मुंबईतील गोरेगाव पूर्वेला असलेल्या आरे मेट्रो स्थानकाखाली महादेव ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्लीपर कोच बसला ही आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीनंतर सर्वदूर धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवरून टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, नावाचा दुरुपयोग करणारे बरेच आहेत, त्यांचा लवकरच निकाल लागणार आहेत. महाराष्ट्रामधील दोन कोटी मतदार वगळले गेले. भविष्यात दोन कोटी घुसवले जातील असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत डीजे आणि लेझर लाईटसवर बंदी कायम राहणार आहे. गेली अनेक वर्षांपासून मुंबईत नियम पाळले जात आहेत, ते यंदाही कायम राहणार आहेत. गणेशोत्सव समितीच्या बैठकीत या बंदीबाबत एकमत झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार विक्रम काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. विधान परिषद निवडणुकीत पवार यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार मागे घेऊन माझ्या बिनविरोध निवडीसाठी मदत केली. त्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पवार यांची भेट घेतली, असे आमदार विक्रम काकडे यांनी भेटीनंतर सांगितले.
मुंबईत पश्चिम द्रूतगती महामार्गावर गोरेगाव मेट्रो स्टेशनच्या खाली एका बसला आग लागली आहे. त्यामुळे परिसरात धुराचे लोट मेट्रो स्टेशनमध्ये घुसले आहेत, त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण असून ते मेट्रोमधून खाली उतरत आहेत.
म्हातारपणात चांगली भूमिका घेईल असं वाटत होतं, मात्र आता यांना राजकीय पोळी भाजायची असेल आणि पुतण्याला खासदार करायचं असेल, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर टीका केली. वेळ पाहून कधी महाविकास आघाडीमध्ये जातात, कधी महायुतीमध्ये जातात, कधी अजितदादांसोबत जातात. यांनी ओबीसी महमंडळ खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही, अशी जळजळीत टीका जरांगे यांनी भुजबळांवर केली. ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळं खाल्लं, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी टीका केली
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नियमबाह्य आणि स्क्रॅप झालेल्या रिक्षांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. “स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अशा रिक्षांवर ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “ओबीसीच्या मुळावर आलं तर भुजबळ रस्त्यावर उतरणार,” असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेडसह विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं असून, सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
पुणे दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यानंद बापट यांच्या मराठीचे कौतुक केले. अतिशय सुंदर, शुद्ध मराठी असून त्यांच्या बोलण्यात मराठीच्या शुध्दतेचा नमुना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. विचार मांडताना इतरांना त्रास होऊ देऊ नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मुंबई आणि पुण्याने बंगळुरूलाही मागे टाकले आहे. आता आपण देशातील सर्वात मोठी फिनटेक इकोसिस्टीम बनलो आहोत. सर्वाधिक गुंतवणूक आपल्याकडे येत आहे. देशात होणाऱ्या एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी ६१ टक्के गुंतवणूक केवळ मुंबईत आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण फिनटेकची राजधानी बनलो आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ६ कोटी लखपती दीदी बनविण्याचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत साडेतीन कोटींपर्यंतचे लक्ष्य गाठले आहे. पुढील लक्ष्यपूर्तीसाठी बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याअनुषंगाने यासंदर्भातील समस्या निवारणासाठी मुंबईत आज बँकर्ससोबत बैठक आहे. दीदींच्या सहकार्यासाठी हेल्पलाइन तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी गावाजवळ एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघाताची घटना घडली. धुळे ते म्हसदी मार्गावरून धावणाऱ्या एका बसला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या ४० ते ४५ विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
बीड जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिके हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असून, तात्काळ पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथे बजाज फिनसर्वच्या आर्थिक सेवा व्यवसायांसाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य कॅम्पसचा भूमिपूजन सोहळा सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. बजाज फिनसर्वचे अध्यक्ष संजीव बजाज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित आहेत.
नाशिकमध्ये आज आणखी आश्रम शाळेतील एका आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. सृष्टी ओंकार सूर्यवंशी असं मृत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात नागपुरात आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेले १ हजार ५०० मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, माझी तयारी आहे विद्यानंद बापटजी तुमच्या बरोबर जाहीर प्रतिवाद करण्याची, सांगा केव्हा आणि कोठे करायची', असे आव्हान देखील त्यांनी दिले.
'सण हा सुखद आणि लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. डीजेचे आवाज आणि त्यावर रस्त्याचे कार्यक्रम याच्यामुळे या सणाचं गांभीर्य जायला मदत होते. विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही परंतु त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे.', असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
धुळ्यातील काँग्रेस नेत्या डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक करण्यात आला. मोबाईलचा गैरवापर करत अज्ञात व्यक्तींनी खासदार बच्छाव यांच्या नावाने त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून तब्बल ६२ हजार रुपयांची मागणी केली. हा प्रकार लक्षात येताच डॉ. बच्छाव यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. परिसराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पीएमआरडीएने तयार केलेल्या सुमारे ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती देण्यासह विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक झाला असून त्यांच्या नावाने अनेकांना व्हॉट्सॲपवरून ६२ हजार रुपये पाठविण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर खासदार बच्छाव यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारण्यासही सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नकार दिल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
नागपूरनंतर आता सोलापुरात देखील डॉल्बी आणि लेजर लाईटवर बंदी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.13 ते 26 सप्टेंबर दरम्यान सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी आणि लेजर लाईट वापरावर बंदीचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आदेश असून डॉल्बी आणि लेझर लाईटमुळे नागरिकांच्या आरोग्यास आणि सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे 13 ते 26 सप्टेंबर या कालावधीत गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकींमध्ये डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईट शोच्या वापरास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत.
11 सप्टेंबरपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा, त्यानंतर उपोषण मागे घेतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यापुढे मी उपोषण करू शकत नाही, शरीर साथ देत नाही. यापुढे जर उपोषण केलो तर मी मरून जाईन. त्यामुळे जे काही आहे आहे ते आताच आहे, आताच मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करून घेणार, असं मनोज जरांगे म्हणाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एनजीटीच्या ध्वनीप्रदूषण आदेशांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांकडे डॉ. कल्याणी मांडके, विवेक वेलणकर आणि निसर्गसेवक संस्थेचे पत्र दिलं आहे. ज्यामध्ये ध्वनीप्रदूषण नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी डॉ. मांडके यांनी एनजीटीकडे अर्ज केला होता. २०२४ मध्ये पुण्यातील गणेशोत्सवासाठी एनजीटीने नऊ महत्त्वपूर्ण निर्देश दिले होते. गणपती मंडपाजवळ ध्वनीची पातळी मोजून नागरिकांना दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करणे बंधनकारक. विसर्जन मिरवणुकीतील प्रमुख चौकांमध्येही ध्वनीची पातळी मोजण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय नियमांचे उल्लंघन झाल्यास साऊंड सिस्टीम जप्त करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे एनजीटीचे निर्देश आहेत.
11 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.