लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. राहुल गांधी यांची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेऊन भाजपानेही त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे आपणही जेन-झी बरोबर संवाद साधू या भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात कार्यक्रम घेतला पण तो सुपरफ्लॉप ठरला. फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेत 90हून अधिक विधानसभा मतदारसंघात मतदारांचा मतदानाचा हक्क धोक्यात येण्याची शक्यता आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात काय वास्तव समोर आलंय? कोणत्या मतदारसंघात राजकीय परीणाम होण्याची शक्यता आहे?
समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा ते दुसरबीड दरम्यान तळेगाव जवळ एका पुलाचा तुटलेला भला मोठा अँगल भरधाव कारला धडकल्याने कारचे इंजिन फुटले. नशीब बलवत्तर म्हणून कार नियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला धडकली. तर कार दरीत कोसळण्यापासून वाचली. यामुळे कारमधील चौघांचे प्राण वाचले असून समृद्धी महामार्ग प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा उघडल्यावर आला आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याण पूर्वेतील नामांकित भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
चाकण एमआयडीसीतील उद्योजक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आयोजित केली आहे. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेडचे आमदार बाबाजी काळे उपस्थित आहेत.
सांगलीतील कुपवाड येथे कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून दांपत्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढला होता. त्या मोर्चात भाजप आमदार महेश लांडगे यांनी पोलिस येण्याची वाट न पाहता आरोपीला तोडून टाका, असं प्रक्षोभक भाषण केलं होतं. त्यावर आक्षेप घेत सुप्रिया सुळे यांनी आमदार लांडगे यांना आव्हान दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, त्यांनी असे प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदाराला अटक करावी. त्यांना वार करायचा असेल सुप्रिया सुळेवर कर म्हणावं, असे आव्हानही त्यांनी दिले.
इकडचे नंबर एकचे पुढे जातील आणि आमचे दोन नंबरचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा नंबर एकवर येईल, असे सगळेच सांगत आहेत. त्यामुळे आमच्या बावनकुळे यांना शुभेच्छा आहेत, असे विधान काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. त्याला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘तुम्हाला संधी मिळणार आहे की नाही, याची २०२९ पर्यंत वाट पाहा. त्यानंतर फार काळ विरोधी पक्षात राहू नका. कारण मी आणि देवेंद्र फडणवीस तुमच्या फार जवळचे मित्र आहोत,’ असे सांगितले.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना सत्तेत येण्यासाठी २०४७ ची वाट पाहावी लागेल, असा टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चाकण दौऱ्याला सुरुवात झालीय.. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून शिंदेंचा दौरा सुरू केला..एकनाथ चाकण औद्योगिक परिसरातील रस्त्यांची आणि पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करत आहेतय..चाकणमधील वाहतूककोंडी, पाणी आणि रस्त्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन, पाहणीनंतर अधिकारी आणि उद्योजकांसोबत बैठक होणार आहे...या बैठकीत चाकणच्या समस्यांवर पुढील उपाययोजनांवर निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबईतील मैदानं आणि मोकळ्या जागा वाचवण्यासाठी आज वांद्रेत ठाकरेसेनेनं तिरंगा आंदोलनाची हाक दिलीये. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असून हातात तिरंगा घेऊन एकत्र येण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलंय...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची २५ ऑगस्टला बैठक होणार आहे...सूत्रांनी ही माहिती दिलीय..या बैठकीत पक्षवाढीसाठी रणनीती आखण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू असताना होत असलेल्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय..तसंच राज्यभरात विविध मुद्द्यांवर आंदोलने करण्याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जातेय..
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित नाशिकमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक झाली. बैठकीत जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
दहीहंडी उत्सव तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक शनिवारी पार पडली. यावेळी गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त असायला हवा, अशी मागणी पोलिस आयुक्तालयात पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली.
सोलापुरातील विडी उद्योजकांचा महाराष्ट्र सोडून तेलंगणात जाण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने विडी कामगारांचे वेतन वाढवण्याचा आदेश काढल्यानंतर विडी कारखानदार संतप्त झाले आहेत. सरकारने वेतनवाढीचा हा आदेश रद्द न केल्यास आम्ही शेजारील तेलंगणा राज्यात जाऊ, असे कारखानदारांनी दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी एका दिवशी 6 ठिकाणी छापे घातले. कारवाईत 23,650 रूपयांचा अवैध देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जेव्हा शिवसेना-भाजप युती होती, तेव्हा भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा त्यांना अभिमान होता. आज ते भाजप सोबत नसल्यामुळे विरोधकांचे काँग्रेसवरील प्रेम उफाळून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला नवी गती दिली असून, शक्तिशाली भारत उभारणीसाठी भाजप पक्ष त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते दिपक केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा कन्नड घाटात स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटल्याने बसचे नियंत्रण सुटल्याची थरारक घटना घडली. नियंत्रण सुटलेली बस घाटातील कठड्याला अडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. या बसमध्ये तब्बल 59 प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवाशांचा जीव वाचला असून चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
चाकणमधील रस्त्यांच्या कामांसाठी अत्याधुनिक प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ही कामे दहा महिन्यांऐवजी पाच ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट एमआयडीसीला देण्यात आले आहे. उद्योगांना भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नावर लवकरच पाणीपुरवठा मंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक होणार आहे. तर घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
गेल्या 30 वर्षापासून कर्तव्य बजावूनही वेतन न मिळाल्याने न्यायालयीन लढा जिंकलेल्या वनपालाला वेतनासाठी वन विभागाच्या कार्यालयात दाद मागावी लागली. मात्र वारंवार पाठपुरावा करून ही वेतन न मिळाल्याने सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वनपलाने अखेर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रामाशंकर शुक्ला, असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वनपालाचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून चार पानाची सुसाईड नोट मिळाली आहे.
विडी कामगारांच्या वेतनवाढीचा आदेश सरकारने काढल्याने सोलापुरातील उद्योजक नाराज झाले आहेत. कामगारांची वेतनवाढीचा मागणी नसताना सरकारने आदेश काढल्याचा दावा त्यांनी केला आहे. वेतनवाढीचा आदेश मागे न घेतल्यास तेलंगणा राज्यात जाण्याचा इशारा उद्योजकांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील खरी जेन झी आज रेशीमबागमध्ये बघितली. जवळपास दीड लाख तरुणांनी सहभाग घेतली. ढोल-ताशा वादनाचा विश्वविक्रम करण्यात आला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महिलांबाबत राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे. महिला आऱक्षण विधेयकाला त्यांचा विरोध आहे. काँग्रेस हा दिशाहीन पक्ष असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केल.
पुण्यातील शिरूर शहरातून २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून तरुणीला लॉजमध्ये डांबण्यात आलं आणि नशा देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पीडिता २२ वर्षीय तरुणी मूळ छत्तीसगडमधील आहे. ती सध्या पुण्यातील चाकण परिसरात वास्तव्यास आहेत.
राज्यातील महायुती सरकारमध्ये गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या महामंडळांच्या नियुक्त्यांना आता मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात महामंडळांचे वाटप पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची माहिती आहे.
चाकण औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर प्रशासनाकडून विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकण दौऱ्यावर येणार आहेत.
पुणे जिल्ह्यात नव्याने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यासाठी इच्छुक पात्र व्यक्तींकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्ज मागविले आहेत. जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती आणि नागरी भागात अद्याप सेवा केंद्र उपलब्ध नाही, अशा ठिकाणी गुणवत्तेच्या आधारे नवीन केंद्रांना मान्यता देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णयानुसार सेवा केंद्रांचे वितरण, उमेदवाराची किमान पात्रता, पायाभूत सुविधा, मुलाखत आणि कार्यक्षमता या निकषांच्या आधारे निवड करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना तसेच रिक्त जागांची यादी पुणे जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना १३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत अर्ज करता येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील रेशीम बाग मैदानावर तरुणाईशी संवाद साधणार आहेत.
बंगालच्या उपसागरात धक्कादायक घटना घडली आहे. पारादीप बंदरातून लोहखनिज घेऊन जाणारे एक मालवाहू जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुडालेलं जहाज हे पनामा ध्वजांकित आहे.
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत मोठी दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मुर्तीचा तोल गेल्याने त्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला आहे.
महिला ही देशाची सर्वात मोठी आहे, असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजीत करण्यात आलेल्या छात्रो की गुंज या कार्यक्रमात बोलत होते.
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव इथे पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी उर्फ रेश्मा पारधी यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाची कारवाई आता रद्द करण्यात आली आहे. कार्यालयीन शिस्तभंग आणि सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात देवयानी उर्फ रेश्मा पारधी यांच्यावर झालेली सेवामुक्तीची कारवाई आता रद्द करण्यात आली असून पुनर्स्थापनेचे आदेश पारधी यांना प्राप्त झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.