Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : महाराष्ट्राने त्या 27 जातींची यादी पाठवली तर ओबीसी समावेशासाठी सकारात्मक विचार करू : आठवले

Tamil Nadu CM Oath Ceremony Live Marathi Breaking News : टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय आज मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार, यासह आज रविवार दिनांक १० मे रोजीच्या राज्य आणि देशभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

‘गरज असेल तरच इंधन वापरा, विमानप्रवास टाळा, सोनं खरेदीही टाळा’ , पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून याचे परिणाम जगावर दिसू लागले आहेत. भारतावर देखील परिणाम झाले मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महत्त्वाचा संदेश देत आवाहन केले आहे. त्यांनी, आजच्या काळाची गरज ओळखून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर अत्यंत संयमाने करा, विमान प्रवास टाळा यासह सोनं खरेदी टाळा असे आवाहन त्यांनी रविवारी केले.

नांदेड : गावात पहिल्यांदा भीम जयंती साजरी केल्याच्या रागातून मारहाण; 25 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल

नांदेड जिल्हयातील धर्माबाद तालुक्यातील माष्टी या गावात दोन गटात हाणामारी झाली.आठ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. या हाणामारीत लाठ्या काठ्याचा मुक्त वापर करण्यात आला.महीला आणि मुलींना देखील मारहाण झाली. यात आठ जण जखमी झाले असून 25 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुण्यात चक्क पाच मजली बिल्डिंग 'चोरीला'?

पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार आणि अतरंगी किस्से नवे नाहीत, पण आता चक्क एक पाच मजली इमारतच महापालिकेच्या कागदोपत्री 'गायब' झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक ३८ मधील गुजर-निंबाळकरवाडी परिसरात हा प्रकार घडला असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी चक्क हातात दुर्बीण घेऊन ही इमारत शोधण्याची मोहीम राबवल्याचं पाहायला मिळालं.

अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू झाला

अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू झाला. सुट्ट्या असल्याने हे सर्वजण पोहण्यासाठी तलावावर गेले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघांचा तलावात बुडून मृत्यू झाला. अमरावतीच्या घातखेडा तलावामध्ये ही घटना घडली. मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावाचा समावेश आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे.

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाख रुपयांचा अपहार

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या वेतन विभागात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याच समोर आल आहे, वेतन वितरण प्रक्रियेत अनिमित्त आढळल्याने चार जणाविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तब्बल 2कोटी 39 लाख रुपयाचा अपहार झाल्याचं चौकशीत समोर आलं आहे, मे 2015 पासून ते 2025 पर्यंत वेतन वितरणातील बेसिक इन्सेंटिव्ह या अनियमितता आणि खडाखोड आढळल्याने ही चौकशी करण्यात आली आहे, तर याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, लिपिक राहुल वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रेय शिरसागर आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसात अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मान्सूनबाबत आनंदाची बातमी: मान्सून वेळेआधी अंदमान आणि महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

स्कायमेट या हवामान खात्याने मान्सूनबाबत आनंदाची बातमी दिली असून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे यंदा मान्सून अंदमानात निर्धारित वेळेच्या आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधीच पोहोचण्याची शक्यता आहे.

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात 4 वर्षांपूर्वी एका तरूणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणात गेल्या चार वर्षांपासून कोर्टात सुनावणी सुरू होती. अशातच आता शिवाजीनगर सत्र न्यायालयाने या प्रकरणातील 4 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

महाराष्ट्राने त्या 27 जातींची यादी पाठवली तर ओबीसी समावेशासाठी सकारात्मक विचार करू : आठवले

ओबीसी यादीत एखाद्या जातीचा समावेश करायचा असेल तर राज्य सरकारने केंद्रीय मंत्रालयाकडे शिफारश करावी लागते. त्यानंतर आमचे मंत्रालयाची कमिटी त्याचा अभ्यास करते, त्या समितीला ते योग्य आहे, असे वाटल्यानंतर त्या जातीचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात येतो. राज्य सरकारशी मी आता संपर्क साधतो आणि कोणत्या जाती ओबीसीपासून वंचित राहिल्या आहेत, हे पाहतो. ती यादी राज्य सरकारने आमच्याकडे पाठवली तर त्यांच्या समावेशाचा आम्ही सकारात्मक विचार करू, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजऱ्यात बसून उपोषण

बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी जुन्नरमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. शेतकरी संघटनेच्या युवा अध्यक्षांनी तर चक्क पिंजऱ्यात बसून उपोषण सुरू केले आहे. बिबट्याच्या हल्लयामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ड्रोनच्या कॅमेऱ्यात दोन बिबटे दिसून आले आहेत, त्यानंतरही वनविभागाने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोपही शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची  साडेपाच तास चौकशी

अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली आहे. दुपारी एक वाजता सुरू झालेली चाकणकर यांची चौकशी आताच संपली आहे.

नसरापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात मूक मोर्चा

नसरापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात मूक मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात सर्वसामान्य पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्या महिलांची संख्या लक्षणीय आहे.

पंढरपुरात नवा दर्शन मंडप आणि स्काय वॉकचे उद्या भूमिपूजन

पंढरपुरात नवा दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाचे उद्या (ता. ११ मे) पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पामुळे १२ हजार वारकऱ्यांची दर्शनाची सोय होणार आहे.

CM Vijay news : विजय यांचा एका मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय हे दोन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यापैकी एका मतदारसंघातील आमदारकीचा त्यांनी आज राजीनामा दिला. आता ते पेरांबूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील.

Pune news : दिवे घाटात प्रचंड वाहतूक कोंडी

पुणे ते सासवड दरम्यान असलेल्या दिवे घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून घाटरस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

ओळखपत्रांशिवाय भारतीयांना नेपाळमध्ये प्रवेश करण्यास बंदी

नेपाळने ओळखपत्रांशिवाय भारतीयांना नेपाळमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. नेपाळला प्रवास करण्यासाठी आणि नेपाळमधून भारतात परत येण्यासाठी भारतीय ओळखपत्र आवश्यक आहे. नेपाळला जाणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीमुळे जोगबनी सीमेवर भारत-नेपाळी नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या आमदार मुख्यमंत्र्यांना साकडे

राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांची दुरावस्था काँग्रेसचे जालन्याचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी दोन दिवसांपूर्वी मांडली. पंचवीस गोणी कांदा विकल्यानंतर पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्यांना खिशातून एक रुपया भरावा लागला, हे काळे यांनी पुराव्यानिशी सोशल मिडियाच्या माध्यमातून समोर आणले होते. यानंतर आता विधान परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत विविध मागण्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही दानवे यांनी दिला आहे.

Kanha Tiger Reserve 'केनाईन डिस्टेंपर' विषाणूमुळे एका वाघिणीसह 4 बछड्यांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात 'केनाईन डिस्टेंपर' विषाणूमुळे एका वाघिणीसह 4 बछड्यांचा मृत्यू झाला. कुत्र्यांपासून पसरणाऱ्या या घातक विषाणूने वाघांच्या मज्जासंस्थेवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. हा विषाणू प्रामुख्याने कुत्र्यांमध्ये आढळत असला, तरी तो आता मांजरवर्गीय प्राण्यांमध्ये पसरत असल्याने वन्यजीव तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केलीये... या घटनेनंतर महाराष्ट्रातील ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र वन विभाग हाय अलर्टवर आलंय.. वन्यजीवांसाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कान्हा प्रशासनाने ५ चौरस किलोमीटरचा परिसर 'नो गो झोन' केला असून हत्तीवरून गस्त सुरू केलीये...

PM Modi Bengaluru Visit मोदींच्या दौऱ्यादरम्यान सापडल्या जिलेटीन कांड्या

बंगळुरूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या मार्गाजवळ जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. बंगळुरूच्या बाहेरील कग्गलीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे स्फोटक साहित्य आढळून आलंय. हा मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित प्रवासाच्या मार्गाच्या अत्यंत जवळ होता. संपूर्ण बंगळुरू पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत. स्फोटके सापडल्यानंतर तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून, संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याची अज्ञात स्थळी कसून चौकशी सुरूये...

Vijay In Action Mode As CM विजय मुख्यमंत्री होताच अॅक्शन मोडमध्ये

तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर थलपती विजय यांनी लगेचच कामाचा धडाका सुरू केला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने 3 महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयांमुळे नवीन सरकारच्या कार्यशैलीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Monsoon 2026 : अंदमानात यंदा मान्सूनचे लवकर आगमन, उकाड्यापासून सुटका होणार

'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला मोठी चालना मिळाली असून तो लवकरच अंदमानात दाखल होईल. हवामान तज्ज्ञांच्या मते, 12 आणि 13 मे दरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होईल, परिणामी मान्सून सरासरी तारखेच्या आधीच अंदमानात धडकू शकतो. यापूर्वी मान्सून 14 ते 22 मे दरम्यान येण्याचा अंदाज होता, मात्र आता हे आगमन त्याआधीच होण्याची चिन्हे आहेत.

Eknath Shinde Shivsena : विकास लवांडेंवरील हल्ल्याचं आमदार अमोल खताळ यांच्याकडून समर्थन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर संग्रामबापू भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या शाई फेक हल्ल्याचे समर्थन एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे. “वारकरी संप्रदायाशी वाकड, त्याची नदीवर लाकड!” ही भावना आज लाखो वारकऱ्यांच्या मनातील संताप व्यक्त करणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. संतांची शिकवण, भगवी पताका आणि हिंदू धर्माची अस्मिता यांचा अपमान करणाऱ्यांना संविधानिक आणि लोकशाही मार्गाने ठोस उत्तर दिले जाईल, असा इशाराही आमदार खताळ यांनी दिला.

Ahilyanagar Crime : आठ वर्षीय मुलाला थेट मध्यप्रदेश मधून चोरी गेलेल्या 17 लाखांच्या दागिन्यांसह कोतवाली पोलिसांनी घेतलं ताब्यात

साखरपुड्याचे कार्यक्रमातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका आठ वर्षीय बालकाकडून 16 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 25 हजाराची रोख रक्कम, असा 17 लाख रुपयांचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांनी मध्यप्रदेशमधील राजगड जिल्ह्यातील कडिया सांसी, या संवेदनशील भागात जाऊन मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने जप्त केला आहे. विशेष म्हणजे, फक्त एका फोटोशूट करत असताना एक अज्ञात मुलगा व्हिडिओमध्ये आला होता, त्या एक सेकंदाच्या व्हिडिओवरून पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून आठ वर्षीय मुलाकडून मध्यप्रदेश मधून 17 लाखांचे सोन आणि रोख रक्कम जप्त केल्याची कामगिरी केली आहे.

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गामध्ये कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील नव्याने 108 गावांचा समावेश

वर्धा ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवी दरम्यान प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र शासनाने सुधारित अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यांतील 79 गावांचा तसेच सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यांतील 29 गावांचा महामार्गाच्या नव्या संरेखनात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे सुमारे 802.6 किलोमीटर लांबीचा असणार असून, महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना जोडणार आहे.

Beed Politics : सुषमा अंधारे यांच्यावर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका करत निषेध आंदोलन केले. सुषमा अंधारे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना समजल्यानेच त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली नाही, असा दावा या एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला. या वेळी सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला चॉकलेट खाऊ घालत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. “अंधारे यांना फक्त चॉकलेट देण्यात आले,” असा टोला देखील महिला पदाधिकाऱ्यांनी लगावला.

Amravati Update : अमरावती उत्सव मेल्यात पार्टनरची हत्या; चाकू हल्ल्यात व्यावसायिकाचा मृत्यू

अमरावतीतील सायन्सकोर मैदानावर भरलेल्या अमरावती उत्सव मेल्यात मेला पार्टनरची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमधील रमामगंज येथील 53 वर्षीय मेला व्यावसायिक अभिजित कर यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला. 7 मे रोजी दुपारी मेला मालकाचा भाऊ अजीज खान युसूफ खान हा दारूच्या नशेत जेवण करत असताना त्याचा अभिजित कर यांच्यासोबत वाद झाला. वाद वाढल्यानंतर अभिजित कर यांनी आरोपीला थापड मारल्याने संतापलेल्या अजीज खानने जवळील भाजी कापण्याच्या चाकूने त्यांच्या कमरेवर वार केला. जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

D Sudhakar passed away : कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री डी. सुधाकर यांचे आज निधन झाले

कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री डी. सुधाकर (वय 66) यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून सुधाकर हे फुफ्फुसाच्या गंभीर संसर्गाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे कर्नाटक राजकारणात मोठी शोककळा पसरली आहे. डी. सुधाकर यांच्या निधनावर अनेक दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

खासगी शाळेतील शिक्षकांना देखील टीईटी अनिर्वाय होणार

शासकीय शाळांच्या शिक्षकांवर उगारला जाणारा 'टीईटी' म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेचा बडगा आता खासगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांवरही उगारला जाणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे बोगस किंवा अपात्र शिक्षकांचे धाबे दणाणले असून, खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.

अभिनेता विजयने घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून अभिनेता विजय यांनी शपथ घेतली. विजयसोबत 9 जण मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या समारंभासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित आहेत.

बुलढाणा कारागृहातून सुटलेल्या गुंडाची मिरवणूक अन् सत्कार; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील विजय चिंचपुरे या गुंडावर जालना जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातही अनेक गुन्हे दाखल आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथल्या एका खासगी डॉक्टरला खंडणी मागितल्या प्रकरणी या गुंडावर गुन्हे दाखल आहेत आणि त्यानुसार तो बुलढाणा कारागृहात बंदी होता. मात्र कारागृहातून सुटताच या गुंडाची त्याच्या साथीदारांनी बुलढाणा शहरातून मिरवणूक काढत व त्याचा सत्कार केला. या मुळे बुलढाणा इथं कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.

भाजप आमदाराच्या 'PA'ची वन विभागातील महिला कर्मचाऱ्याला फोनवरून अश्लील शिवीगाळ

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजपचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक (पीए) महेश प्रेमलवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील सफारी बुकिंगसाठी ताडोबा प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांना फोनवरून शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आल आहे. ताडोबा पर्यटन माहिती केंद्रातील एका महिला कर्मचाऱ्याच्या फोनवरून प्रेमलवार यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली. या धमकीनंतर सचिन शिंदे यांनी वरिष्ठांना महेश प्रेमलवारविरोधात पत्राद्वारे तक्रार केली आहे.

तामिळनाडूचा पेच सुटला, केरळ मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय पुढील 24 तासांत होणार

केरळच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी असलेल्या तीन प्रमुख दावेदारांच्या समर्थकांकडून सुरू असलेल्या दबावतंत्राच्या पार्श्वभूमीवर, या मुद्यावर पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व 24 तासांच्या आत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते व्ही. डी. सतीशन, रमेश चेन्निथला आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या समर्थनासाठी राज्याच्या विविध भागात समर्थकांमध्ये पोस्टर युद्ध सुरू आहे.

रूपाली चाकणकर आज आएसआयटीसमोर हजर राहणार

माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आज आएसआयटीसमोर हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कान्हा व्याघ्र प्रकल्पात एका आठवड्यात पाच वाघांचा मृत्यू

मध्यप्रदेशातील 'कान्हा' व्याघ्र प्रकल्पात 'केनाईन डिस्टेंपर वायरस' मुळे एका आठवड्यात पाच वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कान्हा व्याघ्र प्रकल्पातील ज्या 'सरही' सेक्टरमध्ये ही घटना घडली आहे, तिथे पाच वर्ग किलोमीटरचा भाग 'नो गो झोन' करण्यात आला आहे.

विजय यांच्या शपथविधीसाठी राहुल गांधी उपस्थित राहणार

काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विजय यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. यासाठी ते चेन्नईत दाखल झाले आहेत.

Tamil Nadu Government Formation : अखेर संख्याबळाचा तिढा सुटला, थलपती विजय आज मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार

टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन १२१ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सोपवल्यानंतर विजय यांचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार रविवारी (ता.१०) सकाळी दहा वाजता विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार असून त्यांना १३ मे पूर्वी विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT