Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Updates : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हे दोन्ही नेते आज मुंबईत येणार आहेत. यासह आज 17 फेब्रुवारी रोजीच्या दिवसभरातील राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

इस्लाम पार्टीच्या आरोपांना इम्तियाज जलील यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, शुभेच्छा

एमआयएम मुस्लिम मतांचा बाजार करणारी पार्टी आहे, असा आरोप मालेगावात सर्वाधिक जागा जिंकलेल्या इस्लाम पार्टीनं केला होता. त्याला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे, त्यांनी पक्ष स्थापन केलेला आहे त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

सहाजिक आहे पक्ष स्थापन केल्यानंतर ते एक दोन जागे पुरते मर्यादित राहणार नाहीत आता महाराष्ट्रभर जातील आणि आमच्या शुभेच्छा आहेत, असंही जलील यांनी म्हटलं आहे.

अल्पसंख्यांक शाळांना प्रमाणपत्र वाटप प्रकरणात मोठी घडामोड! उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्यावर कारवाई

दिवंगत अजितदादा पवार यांच्या मृत्यूदिनी राज्यात दुखवटा असताना अल्पसंख्यांक शाळांचा दर्जा देण्याचा आदेश सरकारी पातळीवरुन निघाल्याचं निदर्शनास आलं होतं. यामुळं मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणात आता सरकारनं मोठी कारवाई केली असून हा आदेश काढणारे अधिकारी उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली करण्यात आली आहे.

ईडीची मुंबई आणि रायगड मध्ये मोठी कारवाई; 132.85 कोटींची मालमत्ता जप्त

* ईडीने मुंबई व रायगड जिल्ह्यातील 132.85 कोटींची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

* उषदेव इंटरनॅशनल लिमिटेड प्रकरणात धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA) 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

* एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँक समुहाची सुमारे 1,438 कोटींच्या फसवणुकीची तक्रार

* बनावट व्यापारी कागदपत्रांद्वारे कर्ज, एलसी आणि खरेदी कर्ज मिळवल्याचा आरोप

* निधी विविध संस्थांमार्फत फिरवून संबंधित कंपन्यांकडे व परदेशात वळविल्याचा संशय

* मनी लॉन्डरिंगचे संकेत; प्रकरणाचा पुढील तपास सुरू

ब्रेक फेल झाल्याने एसटीबस घुसली बस स्थानकात

यवतमाळ ते पुसद ही बस प्रवासी घेऊन जात असताना प्रवाशांना उतरवण्यासाठी आर्णी बस स्थानकावर थांबा घेण्यासाठी बस लावताना अचानक एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने चक्क एसटी बस बसस्थानकाच्या समोरच्या खांबाला धडक दिली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून कोणालाही इजा पोहोचली नाही.मात्र एसटी बसची केबिनचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोपरगावमध्ये राज्यस्तरीय "राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिर

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोकमठाण येथे दोन दिवसीय " राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिर " पार पडतंय.. मुली आणि महिलांना स्वसंरक्षणासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात राज्यभरातून आलेल्या पाच हजार मुलींनी सहभाग नोंदवत स्वसंरक्षणाचे धडे घेतले.

अध्यक्षपदासाठी महायुतीमध्येच डाव-प्रतिडाव

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता येणार आणि कोण अध्यक्ष होणार याची उत्सुकता आणि उत्कंठा दोन्ही जिल्हा वासियांना लागली आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसले तरी महायुतीचं काठावरचे बहुमत आहे. तर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महायुती बहुमतात असली तरी सर्वाधिक सदस्य हे राष्ट्रवादीचे आहेत. सांगलीमध्ये भाजपला बाजूला ठेवून अध्यक्ष करण्याच्या हालचाली महायुतीच्या गोटात सुरू आहेत. कोल्हापुरात सुरुवातीला राष्ट्रवादीला बाजूला ठेवून प्रथम भाजपचा अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच डाव प्रतिडाव टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

नव्या नगरसेवकांकडून महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमक्या

नगरसेवक होऊन अवघा एक महिना झाला नाही तर नव्याने निवडून आलेले नगरसेवक मनपाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना धमक्या द्यायला लागले. बॅनरप्रकरणी गुन्हा नोंदवायला गेले की कुणाकुणाचे फोन येतात यावर बोलायलाच नको. आता तर जीबी (सर्वसाधारण सभा) असल्याने थेट थांब आता तुला 'जीबी'मध्ये पाहतो म्हणून नगरसेवकांकडून धमकावले जात असल्याचे खुद्द मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी म्हटले.

मुस्लिम युवक संघटना तर्फे,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ,आंबेडकर यांची प्रतिमा उपमहापौर याना भेट

नाशिकच्या मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांना टिपू सुलतान यांचा फोटो भेट देण्यात आल्यावर तो त्यांच्या केबिन मध्ये लावण्यात आल्यानंतर राजभरातून त्याविरोधात गदारोळ झाला असतानाच आज सकल मुस्लिम युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष मिरान पठाण व कार्यकर्त्यांनी उपमहापौर यांना छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फ्रेम भेट देण्यात आली,यावेळी उपमहापौर यांनी सर्व महापुरुषांचे फोटो लावण्यात येईल असे स्पष्ट केले.

बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील राशन दुकानदार आणि राशन धारकाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील राशन दुकानदार आणि महेश चांदणे नामक राशन धारकाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. माझ्या वेळेनुसारच मी राशन वाटणार, मी राशन देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर, तू कार्डधारक असला म्हणजे माझा मालक नाहीस असे म्हणत राशन दुकानदार या राशन धारकाला धमकावत असल्याचे या कॉल रेकॉर्डिंग मधून स्पष्ट होत आहे. दरम्यान ही कॉल रेकॉर्डिंग सोशल माध्यमांवर व्हायरल झाली असून राशन दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी धारूर तहसीलदारांकडे निवेदनातुन करण्यात आली आहे.

Navi Mumbai : कचरा टाकण्याच्या वादातून तिघांना जबर मारहाण; लाठ्या, खुर्च्या, पट्टे अन् चाकूने वार

नवी मुंबईच्या तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किरवलीमधील ॲमेझॉन कोल्ड स्टार वेअर हाऊसवर काम करणाऱ्या तिघांना कचरा टाकण्याच्या वादातून जवळपास 20 पेक्षा जास्त मुलांनी मिळून काठी, खुर्च्या, पट्ट्याने जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ हाती लागला असून घटनेची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. यातील शोएब शेख आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मारहाण झालेल्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील ऋषिकेश वावेकर याच्या डोक्यावर चाकूने वार झाला असून केतन गोंधळी आणि राहुल माळी यांनाही जबर दुखापत झाली आहे.

SushmaTai Andhare : मुंबईतील बॅनरबाजीत सुनेत्रावहिनींचा फोटो छोटा; सुषमा अंधारेंचा तिखट सवाल

मुंबईमध्ये आज फ्रान्सचे राष्ट्र प्रमुख येणार या निमित्ताने जोरदार बॅनरबाजी केली आहे. पण आजवर मुख्यमंत्री आणि त्यानंतर थोड्या कमी मात्र सारख्या उंचीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असायचे. मात्र आज लावलेल्या बॅनरमध्ये नव्याने उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रावहिनींचा फोटो आकाराने छोटा का लावला गेला? असा सवाल शिवसेना ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. हे बॅनर शाहसेनेने लावले असल्याचे कळते. शाह सेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनेत्रा वहिनींचा फोटो लहान करून नेमके काय दाखवायचे आहे. महिला म्हणून श्रीमती पवार यांचे अवमूल्यन करायचे आहे की, पदसोपांपरंपरेमध्ये मी दुसरा आणि पवार तिसऱ्या असं सांगायचं आहे? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केला.

Sunil tatkare meet ravindra chavan : तटकरे अन् चव्हाण भेट; पुढील राजकीय दिशा ठरली, घेतले मोठे निर्णय

अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट झाली. जिल्हा परिषद निवडणूक झाली असून अनेक ठिकाणी एकत्र जाण्यासंदर्भात चर्चा झाली. तसंच पुढील काळात अनेक ठिकाणी आम्ही एकत्र सत्ता स्थापन करणार आहोत. आमदारांनी कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. पुढील काळात पक्ष संघटना काम करण्याबाबतही आमच्यात चर्चा झाली, अशी माहिती खासदार तटकरे यांनी दिली.  

Manoj Jarange Patil :  मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल; जरांगे पाटील यांचा दावा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे यांची माझ्या जवळ 22 प्रकरण आली आहेत. त्यामुळं तू शहाणा हो, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल असेही जरांगे म्हणाले.

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर हादरलं! महिलेचा खून, मृतदेहाजवळ बसून मुलगा बसला खेळत

अहिल्यानगर शहरातील नवले नगर परिसरात एका विकृत युवकाने आपल्या आईचा खून करून स्वतःला बंद खोलीत डांबून घेतलं. या युवकाने आईचा धारदार हत्याराचा वापर करत खून केला. यानंतर आईच्या मृतदेहाजवळ बसून गोट्या खेळला. सुहास गवारे असे विकृत युवकाचे नाव आहे. तोफखाना पोलिसांनी युवकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याने पोलिसांनी हल्ला केला. पोलिसांनी मिरचीचे पाणी त्याच्या डोळ्यावर फेकून दरवाजा तोडला अन् त्याला ताब्यात घेतलं.

Beed Crime : सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून वाद; दोन गटात राडा अन् बीडमधील युवकाचा खून 

सोशल मीडियावर स्टोरी आणि स्टेटस ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित संघर्षात बदलल्याची धक्कादायक घटना बीड  जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आष्टी तालुक्यातील रुई नालकोल इथं मित्रांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव दीपक शिवाजी नालकोल (वय 20) असे असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sunil Tatkare : अजितदादांच्या विमान अपघाची सीबीआय चौकशी करा; सुनील तटकरे यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातीची स्वायत्त यंत्रणेसह सीबीआय चौकशी करा, अशी मागणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. यासंदर्भात पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे.

Mumbai Update : मुंबईतील अतिक्रमणे; आठ दिवसात अहवाल सादर करा, सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात डीईजी-दक्षिण, एच-पश्चिम, के-पश्चिम, पी-उत्तर, पी-दक्षिण व एल प्रभाग क्षेत्रात अनेक ठिकाणी शासकीय आणि खासगी जमिनींवर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. यासंदर्भात मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात 18 मार्चमध्ये चर्चेला आलेल्या लक्षवेधीवर मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसाच्या आत सादर करण्यात यावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. विधानपरिषदेचे सदस्य सचिन आहिर यांनी उपस्थित केलेल्या या लक्षवेधीच्या अनुषंगाने आज दिनांक 16 फेब्रुवारीला विधान भवन, मुंबई इथं बैठकी झाली.

Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केली दिलगिरी; पण भाजपच्या खोडसाळपणाचा व्यक्त केला निषेध

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान सोबत केल्यावरून राज्यात गदारोळ निर्माण झाला होता. यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांना धमक्याही मिळाल्या, तर काही शिवप्रेमी थेट हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी सुद्धा दाखल झाले होते. या अनुषंगाने काही वेळापूर्वीच हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक पोस्ट करत "भाजपचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्या गलिच्छ व खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्यात, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमी प्रति दिलगिरी व्यक्त करतो व कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचण्याचा माझा हेतू नव्हता" अशा भावना व्यक्त केली आहे.

शक्तीपीठ महामार्गाविरोधात लातूरमध्ये तणाव; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर जिल्ह्यातील भोकरंबा येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. महसूल अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त पाहून शेतकरी आक्रमक झाले. दबाव टाकून मोजणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याच दरम्यान एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांशी शाब्दिक वादही झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपास वेगात; आणखी तिघांची नार्को चाचणी

बीडमध्ये गाजत असलेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील तेजस मोरे, सोमनाथ जाधव आणि महेश शिंदे या संशयितांची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. एकूण सहा जणांच्या नार्को व ब्रेन मॅपिंग चाचण्यांना परवानगी मिळाली असून तिघांची चाचणी यापूर्वी झाली आहे. उर्वरित तिघांची चाचणी उद्या होणार आहे.

Ajit Pawar Death : अजित पवार विमान अपघात प्रकरणी आमचा संयम सुटत चाललाय : रुपाली ठोंबरे पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी अनेक गोष्टी संशयाच्या चक्रात अडकत चाललेल्या आहेत. सत्य बाहेर येत नाही, तेव्हा संशय वाढतो, त्यामुळेख आमचा संयम आता सुटत चालला आहे, अजून धीर धरणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी दिला आहे.

Climate Week : मुंबईत आजपासून क्लायमेट वीक

मुंबईत आजपासून ‘क्लायमेट वीक’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ३५ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Rohit Pawar : ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हरमधील माहितीसंदर्भात राेहित पवार उद्या माहिती देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हरमधील माहितीसंदर्भात उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

Meera Bhayander : भाजप आपलाच ठराव बदलणार

मीरा भाईंदर महापालिकेची पहिली महासभा बुधवारी (ता. 18 फेब्रुवारी) होणार आहे. त्या सभेत ठराव क्रमांक 16 द्वारे टिपू सुलतान चौक हे नाव रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चौकाल टिपू सुलताना देण्याचा ठराव हा भाजपने 2016मध्ये मंंजूर करण्यात आला होता.

12th Paper Copy Case :  सामूहिक कॉपी प्रकरणी वाशिम जिल्ह्यात शिक्षकांसह 26 जण निलंबित

सामूहिक कॉपी प्रकरणी वाशिम जिल्ह्यात शिक्षकांसह २६ जण निलंबित

राज्यात बारावीच्या पेपमरधील सामूहिक कॉपी प्रकरण गाजत आहे. वाशिम जिल्ह्यातील श्री. मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्रात सोमवारी (१६ फेब्रुवारी) भौतिक शास्त्राच्या पेपरला सामूहीक कॉपीचे प्रकरण उजेडात आले होते. त्याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी धोंडिराम ससाणे यांच्या भरारी पथकाने शिक्षकांसह २६ जणांना निलंबित केले आहे.

Sunetra Pawar : शाळांना अल्पसंख्याक दर्जा; उपसचिवांची चौकशी होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूदिनी राज्यातील शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सह्या कोणी आणि कोणाच्या दबावाखाली केल्या याचीही चौकशी करण्यात येणार आहे. ही अल्पसंख्याक प्रमाणपत्रं उपसचिव मिलिंद शेनॉय यांच्या सहीने देण्यात आली आहेत. त्यांचीही चौकशी आता होणार आहे.

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानातील डेटा रिकव्हरमधील माहिती मिळविण्याचे काम सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामधील ब्लॉक बॉक्समधील दोन्ही डेटा रिकव्हरवर उच्च तापमानाचा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेला आगीमुळे या डेटा रिकव्हरमधील माहिती मिळविण्यात अडचणी येत असल्याचे उघड झाले होते. ज्या देशात या विमान अपघाताची बांधणी होते, त्या देशाकडून डेटा रिकव्हरमधील माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती एअर इंडिया ॲक्सिडेंट ब्यूरोने दिलेली आहे.

Sanjay Raut : मेधा सोमय्या अब्रुनुकसानीचे प्रकरण; खासदार संजय राऊत सत्र न्यायालयात दाखल

शौचालय घोटाळ्याप्रकरणी माझगाव कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी माजी खासदार किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबईच्या सत्र न्यालयात सुनावणी होत असून त्या सुनावणीसाठी राऊत न्यायालयात पोचले आहेत.

हर्षवर्धन सकपाळ यांच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. सकल हिंदू समाजाने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपकाळ यांच्याविरोधात निषेध करीत आंदोलन केले. सकपाळ यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला.

पाणीपट्टी भरा!जलसंपदा विभागाची पुणे महापालिकेला नोटीस

पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाने नोटीस पाठवली आहे. थकीत बाकी भरली नाही तर लवकरच पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.महापालिकेकडून अद्याप 932 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.

योग्य कारवाई होणार, चौकशी सुरु आहे

मंत्रालयात झालेला प्रकार हा कलंक आहे, आरोपींची चौकशी सुरु आहे, या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे नरहरी झिरवाळ यांची पत्रकार परिषदेते सांगितले

जुन्या मुंबई बेलापूर रोडवरील कळवा येथे टेम्पो डिवाइडरला धडकल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती,  आता ही वाहतूक तुरळक सुरू झाली आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. झिरवाळ मंत्रालय लाचखोरी प्रकरणाबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. 

Sunetra Pawar on Narhari Zirwal : झिरवाळ यांच्या कारभारावर सुनेत्रा पवारांची नाराजी

मंत्रालयातील लाच प्रकणात नरहाळी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ होत आहे. आता याप्रकरणाची दखल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कारभारावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

रस्त्याच्या कामामुळे पुण्यातील शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गुरुवारी, १९ फेब्रुवारीला साजरी होत असताना मिरवणूक मार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे शिवभक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मिरवणूक मार्गात बदल करा असे आदेश नवनिर्वाचित महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. महापौर नागपुरे यांच्या आदेशानंतर मिरवणूक मार्गात केलेला पुढील प्रमाणे असणार आहे.

श्री भवानी माता मंदिर- श्री भवानी माता चौक- बनकर तालीम-रामोशी गेट-श्री सूर्यमुखी सिद्धिविनायक मंदिर चौक- ए.डी.कॅम्प चौक-संत कबीर चौक-लक्ष्मी रस्त्याने सोन्या मारुती चौक-फडके हौद-लाल महा- नवग्रह मंदिर- शनिवारवाडा- शिवाजी महाराज पुतळा, एसएसपीएमएस.

तपोवन वृक्ष तोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोड प्रकरणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील अंतरिम अर्जावर आज मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष अ‍ॅड. नितीन पंडित यांनी तपोवनातील वृक्षतोडी विरोधात ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात नाशिक महापालिका तसच नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला अंतरिम अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे आज सुनावणी दरम्यान नाशिक महापालिका आणि संबंधित विभाग न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Abdul Sattar's Wife Death : अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी, सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसाबेगम यांचे निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज सकाळी 10 वाजता सिल्लोड येथे करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हे दोन्ही नेते आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT