Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Updates : सुशांत सिंह राजपूतचा दुर्दैवी मृत्यू पण सत्य बाहेर आलं - रोहित पवार

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

सुशांत सिंह राजपूतच्या दुर्दैवी मृत्यू पण सत्य बाहेर आलं - रोहित पवार

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला आहे. त्याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूवर निवडणुकीच्या काळात राजकीय भाकरी भाजणाऱ्यांनी डोळे उघडून सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट बघावा. संबंधित प्रकरणात आम्ही सातत्याने भूमिका मांडण्याचं काम केलं. दुर्दैवाने निवडणुकीला समोर ठेवून त्याकाळात या आत्महत्येचं केवळ आणि केवळ राजकारण केलं गेलं. ते कुणी आणि कशासाठी केलं हे जनतेला चांगलंच माहिती आहे. CBI ने कोर्टात दाखल केलेल्या closure रिपोर्टमधून अखेर सर्व सत्य बाहेर आलं, दिशा सालियानच्या बाबतीतही हेच होईल, असा विश्वास आहे!

Chitra Wagh : न्यायालयाने निर्णयाचा पूर्नविचार करावा - चित्रा वाघ

अलाहाबाद उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की मुलीला एखाद्या निर्जन स्थळी नेणं, तिच्या स्तनांना हात लावणं, तिच्या पायजम्याच्या नाड्या सोडणं, तिला जबरदस्ती स्वतःकडे ओढणे – याला बलात्काराचा प्रयत्न मानले जाणार नाही…हा निर्णय ऐकून प्रचंड दुःख झाले. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही गुन्ह्याच्या प्रयत्नाला संपूर्ण गुन्ह्याच्या श्रेणीत पाहिले जाते. फक्त एवढी अट आहे की हेतू स्पष्ट असावा आणि गुन्हा करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचललेले असावे…म्हणूनच जर कोणीही एखाद्या मुलीला किंवा महिलेला जबरदस्तीने खेचून नेले, तिच्या पायजम्याच्या नाड्या सोडल्या, तर त्याच्या वागण्यामधून त्याचा हेतू स्पष्ट होतो. माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाला विनंती आहे कि त्यांनी या निर्णयावर नक्की पुनर्विचार करावा, असे चित्र वाघ यांनी ट्विट करत म्हटले आहे.

माणिकारव कोकाटे यांनी मोठी घोषणा

महाराष्ट्र राज्याच्या कृषी खात्याच्या वतीने या सगळ्या गटांना आणि गावांना मी एक ड्रोन फ्री दिला जाईल असा शब्द देतो, पण कुणीही रसायनिक फवारणी पिकावर करू नका. असं राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमात जाहीर केलं आहे.

Paani Foundation : पाणी फाउंडेशनचं काम पुन्हा राज्यभरात सुरू होणार - आमिर खान

आता पाणी फाऊंडेशनचं तुफान महाराष्ट्रात पुन्हा एकदा येणार आहे. याबाबतची माहिती अभिनेते आमिर खान यांनी दिली आहे. आम्ही आता पाणी फाउंडेशनचे काम पुढच्या वर्षीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करणार आहोत अशी घोषणा आमिर खान यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या उपक्रमाचा शुभारंभ पुण्यात करण्यात आला. यावेळी आमिर खान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आणि आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले म्हणून आम्ही यशस्वी झालो असंही ते यावेळी म्हणाले.

Nagpur : नागपुरात पोलिस बंदोबस्त कायम

मागील सहा दिवसांपासून नागपूरमध्ये लागू असलेली संचारबंदी अखेर हटवण्यात आली आहे. मागील सोमवारी शहरात झालेल्या हिंसाचारानंतर 11 पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिंसाग्रस्त भागात रुटमार्च काढला. शिवाय शहरात पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

ST Bus : बस चालवत मोबाईलवर मॅच बघणाऱ्या चालकावर एसटीची मोठी कारवाई

बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खाजगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केलं आहे, तर संबंधित खाजगी कंपनीला पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. मिळाल्या माहितीनुसार २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दादर ते स्वारगेटकडे निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक लोणावळा येथे बस आली असता मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहत बस चालवत होता. याबाबतचा व्हिडिओ बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्र्यांना पाठवला होता. याची तात्काळ दखल घेत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले.

Satish Bhosale : खोक्यावरील कारवाई विरोधात आदिवासी समाज आक्रमक

सतीश भोसलेच्या कुटुंबियांच्या समर्थनार्थ तुळजापुरात आदिवासी समाज आक्रमक झाला असून सतीश भोसलेच्या घरावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला आहे. यावेळी आंदोलकांनी सतीश भोसले खोक्या नाही तर आमचा विठ्ठल आहे. अनेक तरुणांनी आपल्या हातावर सतीश भोसले आमचा विठ्ठल लिहिलेलं टॅटू काढले आहेत. पण सध्या त्याची प्रतिमा चुकीची दाखवली जात असल्याचा आरोप केला. तर यावेळी रास्ता रोको केलेल्या आदिवासी समाजातील आंदोलकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील केली.

Buldhana crime update : बुलढाणा इथून मोठी बातमी; अवैध दारू विक्रेत्यांनी घेतला पोलिस कर्मचाऱ्याचा बळी

अवैध दारू वाहतूक करणाऱ्याचा पाठलाग करताना पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पोलिस शिपाई भागवत गिरी व राम आंधळे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका दुचाकीवरून अवैध दारू घेऊन जाताना दोघे आढळले. यांचा पाठलाग हे दोघे दुचाकीवरून करत होते. त्यावेळी पोलिसांच्या दुचाकीला दारू वाहतूक करणाऱ्या लाथ मारली. पोलिस कर्मचारी भागवत गिरी यांची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात जाऊन पडली. यात गिरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे दुसरे सहकारी आंधळे गंभीर जखमी झाले.

Aditi Tatkare News : लाडक्या बहिणींना 2100चा निर्णय योग्यवेळी होणार; मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही वचन दिलंय आणि दिलेल्या वचनापासून आम्ही फारकत घेणार नाही, असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले शहरात राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी कळसूआई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत हे मोठं विधान केले आहे.

Jayakumar Rawal News : शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करा; मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश

शेतकऱ्यांची दिशाभूल करून कमी भावाने कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल व्यापाऱ्यांनी करू नये, असे देखील मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले आहे.

Dilip walse Patil News : सध्याची तरुणाई नैराश्यतेतून गुन्हेगारीकडे वळयेत; माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

खेड्यापाड्यासह शहरात पिस्तुल, कोयत्याने हल्ले होत असताना ही प्रवृत्ती कशी वाढतेय, असा प्रश्न वळसेपाटलांनी उपस्थित केला. तरुणाईच्या हाताला काम नाही, नोकरी नाही, म्हणून लग्न होत नाही. यातुन तरुणाई नैराश्यतात गेलेत आणि हिच तरुणाई गुन्हेगारीकडे वळत आहे. यात आम्ही राजकीय लोकं त्यात भर घालत असल्याची कबुलीच वळसेपाटलांनी दिली.

Nitesh Rane News : मल्हार सर्टिफिकेशनचे नाव तत्काळ बदला; मंत्री राणे यांच्या निर्णयाला जेजुरी ग्रामस्थांचा विरोध

मल्हार सर्टिफिकेटला जेजुरीमधील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. नीतेश राणे यांना हा मोठा झटका मानला जात आहे. मल्हार सर्टिफिकेशनचे नाव तत्काळ बदलावे, अशी मागणी जेजुरी ग्रामस्थांनी केली आहे. नीतेश राणे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांनी भूमिका बदलावी, अन्यथा त्यांना गाव बंदी करू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Babasaheb Deshmukh Vs Raju Khare : शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख ब्राह्मण समाजाचे नेते; आमदार राजू खरे यांची टीका

राज्यात सत्ताआधारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठं बहुमत आहे. तुलनेने विरोधी महाविकास आघाडीच्या आमदारांचे संख्याबळ कमी आहे. तरी विरोधी आमदारांमध्ये ऐकी नसल्याचं समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी संदर्भात मोठं राजकीय वक्तव्य केले आहे. सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख हे ब्राह्मण समाजाचे नेते आहेत, अशी टिका केली आहे.

Nilesh lanke News : अहिल्यानगर महापालिकेतील बेफिकीरीकडे खासदर लंके यांनी वेधले लक्ष

अहिल्यानगर महापालिकेच्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र कार्यालयातील नागरिकांना होणारा प्रचंड त्रास होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि असहाय्य झाला असून या कार्यालयातील दिरंगाई, बेफिकीरपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उध्दट वर्तनात त्वरीत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशा मागणीचे पत्र खासदार नीलेश लंके यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे.

CM Devendra Fadnavis News : 'सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यूपीप्रमाणे कायदा करू'

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी यूपीच्या धर्तीवर कायदा केला जाणार असून त्र्यंबकेश्वरचाही विकास केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादीचा मेळावा अन् उपस्थितांची संख्या कमी, भुजबळ आयोजकांवर संतापले

जळगावातल्या राष्ट्रवादीचा मेळावा झाला. यावेळी उपस्थितांची संख्या कमी असल्याने माजी मंत्री छगन भुजबळ चांगलेच नाराज झाले. यावेळी त्यांनी, आयोजकांवर संताप व्यक्त करताना, 'थोडा पैसा खर्च करून गाड्या आणल्या असत्या तर गर्दी झाली असती, असे म्हणत आपली नाराजी वक्त केली आहे.

Nilesh Ojha Update : क्लोजर रिपोर्टला काहीच व्हॅल्यू नाही 

दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला काहीच व्हॅल्यू नसल्याचे म्हटले आहे. क्लोजर रिपोर्ट म्हणजे रिया चक्रवर्तीला क्लिन चीट नाही, असेही ते म्हणाले आहेत. कोर्टाकडून क्लोजर रिपोर्ट फेटाळला जाऊ शकतो. कोर्ट पुन्हा चौकशीचे आदेश देऊ शकते, असेही ते म्हणाले आहेत.

Anjali Damania Latest : भाजपचे हे दबावतंत्र?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्याच केली होती, असा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने सादर केला आहे. त्यावरून राजकारण तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, विश्वास कोणावर ठेवायचा? नारायण राणे म्हणतात, नोकराने सुशांतसिंहच्या हत्येचा व्हिडीओ केला आहे. वेळ आल्यावर पुरावे सादर करेन. मग अजून सादर का नाही केले पुरावे, असा प्रश्न पडतो. ५ वर्ष झाली या प्रकरणाला , केव्हा येणार यांची ‘वेळ’? का हे भाजप चे केवळ दबावतंत्र आहे?, असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

Prashant Koratkar News : पासपोर्ट जमा 

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या धमकीप्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्या पत्नीकडून पासपोर्ट जमा करण्यात आला. कोरटकरला अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस काढली आहे.

Raj Thackeray News : मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे

मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत दोन उपाध्यक्ष असतील. त्याचप्रमाणे इतर काही नवीन नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली.

MNS Live: मनसेच्या आज मेळावा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज मुंबईत आढावा बैठक आहे. मनसेच प्रमुख राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

CM Devendra Fadnavis News : त्र्यंबकेश्वराचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता.23) नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी त्र्यंबकेश्वरलाही भेट दिली. यावेळी त्यांनी भगवे सोवळं परिधान करत त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. येथील आद्यपीठ त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

Nanded Congress News : नांदेडमध्ये काँग्रेससह अशोक चव्हाणांना मोठा धक्का

नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत दुपारी नांदेडमध्ये हा पक्षप्रवेश होणार असून अशोक चव्हाणांना हा धक्का मानला जातोय.

Nagpur Violence News : नागपुरमधील संचारबंदीत शिथिलता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरून नागपूरमध्ये वाद झाला. या वादाचे हिंसाचारात रूपांतर झाल्याने शहरात काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती आता शिथील करण्यात आली आहे. यामुळे येथे जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. पाचपावली, शांतीनगर, लकडगंजमधील संचारबंदी पूर्णता: उठवण्यात आली आहे. तर कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत संध्याकाळी सात ते रात्री दहापर्यंत शिथिलता देण्यात आलीय. तर यशोधरानगरमधील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.

Aurangzeb Tomb News : औरंग्याची कबरीला टाळे लावण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये औरंगजेबचे कबर असून नागपूरमध्ये या कबरीवरून दंगल उसळी. यावरून आता औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. तर गनिमी काव्याने टाळे ठोकणारच असा इशारा संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाने दिला आहे.

Shivsena News : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आज मुंबईत बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक आज (ता. 23) मुंबईत होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर मुंबई उपनगर संपर्कप्रमुख मंत्री उदय सामंत ही बैठक घेणार आहेत. यावेळी शिवसेना UBT पक्षातील काही उपशाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याने हा ठाकरे गटाला धक्का मानला जातोय.

Rupali Chakankar News : सुप्रिया सुळेंच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या वक्तव्यावर रूपाली चाकणकरांचा पटवार

राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम (पॅटर्न) लागू करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात घोषणा केली. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार विरोध दर्शवताना टीका केली होती. तर ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाची अंमलबजावणी म्हणजे राज्य शिक्षण मंडळ संपूर्णतः बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पटलवार करत टीका केली आहे.

CM Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्याचा नियोजनाची आढावा घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता.23) नाशिक दौऱ्यावर असून ते मुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांच नाशिकमध्ये आहेत. यावेळी ते कुंभमेळा नियोजनाची आढावा बैठक घेणार असून त्र्यंबकेश्वरलाही भेट देणार आहेत.

Supreme Court News : न्या.यशवंत वर्मांची चौकशी होणार? सर्वोच्च न्यायालयाकडूनच जळालेल्या नोटांचा व्हिडिओ शेअर

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्याचा आरोप झाला होता. तर लागलेल्या आगीत मोठी रक्कम जळाली होती. त्याचा व्हिडिओ सर्वोच्च न्यायालयाकडूनच शेअर करण्यात आला असून न्या.यशवंत वर्मांची चौकशी आता केली जाणार आहे. त्यामुळे सध्या न्या. वर्मा यांना कोणतेही न्यायालयीने काम देऊ नये, असे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आदेश दिले आहेत.

Shivsena Split News : 'शिवसेना फुटीवेळी सगळे शांत का?' अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या रुपानं वादळ आलं आणि उभ्या शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यावेळी जर मोठे जन आंदोलन उभे झाले असते. तर दबाव निर्माण झाला असता. पण त्यावेळी आंदोलन आणि राडे झाले नाहीत. यावरून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. यावर आता अनिल परब यांनी खुलासा करताना स्पष्टीकरण दिलंय. एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंच्या आदेशानं शांत बसलो होतो अन्यथा भुजबळ, राणेंवेळी झाले तसे राडे झाले असते, असे त्यांनी म्हटलं आहे.

Nagpur Violence News : नागपूर हिंसाचार : महिला पोलिसाचा विनयभंग? CM देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा

नागपूर हिंसाचार प्रकरणामुळे राज्यात मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. यातच दंगेखोरांनी महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप स्वतः पोलिसांनीच केला होता. पण आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. त्यांनी, महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही. तर तिच्यावर दगडफेक झाल्याचे म्हटलं आहे. यामुळे आता नवा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT