महायुती सरकार सत्तेवर येऊन दीड वर्षे लोटले तरी महामंडळ वाटपाचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. राज्यात १७० महामंडळ असून त्यावर साडेसातशे सदस्यांची नियुक्ती करायची आहे. मात्र, महायुतीमधील तीनही पक्षांच्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने महामंडळाचे वाटप रखडल्याची माहिती मिळत आहे.
दिव्यांग आणि नेत्रहिन बांधवांना फेब्रुवारी महिन्यापासून मानधन मिळत नसल्याने माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन मानधनाचा प्रश्न सोडवावा अन्यथा येत्या १९ तारखेला आम्हाला मंत्रालयात आंदोलनासाठी यावे लागेल, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले. मात्र, तरी सरकार स्थापनेचा तिढा सुटत नव्हता. मात्र, आज तो तिढा सुटला आहे. जोसेफ विजय यांना काँग्रेसने दुसऱ्याच दिवशी पाठिंबा दिला होता. मात्र उर्वरीत आठ आमदारांचे समर्थन मिळविण्यासाठी त्यांना तीन ते चार दिवस लागले. अखेर व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगने टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे आता विजय यांच्याकडे १२० आमदारांचं संख्याबळ झालं आहे. त्यामुळे जोसेफ विजय लवकरच सत्ता स्थापन करतील.
नाशिक लैगिंक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आसरा देणारे एमआयएचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर चालविण्यात येणार आहे. निदा खान ज्या घरात लपली होती, ते घर अतिक्रमण करून बांधण्यात आले आहे. तीन दिवसांत खुलासा न केल्यास घराव बुलडोझर चालविण्याचा इशारा छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून देण्यात आला आहे. तसेच, त्यांच्या इतर घरांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
MIM नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर चालणार बुलडोझर
मतीन पटेलनं नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील संशयित निदा खानला आसरा दिला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात त्यांनाही सहआरोपी केलं आहे.
थलपती विजय यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यात थलपती विजय यांना यश आलंय. थलपती विजय यांना व्हीसीकेच्या 2 आमदारांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे 118 चा बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलंय. लवकरच विजय राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे.
जालन्यात अॅड. सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक आणि सुपारी फेकण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर सुपारी फेकली. मराठीच्या मुद्द्यावरून सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर शाई फेकली.या प्रकरणी आता मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षारक्षकानेच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, एका १० वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा नराधम आता गजाआड झाला आहे.
नाशिकचा भोंदू अशोक खरात याला शिर्डीच्या जमीन व्यवहाराच्या गुन्ह्यात, अटक केल्यानंतर आज पाच दिवसांची पोलिस कोठडी संपली होती. पोलिसांनी त्याला आज राहाता न्यायालयात हजर केले. सरकार पक्षाच्यावतीनं न्यायालयात, अशोक खरात तपासात सहकार्य करत नाही, अशा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. आता अशोक खरात याला समता नागरी पतसंस्थेतील वारसदार खात्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करून, न्यायालयात हजर केले जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्याचा, सोलापूर इथल्या काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी निषेध करत संग्रामबापू भंडारे यांचा निषेध केला आहे. संग्राम भंडारी हा गुन्हेगार आहे. भगव्या कपड्याआड ज्यापद्धतीने घुसखोर घुसले आहेत. ते विकास लवांडे यांनी हे अतिशय पुराव्यासहित सिद्ध केले आहेत. त्याचा प्रत्यय आज खऱ्या अर्थाने आला आहे. संग्रामबापू भंडारे हा वारकऱ्यांच्या आडून भाजपप्रणित गुन्हेगार आहे, असा घणाघात काकासाहेब कुलकर्णी यांनी केला.
राष्ट्रवादी APचे आमदार संग्राम जगताप यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खान हिला मदत करणारा नगरसेवक मतीन पटेल याच्या कृतीवरून, AIMIMवर टीका केली आहे. या लोकांना देशातूनच नाही, तर देशाच्या बाहेरून देखील काही लोक मदत करतात. यातूनच या लोकांची हिम्मत वाढते, यापूर्वी आम्ही केवळ "लव्ह जिहाद" ऐकत होतो आता "कॉर्पोरेट जिहाद" हा नवीन प्रकार समोर आला आहे. या जिहादला AIMIMचा एक नगरसेवक नाही, तर अनेक लोक मदत करतात, इम्तियाज जलील हा यांचा प्रमुख आहे, असेही आमदार जगताप यांनी म्हटलं.
खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले होते. कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच आज दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवेळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उन्हाळी हंगामातील भाजीपाला, मका, फळबागा आणि काढणीस आलेल्या पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दिलासादायक पावसासोबतच शेती नुकसानाची धास्तीही कायम आहे.
नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणात एमआयएमचा नगरसेवक असलेल्या मतीन पटेल याला सहआरोपी करण्यात आले आहे. यानंतर आता भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी एमआयएम हा राजकीय पक्ष नसून तो दहशतवादी संघटना असल्याचा आरोप केला आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात जमीन मोजणीच्या अर्जांचा पडलेला डोंगर उपसण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने कंबर कसली असून, आता चक्क खासगी संस्थेच्या माध्यमातून ४० नवे भूमापक मैदानात उतरवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोजणीची हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याच्या तक्रारींची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांना आता गरजेनुसार आणखीही खासगी भूमापक नेमण्याचे विशेष अधिकार बहाल करण्यात आले आहेत.
मीरा भाईंदरच्या मौजे भाईंदर इथल्या सुमारे 254.88 एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे. मूळची सरकारी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई केली, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. मीरा भाईंदरची जमीन मूळची राज्य शासनाची असताना, शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अभिलेखात बदल करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन सरकारकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही, वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? असा सवालही त्यांनी केला.
गुणरत्न सदावर्ते बीड जिल्ह्यात काही कामानिमित्त आले असता, त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात ते आंदोलन आता उभा करू शकत नाहीत, तर दुसरीकडे मस्साजोगसारखी एक ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत, तर त्यांना आमदार कोण करणार? त्या पक्षाचं नुकसानच होईल, तर दुसरीकडे एसटी भाडेवाढी संदर्भात परिवहन मंत्र्याचे चांगलेच कान टोचले. त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत हे मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत, त्यांनाच नेमकी कशासाठी भेट घेतात ही माहित आहे. तसंच लोकप्रिय नेत्याची मंत्रीपदी वर्णी लागावी ही जनभावना असते, दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे होते व संपूर्ण मुंडे कुटुंबीय, त्यामध्ये धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील हे सर्वजण तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन काम करतात. त्यामुळे ही जनभावना असणे सहाजिकच आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी 60 देशांवर लादलेले 10 टक्के ग्लोबल टॅरिफ न्यायालयाने अवैध ठरवत ते रद्द केले आहे. ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ 1974च्या व्यापार कायद्यानुसार नव्हते. संसदेच्या मंजुरीशिवाय एवढय़ा मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावण्याचा अधिकार ट्रम्प प्रशासनाला नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने 2 विरुद्ध एका मताने ट्रम्प यांचे टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय दिला.
आर्थिक डबघाईला आलेल्या आणि जगभरात मदतीसाठी हात पसरणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मोठा दिलासा दिला आहे. आयएमएफच्या कार्यकारी मंडळाने पाकिस्तानला 1.32 बिलियन अमेरिकन डॉलर्सचे (सुमारे 11 हजार कोटी रुपये) नवीन कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे पाकिस्तानच्या रिकाम्या होत चाललेल्या तिजोरीत थोडी भर पडणार असली, तरी आयएमएफने घातलेल्या कडक अटींमुळे सामान्य पाकिस्तानी जनतेची महागाईपासून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेची लाट असताना अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी राज्यातील 15 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला होता. आज, 9 मे रोजी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रावर वादळी पावसाचं संकट घोंगावत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामान तीव्र असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि संघटक सचिव विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि गुंडांनी हल्ला केला. या हल्ल्याचा शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी निषेध केला. गृह विभागाने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. विचारांची लढाई ही विचारांनी लढायला हवी. पण वारकरी संप्रदायात काही अविचारी माणसं घुसली आहेत. जी जाणीवपूर्वक समाजात विष पेरण्याचे काम करत आहे. आम्ही वारंवार या विषयावर बोललो आहे. विकास लवांडेंवरील हल्ला हा त्याचा सबळ पुरावा आहे. अशा लोकांमुळे पवित्र अशा वारकरी संप्रदायाची बदनामी होत आहे. हे वेळीच थांबले पाहिजे!, असंही रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर, शुभेंदू अधिकारी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवेळी, पश्चिम बंगाल राज्यातील राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांना भेटले. मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत नरेंद्र मोदी हातमिळवणी करत मंचावर बोलत बसले. नरेंद्र मोदी काहीतरी बोलताच एकनाथ शिंदे जोरजोरात हसले. मंचावर नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांच्यासमोर जास्त वेळ थांबले होते. एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्या या भेटीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
'महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार' या शीर्षकाखाली एक अभूतपूर्व काव्यसंग्रह साकार झाला आहे. विशेष म्हणजे, देशभरातील १५६ दिग्गज आणि नवोदित कवींच्या कवितांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व साहित्यिक डॉ. शरद गोरे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. या ग्रंथाचे प्रकाशन सोहळा 29 मे रोजी धाराशिवमध्ये 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते, या ग्रंथाचे थाटात प्रकाशन होणार आहे.
शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित आहेत. नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंचावर उपस्थित असणाऱ्या सगळ्या एनडीएच्या नेत्यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाही फेक करण्यात आल्याची घडना समोर आली आहे. संग्राम भंडारे आणि दहा ते पंधरा गोरक्षकांनी शाही फेक केल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. अंगावर शाही फेकत धक्काबुक्की करून पिस्तूल दाखवला असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे.
सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजीचे दर प्रति किलोमागे २ रुपयांनी वाढ झाली आहे. काल रात्रीपासून हे नवीन दर लागू करण्यात आला आहे. दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर कोणाताही परिणाम झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.
पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोडा यांच्या घरी ईडीने छापा मारला आहे. अरोडा यांच्या चंडीगढमधील सेक्टर-2 मध्ये असलेल्या घरावर छापा मारला.सकाळी साडेसात वाजता हा छापा मारल्याची माहिती आहे.
लातूर पोलिसांनी 714 किलो गांजासह 1 कोटी 18 लाखांचे अमली पदार्थ नष्ट केले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वात आज मोठी आणि निर्णायक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील विविध 45 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला अमली पदार्थांचा साठा आज कायदेशीररीत्या नष्ट करण्यात आला.
बनावट आदेशाने 68 कोटी रुपयांचा भूसंपादन मावेजा 310 कोटी रुपयांवर नेऊन 241 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात पावणे पाच महिन्यांनंतर पोलिसांच्या विशेष तपास समितीने अटक केलेल्या बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकला न्यायालयाने १५ मे पर्यंत आठ दिवस पोलिस कोठडी सुनावली.
व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईत पश्चिम नौदल कमांडर आहेत आणि ३१ मे रोजी पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत असेल. व्हाईस ॲडमिरल स्वामीनाथन १ जुलै १९८७ रोजी भारतीय नौदलात अधिकारी म्हणून दाखल झाले आणि ते दळणवळण व इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रातील तज्ञ आहेत. त्यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी; युनायटेड किंगडममधील श्रीव्हनहॅम येथील जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज; करंजा येथील कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर; आणि अमेरिकेतील न्यूपोर्ट, ऱ्होड आयलंड येथील युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.
पश्चिम बंगालमध्ये सुवेंधू अधिकारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तब्बल 21 राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.