Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : इराणने मिसाईल डागताच भारताचं टेन्शन वाढलं; कतारच्या गॅस प्रकल्पामुळे परिणाम होण्याची शक्यता?

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 19 March 2026: आज गुढीपाडव्यानिमित्ताने शोभायात्रा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळावा घेणार आहेत. यासह राज्यभरासह देशविदेशातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर मिळवा.

Mangesh Mahale

गुढीपाडव्या निमित्ताने एपीएमसीत कोकणातील १० हजार पेट्या दाखल

गुढीपाडव्या निमित्ताने वाशीतील एपीएमसी मार्केट मध्ये कोकणातील १० हजार हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याचे पुजन करण्यात आले. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी , रायगड जिल्ह्यातून हापूस आंबा आला आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे कोकणात हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या उत्पादनापैकी फक्त २५ टक्के आंबा यावर्षी पिकला गेला आहे. मागील वर्षी गुढीपाडव्याला २५ हजार पेटी आवक झाली होती. यावर्षी ती फक्त १० हजार पेट्यांवर आली आहे. त्यामुळे हापूस आंब्याची किंमत गगनाला भिडली आहे.

“दादांच्या आशीर्वादाखाली…” म्हणत पार्थ पवारांची भावनिक पोस्ट

आज गुढीपाडवा हिंदू नववर्षाची सुरुवात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर भावपूर्ण पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मागील काही वर्षांतील अजित पवारयांच्यासोबत साजऱ्या केलेल्या गुढीपाडव्याचे फोटो पोस्ट करत , दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

इराणने मिसाईल डागताच भारताचं टेन्शन वाढलं; कतारच्या गॅस प्रकल्पामुळे परिणाम होण्याची शक्यता?

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता संपूर्ण जगावर होत असून याचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. एकीकडे आखाती देशांत सुरू असलेल्या या संघर्षामुळे भारताच्या कच्चे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होताना दिसत आहे. यादरम्यान इस्रायलने इराणच्या 'साउथ पार्स' गॅस क्षेत्रावर हल्ला केल्यानंतर हा संघर्ष आणखीन चिघळला आहे. इराणने केवळ अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य न करता आता आपला मोर्चा तेल आणि गॅस पायाभूत सुविधांकडे वळत जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्याला उत्तर देताना इराणने कतारच्या 'रास लाफान इंडस्ट्रियल सिटी'मधील एका प्रमुख गॅस प्रकल्पावर क्षेपणास्त्र डागले आहे. या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याचा धोका वाढला असून याचा थेट भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण भारत आपल्या एकूण गॅस गरजे पैकी सुमारे 47 टक्के गॅस कतारकडून आयात करतो.

तळेगावात धक्कादायक प्रकार! लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्याला पोलिसांकडून मारहाण

तळेगाव शहरात एका लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तळेगाव पोलीसांच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुषार दळवी हा लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी दुपारी आपल्या मित्रांसोबत दुचाकीवर ट्रिपल सीट जात असताना पोलिसांनी त्याला अडवले. त्यावेळी तुषारने आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य करत, “जेवढा दंड असेल तो गाडीवर टाका,” असे पोलिसांना सांगितल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी शिवीगाळ केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.

युद्धाचा फटका शिर्डीला जाणाऱ्या पायी पालखीला पदयात्रे

आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये स्वयंपाकासाठी लागणारा गॅस मिळत नसल्याचे उघड झाले आहे. या युद्धाची झळ आता शिर्डीला जाणाऱ्या पायी पालखीला पदयात्रेला बसली असून चूल पेटवून जेवण बनवण्याची वेळ आली आहे.

सांगलीच्या पलूसमध्ये शिक्षण संस्था संचालकाचा खून

सांगलीच्या पलूसमधील शिक्षण संस्था चालकाचा खून केल्याची घटना घडली आहे. संजय प्रभाकर परांजपे यांचा धारदार हत्यारांनी हल्ला करून निर्घृणपणे खून करण्यात आला. संजय परांजपे हे विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच परांजपे यांचा नोंदणीकृत खासगी सावकारीचा व्यवसाय आहे. संजय परांजपे हे काल रात्री पलूस मधीलच एका मंदिरात गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करून पलायन केले.

छत्रपती संभाजीनगर शहरातही पावसाची हजेरी

छत्रपती संभाजी नगरला काल रात्री उशिरा पावसाने झोडपले. शहरासह ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये सिल्लोड, कन्नड तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट होऊन गहू, हरभरा, ज्वारी यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले.

अकोल्यात महारॅली, हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग

अकोला शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरातून या महारॅलीला सुरुवात करण्यात आली. पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या वातावरणात रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत आहे.

ठाण्यातील कोपिनेश्वर पालखी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी, शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 

Rain Alert :अवकाळीचे सावट! राज्यातील ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट व वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे.

दरवर्षीप्रमाणे मनसेचा आज शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळावा होणार असून राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या या संदेशात म्हटले आहे की,' नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा- आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करणारे ठरावे. नवसंकल्पना साकार व्हाव्यात यासाठी ऊर्जा देणारे ठरावे त्यासाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच प्रार्थना. यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा... मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करुया !'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT