Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live : राष्ट्रीय सुरक्षेतील चाणक्याला दुसऱ्या चाणक्याकडून पुरस्कार : देवेंद्र फडणवीस

Marathi Breaking Live Headlines Updates: अमित शाह यांचा आज पुणे दौरा, संसदेचे पावसाळी अधिवेशन, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Mangesh Mahale

Devendra Fadnavis राष्ट्रीय सुरक्षेतील चाणक्याला दुसऱ्या चाणक्याकडून पुरस्कार : देवेंद्र फडणवीस 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. ते म्हणाले, अजित डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेला नवा आयाम दिला. एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले. डोवाल यांनी जीव धोक्यात घालून देशासाठी कार्य केलं. राष्ट्रीय सुरक्षेतील चाणक्याला दुसऱ्या चाणक्याकडून पुरस्कार मिळाल्याचे गौरद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

Amit Shah in Pune : अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थितीत आहे. रोहित टिळक यांच्या लोकमान्य टिळक ट्रस्ट कडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी आज अमित शहा पुण्यात आले आहेत.

Raj thackeray : राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, मुंबईत विद्यार्थी सेनेचा मेळावा

मनसेच्या विद्यार्थी सेनेचा मुंबईत मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात राज ठाकरे बोलत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिराच्या चोरीबद्दल पंतप्रधांनांनी बोलायला नको का? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला.

तसेच दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना शिविगाळ केली ती चुकीचीच आहे. पण दुसऱ्यांनाही आया असतात असा टोला त्यांनी लगावला. शिक्षण पद्दतीत बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

Amit Thackeray : अमित ठाकरे देशाच्या परिेस्थितीवर बोलता बोलता अचानक ब्लँक

अमित ठाकरे मनसे विद्यार्थी मेळाव्यात भाषण देताना भावूक झाल्याने काही क्षण ब्लँक झाले आणि भाषण विसरले. ‘मी परत येतो’ असे सांगून ते स्टेजवरून निघून गेले. मात्र, अवघ्या दहा मिनिटांत परत येऊन त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात 204 घरांचे नुकसान; एका व्यक्तीचा मृत्यू, दोन जखमी अन् पशुधनाची मोठी हानी

जुलैअखेर झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात 204 घरांचे नुकसान झाले असून, एका व्यक्तीचा मृत्यू, दोन जखमी, पशुधनाची हानी तसेच गोठे, झोपड्या व शेतीचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या अहवालातून समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत.

Mumbai Update : नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल चार वर्षांनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील 2022 मधील नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल चार वर्षांनंतर महत्त्वाची घडामोड घडली आहे. सर जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई येथील पाच वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालात तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल रविंद्र शेंडे यांना कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

SpaceX Rocket Crash Moon : एलन मस्‍क यांच्या 'स्पेसएक्स' कंपनीचे राॅकेट भरकटले; 5 ऑगस्‍टला प्रचंड वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर धडकणार

एलन मस्‍क यांच्या 'स्पेसएक्स' (SpaceX) कंपनीचे एक भरकटलेले रॉकेट वेगाने चंद्राच्या दिशेने झेपावत आहे. ते लवकरच चंद्रावर आदळणार आहे. हे 'स्पेसएक्स'च्या 'फाल्कन 9' (Falcon 9) रॉकेटचा वरचा भाग असून, जानेवारी 2025 मध्ये दोन 'लूनर लँडर्स'सह त्याचे उड्डाण करण्यात आले होते. बुधवार, 5 ऑगस्‍ट 2026 हे रॉकेट प्रचंड वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर धडकणार आहे. या भीषण टक्करीमुळे चंद्रावर धुळीचे महाकाय लोट उठणार असून, या दुर्मीळ घटनेचा साक्षीदार होण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ उत्सुक आहेत.

Chandranath Rath Murder Case : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या खासगी सहाय्यकाच्या हत्येत CBIची मोठी कारवाई; भाजपच्याच दोन कार्यकर्त्यांना अटक

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) आणि निकटवर्तीय सहकारी चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात भाजपचेच दोन कार्यकर्ते असल्याचा संशय व्यक्त करत सीबीआयने दोघांना अटक केली आहे. तपासात हे दोघे रथ यांच्यासोबत काम करत असल्याचे आणि त्यांचे एका प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाशीही संपर्क असल्याचे समोर आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सागर सोनकर आणि साहिब सोनकर अशी आहेत. हे दोघेही चंद्रनाथ रथ यांच्या टीममध्ये काम करत होते. सीबीआयच्या माहितीनुसार, दोघांनाही कोलकात्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Pune News : पुरंदर विमानतळासाठी 6 हजार कोटी रुपयांच्या निधीला हिरवा कंदील

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा यशस्वी अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)ने पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकासही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्ससह विविध पायाभूत सुविधा आगामी कुंभमेळा-2027 पूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, यावेळी पुरंदर विमानतळाच्या कामांसाठी हडकोमार्फत 6 हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली.

NEET Paper Leak : सीबीआयने अटक केलेले तिन्ही शिक्षकांनीच फोडले नीट पेपर

'नीट-यूजी 2026'ची प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी असलेल्या तीन मराठी शिक्षकांनीच त्यांना मिळालेल्या सवलतींचा गैरफायदा घेत या पेपरफुटीमध्ये मोठी 'कामगिरी' बजावल्याचा ठपका प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने आरोपपत्रात ठेवला आहे. सीबीआयने आरोपपत्रात राष्ट्रीय परीक्षा संस्थेतील (एनटीए) त्रुटींवरही बोट ठेवले असून, अशा घटना रोखण्यासाठी सविस्तर अहवाल लवकरच 'एनटीए'ला देणार आहे. सीबीआयने अटक केलेले तिन्ही शिक्षक 'एनटीए'च्या 'पेपर सेटिंग पॅनल'चा भाग होते. या प्रकरणात अटक असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र), मनीषा गुरुनाथ मांडरे (भौतिकशास्त्र) आणि मनीषा संजय हवालदार (जीवशास्त्र) या तिघांनी अंतिम प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लक्षात ठेवून ते पुण्यातील आपल्या कोचिंग क्लासमधील निवडक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.

Satara Rain : धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात 4,966 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. धोम धरणातून 4966 इतका पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रात करण्यात आला आहे. वाईतील ऐतिहासिक महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गणरायाच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचले आहे. कृष्णा नदीवरील पूल धोक्याच्या पातळीवर असून, शहरातील प्रसिद्ध कृष्णा घाटासह सर्व घाट जलमय झाले आहे.

Maharashtra Fishing season : महाराष्ट्रातील मच्छिमारांना आजपासून पुढील 15 दिवस सागरी क्षेत्रात मासेमारीची परवानगी

देशाच्या पश्चिम सागरी किनारपट्टीवर सर्वच राज्यात आजपासून मासेमारी सुरू झाली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यातील मच्छिमारांना आजपासून पुढील 15 दिवस 12 सागरी मैलापलीकडील राष्ट्रीय सागरी क्षेत्रात मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मात्र 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी असल्याने राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करण्यास परवानगी नाही. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना मच्छिमारांना मर्यादेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे.

श्री क्षेत्र चाकरवाडीत नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये हाणामारी

बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ आणि पेढा विक्री करणाऱ्या महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांतील महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी महिलांनी एकमेकींना शिवीगाळ करत पाय तोडण्याची तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, या घटनेप्रकरणी अद्याप कोणत्याही पक्षाकडून पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनीही कोणताही गुन्हा नोंदवलेला नसून, तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 1 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, भूस्खलन तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर मनपाच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील तब्बल 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यामध्ये भाजपचे 7 आणि एमआयएमचे 16 नगरसेवक समाविष्ट आहेत.पराभूत उमेदवारांनी केलेल्या तक्रारीनंतर महानगरपालिका प्रशासनाने संबंधित नगरसेवकांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात

शिर्डी पोलिसांनी पुन्हा घेतला भोंदू अशोक खरात याचा ताबा घेतला आहे. न्यायालयाच्या परवानगीने नाशिक कारागृहात असलेल्या खरात सध्या शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे.

LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, पण घरगुती ग्राहकांची झळ कायम

केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी (LPG) वापरणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा दिला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 200 रुपयांची कपात करण्यात आली असून, नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळे हॉटेल, खानावळ, केटरिंग आणि लघुउद्योग क्षेत्राला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.मात्र, सामान्य घरगुती ग्राहकांसाठी कोणताही दिलासा जाहीर करण्यात आलेला नाही. कारण 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, त्याचे दर पूर्ववतच कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना फायदा झाला असला तरी घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना सध्या जुन्याच दराने सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या हस्ते आज लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अमित शाह हे सारसबाग जवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT