महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन एक ठार, तर सतरा भक्त जखमी झाले. हा अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा गावाजवळ झाला. जखमींपैकी गंभीर १२ जण चंद्रपूरला, तर ५ जण वरोरा इथे हलवण्यात आले. पाटाळा परिसरातील शिवभक्त मालवाहक वाहनातून भटाळा येथे त्रिशूल घेऊन दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना पाटाळाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते उलटले. यात भूषण विजय दोडके (वय १७, रा. पाटाळा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. प्रकृती गंभीर असल्याने १२ जणांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह भक्तिभावात साजरा होत असताना परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर आमदार धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाचे दर्शन घेत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावरही भाष्य केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती आणि तीच त्यांची इच्छा होती, असे मुंडे म्हणाले. आता त्यांच्या नंतर उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतभेद बाजूला ठेवून बीडच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी खंबीरपणे एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारात अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करत शिरपूर तालुका पोलिसांनी तब्बल 41 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, राशा समदा पावरा वय 50 याने आपल्या मालकीच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केली होती, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोन किलोमीटर पायपीट करत नाल्यांच्या मार्गाने शेतात छापा टाकला, या कारवाईत 820 किलो वजनाची फुले व बोंडे असलेली गांजाची झाडे हस्तगत करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
वाढत्या रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना यावर ठोस उपाययोजना सुरू असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि त्यांना गती देण्यासाठी केंद्र व रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील पिंपळेश्वर मंदिर रस्त्यालगत असलेल्या नाल्यातून रासायनिक मिश्रित हिरवट पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, नाल्यातून येणारे पाणी हिरव्या रंगाचे असून त्यातून रासायनिक वास येत आहे. हे पाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांनी या पाण्यामुळे आरोग्याच्या त्वचेच्या तक्रारी उद्भवण्याची भीती व्यक्त केली आहे.
शक्तीपीठाच्या विरोधानंतर आता सांगली जिल्ह्यात शक्तीपीठाच्या समर्थनात शेतकरी उतरले आहेत.मूळ रेखांकन प्रमाणेच सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ व्हावा,या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातले शक्तिपीठ बाधित शेतकरी आता एकवटले असून समर्थनातल्या आंदोलनात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी देखील उडी घेतली आहे. सांगलीवाडी येथे शक्तीपीठ समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत महामेळावा पार पडला. यावेळी राज्य सरकारकडे पूर्वीप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला. त्याचबरोबर यासाठी सरकारने शेतकऱ्यांचे मतदान घ्यावे,अशी मागणी या मेळाव्यातून संभाजी भिडे यांनी केली आहे.
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या भारत-पाक सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आज स्टेडियम मध्ये पोहोचले आहेत.
दोन्ही संघांचे आगमन होताच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संघाच्या बस स्टेडियममध्ये पोहोचताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
पुणे येथील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करू नयेत, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
आज रविवारी (ता.15) दुपारी भाजपकडून काँग्रेस भवनावर आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन हिंसक झाले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. भाजप कार्यालय परिसरात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून ये-जा करणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पाकिस्तान आपल्या देशावर वारंवार हल्ले करतोय देशात दहशतवादी कारवाया करतो. अशा परिस्थितीत पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळलाच नाही पाहिजे.
भाजपला लाज वाटत नाही. त्यांना केवळ आयपीएल व क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून करोडो रुपयांचा व्यवसाय करायचा आहे. त्यांना देशप्रेम वगैरे याच्याशी काही देणेघेणे नाही.
अशाप्रकारे परखड मत इस्लाम पार्टीचे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख यांनी आज होत असलेल्या भारत क्रिकेट सामन्याबाबत व्यक्त केले आहे.
पालघरच्या एमआयडीसी मध्ये कंपनीला भीषण आग लागण्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. गणेश नगर येथील परफेक्ट कंटेनर कंपनीला भीषण. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी वेळेत अग्निशमन दलाची गाडी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्याच्या महापौर यांच्यावर गुन्हा दाखल करा, काँग्रेसची मागणी
आंदोलनावेळी पोलिसांवर दबाव होता, काँग्रेसचा आरोप पोलिसांनी पक्षपातीपणा केल्याचा काॅंग्रेसचा आरोप
काँग्रेस नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांचा फरासखाना, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या बाहेर ठिय्या
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार
चिपळूण मधून मोठी बातमी.. माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आणि शहरप्रमुख परिमल भोसले यांच्यासह एकाची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेेली आहे. नगरपरिषद निवडणुकीत पक्षाच्या विरुद्ध काम केल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे बोलले जात आहे...
जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची सुरेखा खेराडे आणि परिमल भोसले यांच्यावर थेट कारवाई केली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ मधील पुरातन शिवमंदिरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवपुजा करत दर्शन घेतले. पहाटे त्यांनी मंदिरात पूजा, अभिषेक व आरतीत केली.
त्यांच्याबरोबर उपस्थित भाविकांशी संवाद साधत त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि शांततेसाठी प्रार्थना देखील यावेळी केली.
महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी मंदिर परिसरात भाविक भक्तांची मोठी गर्दी होती. संपूर्ण मंदिर परिसर ‘हर हर महादेव’च्या नामाने दुमदुमून जात होता.
ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईत मेट्रोच्या कामांमुळे संपूर्ण शहर खोदलं गेलं असून बाहेरील कंत्राटदारांना शहराची माहिती नसल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत यांनी म्हटलं की, “भाजप सरकार राम भक्ताला चिरडून मारते आणि विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करते.” त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. तसेच अलिबाग येथील म्हात्रोळी गावातील जमीन वादाच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना इशारा देत, “मी माहिती बाहेर काढली तर विधानसभाध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल,” असा दावा राऊत यांनी केला.
टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांविरोधात नाशिकमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी कऱण्यात आली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने वाद चांगलाच चिघळला आहे. यावेळी सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाख देणार अशी घोषणाच मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केली आहे.
मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागात लिपिक ढेरेंगे याला 35 हजाराची लाच घेताना एसबीने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर लिपिक ढेरिंगेला पुन्हा मूळ विभागात पाठवा, असे पत्र सामान्य प्रशासनाला नरहरी झिरवाळ यांनी लिहिले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत.. 17 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होईल.,या बैठकीत विलिनीकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी सक्तीचे प्रशिक्षण देण्यासाठी 20 फेब्रुवारीपासून महाअभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय भाजपने यंदाचे वर्ष 'प्रशिक्षण वर्ष' म्हणून जाहीर केले असून, पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता आणि बाहेरून आलेल्या नेत्यांनाही प्रशिक्षण घेणे अनिवार्य असणार आहे.
याआधी मराठवाड्यातील एकाही मराठा बांधवाला ओबीसी दाखला मिळत नव्हता. आता तब्बल ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. हळूहळू मराठवाड्यातील प्रत्येक मराठा समाजातील बांधवांना ओबीसी दाखला मिळेलच, असा विश्वास मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारंगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या फिर्यादीवरीन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी दरम्यान ज्यांच्याकडून टोल वसूल करण्यात आला होता त्यांचे टोलचे पैसे आठ दिवसात परत करण्याचं आश्वासन IRB कंपनीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिलं आहे.
मुलुंड मेट्रोचा स्लॅब अपघाता प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक. तर मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मेट्रो मार्गाचं बांधकाम करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला एक कोटींचा दंड आणि अपघाताला जबाबदार असणाऱ्या मिलन इंफ्रा कंपनीला 5 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.