Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : 'घरावरच मालकी सांगायला लागले,तर मग सहन कसं करायचं?';उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज शुक्रवार 26 फेब्रुवारीच्या दिवसभरातील राज्य आणि देशभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

'घरावरच मालकी सांगायला लागले,तर मग सहन कसं करायचं?';उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानीय लोकधिकार समितीच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला भाषेचा अभिमान जरुर आहे, हिंदुस्थान आमचा आहे. प्रत्येक राज्याला राज्य मिळालं, भाषा मिळाली, प्रत्येकानं सुखानं राहा, घरावरच मालकी सांगायला लागले, तर मग सहन कसं करायचं? भाजपची एक नीती आहे, संस्कार मारून टाकायचे. म्हणजे मग ते जे सांगतात,ते खरं वाटायला लागतं. ते जनगणमनही संपवून टाकतील की काय?’ अशी आता आम्हाला भीती वाटते आहे.

'सर्व कृत्रिम फुलांवर बंदी घालणं शक्य नाही...'; जयंत पाटलांच्या मागणीवर पंकजा मुंडेंचं उत्तर 

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी कृत्रिम फुलांवर पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक स्पष्टता आणण्यासाठी शासकीय आदेश (जीआर) काढण्यात येईल असं आश्वासन दिलं. या अध्यादेशात बायोडिग्रेडेबल नसणाऱ्या फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेटर्स आणि मॅरेज हॉल्सवरही कारवाईची तरतूद असेल. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व कृत्रिम फुलांवर बंदी घालणे शक्य नसल्याचं सांगितलं.

गणेश नाईकांचा मोठा दावा, म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, राज्य शासनानं विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून आणले,त्याच्यात लाडकी बहीण योजना स्वीकारली. पण या योजनेमुळे अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करत आहे. पण तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असंही नाईक यांनी सांगितलं.

devendra fadnavis : कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी झाले आक्रमक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 'आम्हाला न्याय द्या' म्हणत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या. कांद्याला भाव द्या, अशा आशयाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. हातात बॅनर घेऊन ताफा जाताना कांदा उत्पादकांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेल्या चार दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांमध्ये बच्चू कडुंच्या प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर होते.

BJP Entry : माजी आमदाराच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढणार

चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिमूर येथील काँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजूकर यांनी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. अविनाश वारजूकर यांच्यासह माजी जि.प. अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश महासचिव सतिश वारजूकर, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा शंकरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच साईश वारजूकर यांचा समावेश आहे. या सर्वांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले.

Mahadev Munde : महादेव मुंडे हत्या प्रकरणाचे सत्य बाहेर येणार

परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नार्को टेस्टचा रिपोर्ट एसआयटीच्या हाती आला आहे. ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट रिपोर्टमधून महादेव मुंडे हत्या प्रकरणाचे सत्य बाहेर येणार आहे. नार्को टेस्टच्या अहवालातून हत्येचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयाच्या समोरच नार्को टेस्टचा रिपोर्ट उघडला जाणार आहे. नार्को टेस्टच्या अहवालामध्ये नेमकी काय माहिती याकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raju Shetti : शेतकऱ्यांचा बळी देऊन शक्तीपीठ होणार असेल तर आम्ही तो सहन करणार नाही : राजू शेट्टी

शक्तीपीठ महामार्गाचा काही भागा वाळवा, शिराळा आणि पन्हाळा तालुक्यातून आजऱ्याच्या दिशेने जातो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. गरज नसलेला हा महामार्ग वाळवा तालुक्यात आणण्याची गरज आहे. या महामार्गाच्या भरावामुळे वाळवा, शिराळा तालुक्यातील शेती नष्ट होणार आहे. नदीकाठच्या गावांना स्थलांरित व्हावे लागणार आहे. कोयना आणि कृष्णा नदीचे पाणी तुंबत जाणार आहे. त्यामुळे शक्तीपीठची नवीन अलाईमेंट सरकार लादू पाहत आहे. शेतकऱ्यांचा बळी देऊन हा शक्तीपीठ महामार्ग होणार असेल तर तो आम्ही सहन करणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

Ravindra Chavan : भाजपकडे राज्यसभेसाठी इच्छुकांची मोठी संख्या : रवींद्र चव्हाण

राज्यसभेची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि महायुती पूर्ण ताकदीने लढवेल. आम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व जागा आम्ही १०० टक्के जिंकणार याची आम्हाला खात्री आहे. उमेदवारीचा निर्णय भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड घेत असत. त्यामुळे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्या दिशेने आम्ही सर्वजण जाऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

Ajit Pawar Death : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विमान अपघातासंदर्भातील सर्व माहिती दिली’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात माझ्याकडे आलेली सर्व माहिती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून या चौकशीत पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

Shivsena UBT : राज्यसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार असावा : वरुण सरदेसाई

राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाचा उमेदवार असावा, अशी आमची मागणी आहे. ती मागणी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांच्याकडे मांडलीही आहे. आता निर्णय हा महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते घेतील. पण आमच्या पक्षाचा एक खासदार निवृत्त होत असेल तर त्या ठिकाणी आमच्या पक्षाचा उमेदवार असावा, अशी आमची मागणी आहे, असे आमदार वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

Rohit Pawar : आमदार रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आमदार रोहित पवार हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करून आक्रमक झाले आहेत. त्यांनी तीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नाही, त्यामुळे रोहित पवारांची ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट महत्वाची मानली जाते.

Ajit Pawar Death : राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेत अजितदादांच्या एफआयआरचा मुद्दा मांडावा : राज ठाकरे

विधानसभेचे अधिवेशन सध्या सुरू आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजितदादांच्या एफआयआरबाबतचा मुद्दा मांडवा. त्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या खासदारांनीही लोकसभेत हा मुद्दा मांडला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

Raj Thackeray : अजित पवारांच्या मृत्यूबाबतचा एफआयआर सरकार का नोंदवून घेत नाही; सरकारच संशय निर्माण करतंय : राज ठाकरे

रोहित पवार यांनी एफआयआर करण्याचा प्रयत्न झाला. पण तीनही ठिकाणी एफआयर घेतला गेला नाही, त्यामुळे मला त्याच ठिकाणी संशयाची सूई निर्माण होत आहे. मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर टाईप करत होते, तेवढ्यात डीसीपीनी हा एफआयआर घेणार नसल्याचे सांगितले. सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनीही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांचेच ते पती होते, त्यांच्या पतीबाबतचा एफआयआर घेतला जात नाही. सरकारकडून एफआयआर न घेण्याबाबतचा दबाव आणला जात असेल ह्या काही काळंबरं आहे असा संशय निर्माण होत आहे. सरकारच याबाबत संशय निर्माण करत आहे, असा आरोप मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.

Dada Bhuse परीक्षांमधील कॉपीला चाप, 107 केंद्रे बंद

दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील कॉपी मुळापासून नष्ट करण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसलीय.... आमदार काशिनाथ दाते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी मोठी घोषणा केली.... गैरप्रकार आढळलेली 107 परीक्षा केंद्रे तातडीने बंद करण्यात आलीत... आगामी काळात प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं आता अनिवार्य असणार आहे.... या निर्णयामुळे परीक्षा पद्धतीत पारदर्शकता येणार असून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालीय...

Rohit Pawar स्टेजवर असताना काकींशी नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय : रोहित पवार 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या कुजबुजीवरून आमदार रोहित पवारांनी जोरदार टीका केलीय. “स्टेजवर असताना काकींशी नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय,” असा इशारा देत त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये कुजबुज सुरू होती. त्यावरून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Arvind Kejriwal  : कथित मद्य घोटाळा प्रकरणी निर्दोष, केजरीवालांना अश्रू अनावर

दिल्लीतील कथित मद्य (अबकारी) धोरण घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पटियाळा हाऊस न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. निकालानंतर केजरीवालांना अश्रू अनावर झाले.

Vikramsingh Pachpute : प्लास्टिकच्या खेळण्यांसह, फुलांवर बंदी घालण्याची आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची मागणी

लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिक खेळण्यांविरोधात आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी विधानसभेत लक्षवेधी मांडत प्लास्टिकच्या खेळण्यांसह, फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

नागपूर बारावी पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

नागपुरातील बारावी पेपरफुटी प्रकरणात आता सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपी शासकीय यंत्रणेतील असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. खासगी ट्युशन क्लासेसशी संबंधित तिसऱ्या शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय... पोलीस आता सहाव्या आरोपीच्या मागावर असून, लवकरच या रॅकेटचा खरा 'मासा' गळाला लागण्याची शक्यता आहे...

मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला ९० टक्के आमदारांची दांडी

दिल्लीतील बहुचर्चित दारु घोटाळा धोरणाशी संबंधित प्रकरणात राउज एवेन्यू कोर्टाने आज मोठा निर्णय दिला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल तसेच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाकडून दोन्ही नेत्यांना क्लीन चीट मिळाली आहे.

आमदार रोहित पवार हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. 

चिपळूणमध्ये आजपासून कोकण विभागीय काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी माणूस खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल: राज ठाकरे 

 'काहीसा मागे पडलेला मराठी माणूस खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल', असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य केले आहे. मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

डीजीसीएकडून अजित पवार यांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता 

रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात राज्यसभेच्या उमेदवारांची नावे अंतिम करण्यात येणार आहे. ते आपल्या दौऱ्यात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार आहेत.

रोहित पवार घेणार राज ठाकरेंची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. अजितदादांच्या अपघात प्रकरणी ते राज ठाकरेंशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

ते घड्याळ कोटीचे नाही - महापौर रितू तावडे

सोशल मीडियावर पोस्ट करत दावा केला जात आहे की, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हातात एक कोटीच्या किंमतीचे घड्याळ आहे. मात्र. त्यावर तावडे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, सोशल मीडियावरील पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही.

क्षेत्रीय कार्यालयाच्या पुनर्रचनेत भाजपची राष्ट्रवादीवर कुरघोडी

पुणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर प्रशासनाने १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीची पुनर्रचना केली असून, यामध्ये भाजप १४ तर काँग्रेसकडे एक क्षेत्रीय कार्यालय असणार आहे. तर भाजपच्या खेळीमुळे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ नगरसेवक असूनही एकही कार्यालय ताब्यात ठेवता आलेला नाही. या राजकीय डावपेचात क्षेत्रीय कार्यालय लांब पडणार असल्याने नागरिकांचे पाच वर्ष हाल होणार आहेत.

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

इंदापूर तालुक्यातील डाळच नंबर दोन येथे सोलापूर-पुणे महामार्गावर कारचा अपघात झाला. त्यामध्ये सोलापूरमधील सांगोल्यातील ३ जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आदिती अमर हातेकर (वय 25 वर्षे), सखुबाई ईश्वर गेजगे (वय 60 वर्षे) व जय अमर हातेकर (वय 2 वर्षे), असे मृतांची नावे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT