Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये; खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे

Political Breaking Live Marathi Headlines Updates : अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी फरार, प्राॅपर्टी संदर्भात आणखी मोठी नावं अडकण्याची शक्यता, एकनाथ खडसे यांच्यावर जमीन लाटण्यासंदर्भात गुन्हा दाखल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरेश अरोराच्या डिझाईन बॉक्सचं काम स्थगित यासह राज्य आणि देशभरातली घडामोडी एकाच क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

Aditi tatkare : भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी धडा

महाराष्ट्र हा पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून ओळखला जातो. अशोक खरात प्रकरण हे निंदनीय आहे, त्यामध्ये कोणीही त्याची बाजू घेण्याचे किंवा समर्थन करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याने अशोक खरात प्रकरणाचे समर्थन केलेले नाही. किंबहुना हे प्रकरण महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय मंडळींसाठी एक धडा आहे. आपण पुरोगामी महाराष्ट्रात वावरत असताना कुठलाही सल्ला घेणे किंवा भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी धडा आहे, असे वक्तव्य राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.

Chhagan bhujbal : राज्य सरकारकडून हालचालींना वेग

महाराष्ट्र राज्य सरकारने अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात पीएनजी जोडण्या वेगवान होण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग देण्यात आला आहे. सिटी गॅस डिस्ट्रिब्युअशन पाईपलाइन टाकण्याकरीता विविध महानगरपालिका, नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि अन्य प्राधिकरणाकडे प्रलंबित असलेल्या परवानग्या मंजूर समजाव्यात असा उल्लेख राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Aditi Tatkare : राज्य सरकारकडून नवी तारीख जाहीर

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत वाढवत आहोत, अशी माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी यापूर्वी 31 मार्चपर्यंत होती. आता ही मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली आहे, असे आदिती तटकरेंनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुचनेने मुदतवाढ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर कृषी अधिकारी, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे

साक्री तालुक्यामध्ये झालेल्या गारपिटी व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, आणि कृषी विभागाच्या वतीने आता या नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर अधिकारी पोहोचून त्यांच्यातर्फे नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे, या अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने कांदा गहू मका हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता कृषी विभागाच्या वतीने या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून त्यांचे पंचनामे करण्यात येत आहेत

नांदेडमध्ये काँग्रेस भाकरी फिरवण्याच्या तयारीत

2024 मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखत आपली ताकद दाखवून दिली. परंतु हे यश विधानसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला टिकवता आले नाही. या सर्वांचा परिणाम आता काँग्रेस जिल्ह्यातील संघटनात्मक मोठ्या फेरबदलामध्ये होणार आहे. जिल्हाध्यक्षांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या व तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यासंदर्भात मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक पुन्हा होणार?

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा वाद निर्माण झाला असून, आता ही निवडणूक पुन्हा घेण्यात यावी, अशी याचिका पुणे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने काम केल्याचा आरोप करत विरोधकांनी ही याचिका दाखल केली आहे.

चंद्रकांत पाटलांच्या पिक्चर अभि बाकीवर... जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांचा खोचक टोला

चंद्रकांत पाटील हे माझे हितचिंतक आहेत, ते काही बोलले तरी त्यांच्याविषयी आपण काहीच बोलणार नाही. हा दुसरा पार्ट आहे, अश्या शब्दात आमदार जयंत पाटलांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला आहे. तर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी देखील चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील सर्वांचे हितचिंतक असून त्यांच्याविषयी आपण काही बोलणार नाही, असे म्हटलं आहे. चंद्रकांत पाटलांनी जिल्हा परिषद सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर पिक्चर अभी बाकी आहे, असा इशारा दिला होता, त्यावर जयंत पाटलांसह विश्वजीत कदम यांनी हा टोला लगावला आहे.

कामगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जिवितांना दाखवले मृत

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथे अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जिवंत असलेल्या ७ व्यक्तींनाच मृत दाखवून शासनाच्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी सरकारी कामगार अधिकारी यांनी सात जणांसह ग्रामसेवकांना नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

भंडाऱ्याच्या आमगावात वाघाचा महिलेवर हल्ला, १५ दिवसातील तिसऱ्या घटनेनं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

शेतावर काम करीत असताना एका महिलेवर वाघानं झडप घालून गंभीर जखमी केल्याची घटना भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील आमगाव इथं आज घडली. नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पा लगतच्या या गावात घडलेली ही या १५ दिवसातील तिसरी घटना आहे. पहिल्या घटनेत एका इसमाचा मृत्यू झाला आहे. तर, दोन घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

सोन्याच्या दरात साडेतीन तर चांदीच्या दरात 3 हजारांची एकाच दिवसात वाढ

लग्नसरायच्या हंगामात जळगावच्या सुवर्णगिरीत सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल साडेतीन हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरातही सुमारे तीन हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे ऐन खरेदीच्या काळात ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

Aviation Fuel : विमान कंपन्यांसाठी इंधन दरात 25% वाढ; देशांतर्गत उड्डाणांसाठी इंधनामध्ये 25 टक्के वाढ लागू

पश्चिम आशियातल्या तणावामुळे होर्मूझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जागतिक इंधन बाजारातील सद्यस्थिती पाहता हवाई वाहतुकीसाठी इंधन दर दुप्पट होण्याची शक्यता होती. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी नागरी विमानन मंत्रालयाशी सल्लामसलत करून, देशांतर्गत विमान कंपन्यांवर फक्त 25% वाढ (सुमारे 15 रुपये प्रति लिटर) टप्प्याटप्प्याने लागू केली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी हवाई इंधनाच्या किमतीत संपूर्ण वाढ लागू केली जाईल, जी आंतरराष्ट्रीय दरांशी सुसंगत असेल. हे उपाय देशांतर्गत विमान सेवांवर मोठा आर्थिक फटका न येण्यासाठी आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राबवण्यात आले आहेत.

Sanjay Raut : 'उद्या हे सांगतील, मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले 106 हुतात्मे सुद्धा जैन होते!'

महाराणी ताराराणी या जैन असल्याचा, जैन मुनींना केलेल्या दावावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात म्हटलं आहे की, "काय सुरू आहे महाराष्ट्रात? शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगतात की महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत, का? कशासाठी? उद्या हे सांगतील आमच्या मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले 106 हुतात्मे सुद्धा जैन होते! यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवतील!"

Ahilyaagar Crime : पाथर्डीत 55 वर्षीय व्यक्तीवर अमानुष मारहाण करत हात-पाय बांधून झाडाझुडपात फेकले...

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीतील गाडगे अमराई इथंल्या परिसरातील मोहरी रोडवर मोहन पिराजी सगळे यांना हात-पाय बांधून, गळ्याला दोरी लावून व तोंडात काचा कोंबून झाडाझुडपात फेकून देण्यात घटना घडली. स्थानिक नागरिक व नातेवाईकांच्या मदतीने त्यांची सुटका करून उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Satara Update : सातारा जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांचे निलंबन

सातारा जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मृतदेहाची अदलाबदलीचे प्रकरण भोवले आहे. एका महिन्यात दोन वेळा मृतदेहांची अदलाबदली झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून कर्तव्यात कसूर केल्याने, निलंबन केलं आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी सुद्धा केली जाणार आहे.

Nanded Politics : काम पडलं की अजितदादांचे जोडे उचलायचे अन्..; खासदार चव्हाणांवर आमदार चिखलीकर यांची टीका

'काम पडलं की, अजितदादांचे जोडे उचलायचे आणि अजितदादांच्या जाण्यानंतर आठ दिवसानंतरच घड्याळाची टिक टिक बंद पडणार, असे भान न ठेवता वक्तव्य करायचे हे कोणालाही आवडले नाही,' असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात चिखलीकर यांनी ही टीका केली. नांदेड शहरातील जुना मोंढा टॉवरवरील घड्याळ बंद असल्याबाबत पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना घड्याळ चालू आहे का जिल्ह्यात, असे खोचक वक्तव्य केले होते. त्यावरून चिखलीकर यांनी निशाणा साधला.

census 2027 : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात स्व-नोंदणी आणि 33 प्रश्नांची माहिती द्यावी लागणार

देशात जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे, जो 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या टप्प्यात नागरिकांना स्व-नोंदणी पोर्टलद्वारे माहिती देण्याची सुविधा उपलब्ध असेल, ही पहिल्यांदाची सुविधा आहे. पहिल्या टप्प्यात 33 प्रश्नांचा संच विचारला जाईल. या प्रक्रियेत प्रत्येक घराची माहिती गोळा केली जाईल, ज्यात घराचा क्रमांक, मजला, घराची स्थिती आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या यांचा समावेश असेल. याशिवाय कुटुंबप्रमुखाचं नाव, लिंग, जात, मालकी हक्क, घरातील विवाहित जोडप्यांची संख्या आणि वाहनांची माहितीही नोंदवली जाईल.

Narhari Zirwal : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्री नरहरी झिरवळ गैरहजर

राज्य मंत्रिमंडळाच्या आजची होत असलेल्या बैठकीला मंत्री नरहरी झिरवळ गैरहजर राहिले. मंत्री झिरवळ यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, मंत्री झिरवळ यांच्या व्हायरल व्हिडिओवर काय चर्चा होते, याकडे लक्ष लागलं आहे.

नाशिकच्या भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

SITने काल रात्री उशिरापर्यंत अशोक खरातच्या मुलाची चौकशी केली. चौकशी करुन त्याला सोडून देण्यात आले.

Fastag : आजपासून टोलसाठी नवे नियम लागू

आजपासून टोल प्लाझा कॅशलेस झाले आहेत. वाहनचालकांना फक्त फास्टॅग वापरता येणार आहे. तर यूपीआयद्वारे टोल टॅक्स भरता येणार आहे. तसंच टोलसाठी जादा पैसेही मोजावे लागणार आहे. आजपासून देशातील सर्व टोलनाके कॅशलेस होणार आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ३१० रूपयांची वाढ, घरगुती सिलिंडरच्या किमंतीत वाढ केली नसल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. 

3 एप्रिलपर्यंत पाऊस, गारपीठीचा अंदाज

राज्यातील वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून अनेक भागांमध्ये मेघगर्जना, वीजांचा कडकडाट, वादळी वारे , गारपीट व हलका ते मध्यम पाऊसहोण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे. ती एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अशोक खरातचा मुलगा ताब्यात

अशोक खरात आणि त्याच्या पत्नी विरोधात शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे मात्र खरातची पत्नी फरार आहे. दरम्यान, खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे.

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - आंबेडकर

मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरे कुटुंबावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी X (ट्विटर) वर पोस्ट करत जोरदार हल्ला चढवला आहे. "ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी?" असा सवाल विचारत, ठाकरेंचे राजकारण हे केवळ स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शौमिका महाडिकांची न्यायालयात धाव

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघातील बाराशे सभासदांचा निर्णय प्रक्रिया सुरू आहे. काही संचालकांकडून बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र निवडणूक लागल्यास बाराशे संस्था सभासदांची पात्रता किंवा अपात्रता निश्चित झालेली नाही. मात्र याबाबत निर्णय होऊनच गोकुळ दूध संघाच्या निवडणूक व्हावी, अशी भूमिका गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी घेतली आहे. त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालय यांचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे धाव घेतली आहे.

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ मोहिमेला वेग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणातील सीसीटीव्ही बंद, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

गृहखातं झोपलंय की जाणीवपूर्वक डोळेझाक करतंय? सातारा सीसीटीव्ही बंद, मंत्र्यांवर हल्ला आणि पुराव्यांची विल्हेवाट लावायचा प्रयत्न! हा पूर्वनियोजित कट नाही तर काय? हे राज्य सुरक्षित आहे का? मंत्र्यावर हल्ला होतो, सीसीटीव्ही बंद असतात, पुरावे नष्ट केले जातात. हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर घडतंय? जनतेला उत्तर हवंय, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सातारा झेडपी राडा प्रकरणी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT