर्टाच्या निर्णायानंतर अतिक्रमण काढण्यात येत होतं. तेथील लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता. पण काही लोकांनी जाणीवपूर्वक विरोध केला आणि दंगल घडवून आणल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी चार समित्यांकडून सुरु आहे. त्यातील ससून रुग्णालयाचा अहवाल नुकताच पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. या अहवालात दीनानाथ रुग्णालयाला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ससूनचा अहवाल आपल्याला अमान्य असल्याचं म्हणत अहवाल तो जाळून टाका, असं त्यांनी म्हटलं आहे.
20 एप्रिला राज्यामध्ये भाजपच्या 1196 मंडल अध्यक्षांची निरीक्षकांच्या देखरेखीत निवडणूक होणार आहे. मंडल अध्यक्षांच्या निवडणुका पार पडल्यानंतर 22 एप्रिल पासून संघटन पर्वातील पुढच्या टप्प्यात नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी जिल्हानिहाय निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. पुण्याच्या निरीक्षकपदी धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींच्या निर्णय बदलण्याचा अधिकार न्यायालयाला नसल्याचे मत वक्फ तरतूदीवरील स्थगितीवर उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी व्यक्त केले होते. त्यावर न्यायालयाच्या निर्णायवर धनखड यांनी केलेले वक्तव्य घटनाबाह्य असल्याचे मत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले.
जितेंद्र आव्हाड यांनी पहिलीपासून हिंदी विषयाच्या सक्तीला विरोध केला आहे. त्यांनी हिंदीची जबरदस्ती कशासाठी? असा सवाल करत अधिकृतपणे हिंदीला राष्ट्र भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. संविधानातील कलम ३४३ आणि ३५१ नुसार हिंदी भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्यात आला, राष्ट्र भाषेचा नाही! पण, तेव्हापासूनच १४ सप्टेंबर हा दिवस 'हिंदी भाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. संविधान निर्मात्यांनी त्यावेळेस असेही नमूद केले होते की, हिंदी भाषेचा प्रचार - प्रसार सरकारने करावाच, शिवाय, हिंदीचा शब्दकोषही विस्तारण्यासाठी कार्य करावे. परंतु, हिंदी भाषेच्या बाबतीत सरकारने संविधानकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे धोरण राबविले नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.