Government GR for Kerosene Sarkarnama
महाराष्ट्र

Kerosene supply Maharashtra : गॅस संपला, चिंता नाही; राज्यात 4 शहरे वगळून सर्वत्र मिळणार रॉकेल, सरकारने काढला GR

Government GR for Kerosene: सद्यस्थितीमध्ये रॉकेल वितरण व्यवस्था कार्यान्वित नसल्याने तसेच नागरिकांचा असलेला प्रतिसाद पाहता सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक मागणी व इतर बाबींचा विचार करून तालुक्यातील वितरणाचे स्वतंत्र आदेश काढावेत.

Rajanand More

Fuel shortage relief : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने आता केंद्र सरकारने रॉकेलचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पर्यायी इंधन म्हणून केंद्र सरकारने महाराष्ट्राला मार्च-एप्रिल महिन्यासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेल उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार राज्यातील चार प्रमुख शहरे वगळून सर्वत्र रॉकेलचे वाटप केले जाणार आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार, पुणे, नागपूर, मुंबई आणि ठाणे शहर वगळून राज्यात अन्य सर्व भागांत रॉकेलचे वितरण केले जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाला किंवा शिधापत्रिकेवर तीन लिटर रॉकेल दिले जाणार आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना प्राधान्य असेल.

रॉकेलच्या उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक त्याचप्रमाणे शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबालाही रॉकेल उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिधापत्रिका नसल्यास ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. स्थलांतरित मदूरांना रॉकेल मिळणार आहे. त्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारचे ओळखपत्र आवश्यक असेल.

रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारकांमार्फत रॉकेलचे वितरण होणार आहे. या वितरकांनी शिधापत्रिकाधारक किंवा शिधापत्रिका नसलेल्यांना प्रति कुटुंब ३ लिटरप्रमाणे रॉकेल वाटप करावे, असे आदेश सरकारने दिले आहे. एखाद्या गावामध्ये रॉकेल विक्रेता उपलब्ध न झाल्यास संबंधित गावातील नागरिकांना जवळच्या गावातून रॉकेल उपलब्ध करून देण्यात यावे, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सद्यस्थितीमध्ये रॉकेल वितरण व्यवस्था कार्यान्वित नसल्याने तसेच नागरिकांचा असलेला प्रतिसाद पाहता सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक मागणी व इतर बाबींचा विचार करून तालुक्यातील वितरणाचे स्वतंत्र आदेश काढावेत. तालुकास्तरावर वितरण व्यवस्था, रास्त भाव दुकानदारांचा प्रतिसाद, रॉकेलची आवश्यकता तसेच मागणी या बाबींचा विचार करून गावनिहाय रॉकेल वितरणाचे स्वतंत्र आदेश काढावेत, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

रॉकेलचा दर किती?

रॉकेल वाहतूक दरात तसेच किरकोळ विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये सुधारण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन असून त्यानुषंगाने रॉकेल दराबाबत स्वतंत्ररित्या आदेश काढण्यात येईल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT