NCERTच्या आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा वगळण्यात आल्याच्या विषयावर बोलत असताना मंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विषयाबाबत 100% संवेदनशील असून कोणती चुकीची गोष्ट घडली, तर ते खपवून घेणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहता, रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इराणमध्ये पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली आता समोर आल्या आहेत. अमेरिकेने केलेली युद्धबंदी बुधवारी संपत असताना आणि पाकिस्तानात चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असताना इराणमध्ये 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' राजसत्तेवर पूर्णपणे कब्जा मिळविला आहे. आयआरजीसीचे मेजर जनरल अहमद वाहिदी हे इराणचे सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत. यामुळे जगावर महायुद्धाचे संकट घोंघावू लागले आहे.
हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाला बालविवाह रोखण्यात मोठ यश मिळाले आहे, यंदाच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत 42 पेक्षा अधिक बालविवाह प्रशासनाने रोखले आहेत, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बालविवाह रोखण्यासाठी भटजी ते वाद्य चालक, अशा सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
इराण-अमेरिकेच्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेची तयारी सुरू असून, इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानला येणार असल्याचा दावा अमेरिकन माध्यमांनी दिला आहे. परंतु इराणकडून अजूनही अधिकृत याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. अमेरिकेचे शिष्टमंडळ इस्लामाबाद इथं दाखल झाले आहे. पण इराणमधील शिष्टमंडळ अजून आलेले नाही.
पंढरपूर इथला जिजामाता उद्यान लोकार्पण कार्यक्रमावरून भाजप शिवसेना आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. उद्यान लोकार्पण कार्यक्रमात भाजप आमदार समाधान आवताडे यांनी नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि त्यांच्या नगरसेवकांवर टक्केवारीचा गंभीर आरोप केला आहे.
सांगलीच्या वाळवा इथल्या क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्या विरोधात सभासदांकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कारखान्याचे चेअरमन व क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडींची सुपुत्र वैभव नायकवाडी यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कारखाना कर्जमुक्त करण्याबरोबर विद्यमान चेअरमन वैभव नायकवडी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, या आंदोलनामध्ये नागनाथ अण्णा नायकवडींचे नातू आणि वैभव नायकवडीचे पुतणे माजी सरपंच गौरव नायकवडी देखील सहभागी झाले आहेत.
लग्नास नकार दिल्याचा जुना राग मनात धरून एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला एक्स बॉयफ्रेंडने संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. सोनी गणेश रामपुरे असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापू सुरेश आरगोड याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चंद्रपूर महापालिकेच्यावतीने आयोजित 'हिराई महोत्सवा'च्या उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचाराच्या (प्रोटोकॉल) मुद्द्यावरून मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. शासकीय कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट मंचावरूनच जिल्हा प्रशासन आणि मनपावर ताशेरे ओढले आणि कार्यक्रमातून 'वॉक आऊट' केले. याप्रकरणी आता त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेत विशेषाधिकार भंगाची मागणी केली आहे.
भाजपचे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर मिरा रोड पोलिसांनी तत्काळ दखल घेत संबंधित गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कलम फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवणे तसेच धमकी देणे या प्रकारांशी संबंधित आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत असलेल्या 'खासदार मातृशक्ती अभियाना' अंतर्गत कांदिवली येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. षण आहार वाटप: कांदिवली येथील महापालिका रुग्णालयाच्या पटांगणात 125 गर्भवती महिलांना पोषण किटचे वाटप करण्यात आले.
कल्याणवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल सुमारे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत असून मध्य रेल्वेच्या मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा आज जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार, जांबोरी मैदान ते वरळी डोमदरम्यान मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चानंतर वरळी डोममध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.