शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सरकार अक्षरशः झुंडशाही करत आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. सध्या राज्यात शक्तिपीठ महामार्गाला मोठा विरोध होताना दिसतो आहे. परभणीत याच महामार्गाला विरोध करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर पोलीसांनी लाठ्या चालवल्या. यावर आता विरोधकही सरकारवर तुटून पडले आहेत.
रोहीत पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. अजित पवार यांचे विमान अपघातात गेल्या महिन्यांत निधन झाले. या प्रकरणाबद्दल रोहीत पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतले. यात त्यांनी विमानात जाणीवपुर्वक पेट्रोलचा मोठा साठा ठेवला होता, असा आरोप केला. त्याशिवाय नागरी हवाई मंत्री राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा ही मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबतची कल्पना खासदार सुनील तटकरे यांना होती. विलिनीकरणासंदर्भात दहा ते बारा बैठका झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वारंवार केला जात आहे. शेवटची बैठक १६ जानेवारी रोजी झाली होती, त्या बैठकीला सुनील तटकरे उपस्थित होते, या बैठकीला सुप्रिया सुळे आणि अजितदादा उपस्थित होते, त्यांना विलिनीकरणाबाबत माहिती देण्यात आली होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे, अशी बातमी एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
आरएसएस संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर झाले. या प्रकरणात राहुल गांधी यांनी यापूर्वी दिलेले जामीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात दुसरा जामीन देण्यासाठी ते भिवंडी न्यायालयात हजर झाले होते. भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश पी. एम. कोळसे यांच्या न्यायालयात राहुल गांधी उपस्थित झाले होते. यावेळी खटला दाखल करणारे आरएसएसचे राजेश कुंटे देखील न्यायालयात उपस्थित होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा जामीन राहुल गांधी यांनी दिला असून पुढील सुनावणी ४ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती नारायण अय्यर यांनी दिली.
राज ठाकरे यांनी कुठं जावं आणि कुठं जाऊ नये, याची आचारसंहिता आता संजय राऊत यांनी तयार करायची का? डुबलेल्या पक्षाच्या प्रवक्ताने अशी वक्तव्ये करणे, हे लोकांना आवडत नाही आणि लोक त्याकडे लक्षही देत नाहीत, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
व्हीएसआर कंपनीसोबत तेलगू देशम पार्टीच्या बड्या नेत्याच्या कुटुंबातील सदस्यांचे आर्थिक व्यवहार असतील, तर या पक्षाचे केंद्रीय मंत्री राममोहन नायडू हे थोडीच अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूची पारदर्शकपणे चौकशी करणार आहेत. व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्रातीलही मोठ्या नेत्याचा व्हीएसआर कंपनीसोबत संबंध आहेत. गुजरात, आंधप्रदेश, मध्यप्रदेश येथील नेत्यांचाही त्यात समावेश आहे. एवढे मोठे लोक व्हीएसआर कंपनीच्या पाठीशी असतील तर विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी याप्रकरणी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रातील नेत्यांची नावे मी नंतर सांगतो, त्यांना जो काही संदेश द्यायचा आहे, तो दिलेला आहे. त्यांना एवढचं सांगतो की, अजितदादा तुमचे मित्र होते, त्यामुळे त्यांनी मैत्री निभावणं जास्त महत्वाचं आहे, असे रोहित पवार यांनी आवाहन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. व्हीएसआर कंपनीच्या पाठीशी काही पॉवरफुल लोक असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच अजितदादांना न्याय देऊ शकतात. त्या दोघांना याबाबत पत्र लिहिणार आहे, असेही आमदार पवार यांनी स्पष्ट केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी फरार असलेला कृष्णा आंधळे हा तीन वेळा गावी येऊन गेला, असा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी खटल्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भिवंडी कोर्टात हजेरी लावली आहे. या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नवे जामीनदार असणार आहेत. भिवंडी कोर्टात जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दहावीच्या मराठीच्या पेपरला पोलिसांसमोरच कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर चढून कॉपी पुरवली जात असल्याचं दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. रोहित पवार काय नवीन खुलासा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवारांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर रोहित पवारांनी सातत्याने नवनवीन मुद्दे मांडत या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.
मुंबईत ज विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली. 'एपस्टीन फाईल्स'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव समोर आल्याचा आरोप आणि त्यातून निर्माण झालेली देशाची सुरक्षा व सार्वभौमत्वापुढील आव्हाने, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मोदी 'ब्लॅकमेल' होऊन हे करार करत आहेत, गंभीर आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार(ता.23) पासून सुरू होणार आहे. 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. मात्र, विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांविना हे अधिवेशन पार पडणार आहे.
कोला पश्चिम मतदारसंघातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून तब्बल १० कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनाही धमकी मिळाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुरक्षीततेच्या दृष्टीने एवढ्या महत्वपूर्ण घटना घडूनही अकोला पोलिसांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेत ज्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेऊ नका, असा निर्णय प्रदेश काँग्रेस कमेटीने घेतला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संघर्षामुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्ता गमावावी लागली होती.
खासदार संजय राऊत उद्या नाशिकचा दौरा करणार आहे. मालेगाव कोर्टातील सुनावणीला ते उपस्थित राहतील अशी माहिती आहे. मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांविरोधात अवमान याचिका कोर्टात दाखल केली होती. याप्रकरणी मालेगाव कोर्टात सुनावणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.